चालू घडामोडी – ४ जुलै २०१६
देश-विदेश
भ्रष्टाचारप्रकरणी अरविंद केजरीवालांच्या सचिवांना सीबीआयकडून अटक
# दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सचिव राजेंद्र कुमार यांना सोमवारी सीबीआयकडून भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. २००६ साली झालेल्या ५० कोटींच्या घोटाळ्याचे राजेंद्र कुमार मुख्य सूत्रधार असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे. राजेंद्र कुमार यांच्यासह अन्य चारजणांनाही अटक झाली असून या सर्वांना मंगळवारी पातियाळा न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यात याप्रकरणी सीबीआयने थेट दिल्लीच्या सचिवालयातील राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर धाड टाकली होती. त्यावेळी अरविंद केजरीवाल यांनी सीबीआयवर टीका केली होती. दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी असलेल्या अरूण जेटलींना अडचणीत आणणाऱ्या फाईल्स मिळविण्यासाठी सीबीआयने ही धाड टाकल्याचा आरोप केजरीवालांनी केला होता.
रामदास आठवलेंना केंद्रात मंत्रिपदची लॉटरी; सुभाष भामरेही चर्चेत
# गेले काही दिवस चर्चा सुरू असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला असून, मंगळवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळात विस्तारात काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राजधानी नवी दिल्लीमध्ये हालचालींना वेग आला असून, एकामागून एक नेते भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीसाठी येत आहेत. धुळ्याचे भाजपचे खासदार सुभाष भामरे यांनीही अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे त्यांच्या नावाबद्दलही आता चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातच मंत्रिपद मिळण्याचा हट्ट करणारे रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांचे मंत्रिपद पक्के झाले आहे.
चीनमध्ये सर्वात मोठय़ा रेडिओ दुर्बिणीच्या चाचण्या सुरू
# चीनमध्ये जगातील सर्वात मोठी दुर्बीण उभारण्यात आली असून, त्याचा परावर्तक ३० फुटबॉल मैदानाइतका मोठा असून, त्याचे ४४५० पॅनेल्स बसवण्यात आले आहेत. आता त्याच्या चाचणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शेवटच्या चाळीस मिनिटांत त्रिकोणी आकाराची पॅनेल्स डिशवर बसवण्यात आले. काही चाचण्या पूर्ण केल्यानंतर सप्टेंबरमध्ये या दुर्बिणीचे काम सुरू होईल असे शिनहुआ न्यूज एजन्सीने म्हटले आहे. बिल्डर्स, तज्ज्ञ, वार्ताहर वायव्येकडील ग्विझाऊ येथे उपस्थित होते. पिंगटांग येथे ही दुर्बीण उभारण्यात आली आहे. आता या दुर्बिणीची तपासणी केली जात असून, पाचशे मीटर अॅपरचरची ही घनगोलाकार ही दुर्बीण आहे, असे नॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन या संस्थेचे उपप्रमुख झेंग झियोनियन यांनी सांगितले.
अपंगांना ३ टक्के आरक्षण देण्याचा केंद्राला आदेश
# केंद्र सरकारच्या नोकऱ्यांतील सर्व पदे आणि सेवांमध्ये अपंगांसाठी ३ टक्के आरक्षण उपलब्ध करून द्यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असून, अपंगांचे आरक्षण केवळ ‘अ’ व ‘ब’ गटातील पदांवर पदोन्नतीपुरते मर्यादित करणारा केंद्र सरकारचा पूर्वीचा आदेश रद्दबातल ठरवला आहे. सरकारने अशाप्रकारचे आरक्षण ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीपुरते मर्यादित ठेवले होते. १९९७ व २००५ साली जारी केलेल्या आदेशात कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) थेट भरतीद्वारे भरावयाची आणि पदोन्नतीद्वारे भरावयाची पदे असा भेद केला होता. ‘अ’ आणि ‘ब’ गटांच्या श्रेणींमध्ये पदोन्नतीद्वारे भरावयाच्या पदांसाठी अपंगांना कुठलेही आरक्षण दिले जाणार नाही, असेही यात स्पष्ट करण्यात आले होते.
अर्थव्यवस्था
सोन्याची आयात निम्म्याने घटली
# नवी दिल्ली : सोन्याच्या वाढत्या किंमतीचा परिणाम मागणीवर झाला असून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत आयातीत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्या सोन्याची आयात निम्म्याने घटली आहे. वाणिज्य खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यंदाच्या एप्रिल आणि मे या दोन महिन्यात 2.7 अब्ज डॉलरचे सोने आयात करण्यात आले. यामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत 51 टक्क्यांची घट झाली. 2015 मध्ये या दोन महिन्यात तब्बल 5.55 अब्ज डॉलरचे सोने आयात करण्यात आले होते. सराफांकडून दागिन्यांसाठी सोन्याची आयात केली जाते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या मौल्यवान धातूच्या किमती वाढत आहेत. परिणामी विक्री घटली आहे. सलग चौथ्या महिन्यात सोने आयातीत घट नोंदवण्यात आली. यामुळे चालू खात्यातील तूट नियंत्रणात आली असून सरकारला दिलासा मिळाला आहे.