Current Affairs 5 April 2018
1) काळवीट शिकार प्रकरणात सलमान खान दोषी; सैफ, तब्बू आणि सोनाली बेंद्रेची निर्दोष मुक्तता
1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयाने गुरुवारी अभिनेता सलमान खान याला दोषी ठरवले. तर या प्रकरणातील सहआरोपी अभिनेता सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. जोधपूर ग्रामीण जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी देवकुमार खत्री यांनी हा निकाल दिला. वीस वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानमध्ये गेले होते. १- २ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री सर्व आरोपी एका जिप्सी कारमध्ये होते आणि सलमान ती चालवत होता. काळवीटांचा एक कळप दिसताच सलमानने गोळ्या झाडून त्यांपैकी दोघांना ठार मारले.
2) एनडीएच्या खासदारांनी २३ दिवसांचे वेतन न स्वीकारण्याचा निर्णय
संसदेच्या अधिवेशनात विविध मुद्यांवरुन मोठा गदारोळ झाला. त्यामुळे संसदेचे कामकाज होऊ शकलेले नाही. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) खासदारांनी २३ दिवसांचे वेतन न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
3) मध्य प्रदेशात पाच बाबा-महाराज बनले राज्यमंत्री
मध्य प्रदेश सरकारने पाच हिंदू धार्मिक नेत्यांना मंगळवारी राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला. नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, कम्प्युटर बाबा, भय्यू महाराज व पंडित योगेंद्र महंत यांना नर्मदा नदीच्या संवर्धन समितीवर नियुक्त करून, त्यांना सरकारने राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे.
पंडित योगेंद्र महंत : मध्य प्रदेशात सुरू असलेल्या नर्मदा भ्रष्टाचार आंदोलनाचे पंडित योगेंद्र महंत समन्वयक आहेत. अमेरिकेतून चालविल्या जाणाºया विश्व ब्राह्मण संघाच्या मध्य प्रदेश शाखेचे ते अध्यक्ष आहेत.
हरिहरानंद महाराज : मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेल्या ‘नमामी देवी नर्मदे सेवा यात्रा’ उपक्रमातील हरिहरानंद महाराज हे प्रमुख नेते आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सुरू केलेल्या या यात्रेने ३,३४४ किलोमीटरचा प्रवास करीत, १,१०० गावांना भेटी दिल्या आहेत. मे २०१७ मध्ये या यात्रेचा समारोप झाला.
भय्यूजी महाराज : मूळ नाव उदयसिंग देशमुख. यांनी पूर्वी मॉडेलिंग केले आहे. त्यांचा अत्याधुनिक सोयी असलेला सूर्याेदय आश्रम इंदूरमध्ये आहे. अण्णा हजारे यांच्या २०११ सालच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात ते सहभागी होते.
कम्प्युटर बाबा : यांचे मूळ नाव आहे, स्वामी नामदेव त्यागी. आपला मेंदू कम्प्युटरपेक्षा अधिक वेगाने चालतो, असा यांचा दावा आहे. ते टेक्नोसॅव्ही आहेत. गेल्या वर्षी त्यांनी मंदिराच्या कारभारात मध्य प्रदेश सरकार ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप केला होता. त्यांना २०१४च्या कुंभमेळ्यात हेलिकॉप्टर उतरविण्याची परवानगी मिळाली होती.
नर्मदानंद महाराज : हे महाराज हनुमानाचे कट्टर भक्त आहेत. रामनवमीसारख्या सणानिमित्त महाराज दरवर्षी राज्यभर भव्य रॅलींचे आयोजन करीत असतात.
4) भारत-पाक सीमेवर नागरिकांसाठी ‘सुरक्षाकवच’; उभारले जाणार 14 हजार बंकर्स
केंद्र सरकारकडून जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात तब्बल 14,000 बंकर्स उभारण्यात येणार आहेत. यामध्ये सांबा, पुंछ, जम्मू, कटुआ आणि राजौरी परिसराचा समावेश आहे. पाकिस्तानकडून करण्यात येणारा गोळीबार आणि उखळी तोफांच्या माऱ्यामुळे हा परिसर सर्वाधिक वेळा लक्ष्य केला जातो. त्यामुळे येथील नागरिक गंभीररित्या जखमी होण्याचे प्रकार सर्रास घडतात, अनेकांचा तर जीवही जातो. ही परिस्थिती लक्षात घेता सरकारने आपातकालीन परिस्थितीत नागरिकांना लपण्यासाठी मोठ्याप्रमाणावर बंकर्स तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी 13,029 बंकर्स हे नागरिकांच्या घरासमोर उभारण्यात येतील तर उर्वरित 1,431 बंकर्स हे सार्वजनिक स्वरूपाचे असतील. या बंकर्सचे क्षेत्रफळ साधारण 800 स्क्वेअर फूट इतके असेल. प्रत्येक 40 घरांसाठी एक अशा पद्धतीने सार्वजनिक बंकर्सचे नियोजन करण्यात आले आहे.
5) राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘रेडू’चाच दणका
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे देण्यात येणाऱ्या राज्य चित्रपट पुरस्कारांची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली. सर्वोत्कृष्ट रंगभूषेच्या घोषित पुरस्कारासह ‘रेडू’ला एकूण ९ नामांकनं मिळाली आहेत. त्यामुळे राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘रेडू’चाच दणका पाहायला मिळाला. यात श्रीकांत देसाई यांना सर्वोत्कृष्ट रंगभूषेचा पुरस्कार जाहीर झाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी शशांक शेंडे आणि छाया कदम, सर्वोत्कृष्ट गीतलेखनासाठी गुरू ठाकूर, सर्वोत्कृष्ट संगीत आणि पार्श्वसंगीतासाठी विजय नारायण गवंडे, सर्वोत्कृष्ट गायकासाठी अजय गोगावले, सर्वोत्कृष्ट कथा आणि पटकथेसाठी संजय नवगिरे यांना नामांकन मिळालं आहे. तसंच सर्वोत्कृष्ट १० चित्रपटांमध्येही निवड झाली आहे.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.