Current Affairs 5 November 2019
‘आरसेप’मध्ये सहभागी होण्यास भारताचा नकार

भारताने प्रादेशिक सर्वकष आर्थिक भागीदारी कराराच्या (आरसेप ) वाटाघाटीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांनी याबाबत ठाम भूमिका घेतलेली आहे. मूळ उद्देशांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आरसीईपी करार हा त्याचा मूळ हेतू प्रतिबिंबित करत नाही. याचे परिणाम निष्पक्ष किंवा संतुलित नाही, असे भारताकडून सांगण्यात आले आहे.
भारताने या कराराच्या पार्श्वभूमीवर काही मागण्या केल्या होत्या, ज्यामध्ये म्हटले होते की, या करारात चीनचा पुढाकार नसायला हवा, अन्यथा भारताला व्यापाराच्यादृष्टीने तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
‘आरसेप’ एक व्यापार करार आहे, जो सदस्य देशांना एकमेकांबरोबर व्यापार करण्यात अनेक सवलती देणार आहे. या अंतर्गत निर्यातीवर लागणारा कर द्यावा लागणार नाही किंवा खूप कमी द्यावा लागेल. यामध्ये आशियातील दहा देशांसह अन्य सहा देशांचा समावेश आहे.
‘सौदी अरामको’ची ‘आयपीओ’ची घोषणा

जगातील सर्वांत मोठी तेल उत्पादक कंपनी ‘सौदी अरामको’ने शेअर बाजारांमध्ये सूचीबद्ध होण्यासाठी ‘आयपीओ’ आणत असल्याची घोषणा रविवारी उशिरा केली. हा जगातील आजवरचा सर्वांत मोठा ‘आयपीओ’ असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या ‘आयपीओ’च्या माध्यमातून ‘सौदी अरामको’चे सर्वेसर्वा क्राउन प्रिन्स महंमद बिन सलमान बऱ्याच काळापासून आपल्या तेलावर अवलंबून असणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल करण्याची शक्यता आजमावून पाहणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांती अखेर ‘अरामको’चा समभाग रियाध स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘आयपीओ’च्या आकाराची आणि ऑफर प्राइसची माहिती ९ नोव्हेंबरला देण्यात येणाक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘अरामको’ १.५ ट्रिलियन डॉलर ते २ ट्रिलियन डॉलरच्या (१०६ लाख कोटी रुपये ते १४१ लाख कोटी रुपये) मूल्यांकनावर १ ते २ टक्के समभाग जारी करण्याची शक्यता आहे. दोन ट्रिलियन डॉलरच्या मूल्यांकनावर २ टक्के समभाग विकले गेल्यास ‘अरामको’चा ‘आयपीओ’ ४० अब्ज डॉलरचा (२.८३ लाख कोटी रुपये) असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा जगातील आजवरचा सर्वांत मोठा ‘आयपीओ’ असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वीच्या सर्वांत मोठ्या ‘आयपीओ’चा विक्रम चीनच्या ‘अलिबाबा’ या कंपनीच्या नावावर आहे. ‘अलिबाबा’ने २०१४मध्ये सादर केलेल्या ‘आयपीओ’च्या माध्यमातून २५ अब्ज डॉलरचा निधी प्राप्त केला होता.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्याम टिळक यांचे पुण्यात निधन
ज्येष्ठ शास्त्रज्ञ व भारतीय वायुजीव शास्त्रज्ञ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्याम त्र्यंबक टिळक (वय ८८) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.
डॉ. टिळक यांना अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. त्यांनी तयार केलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या एअर सॅप्लर या यंत्रासाठी तत्कालीन राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता.
डॉ. टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली वायुजीवशास्त्र या विषयात संशोधन करणाऱ्या ८० विद्यार्थ्यांना पीएचडी मिळाली आहे. देशातील विविध विद्यापीठांमध्ये वायुजीवशास्त्र हा विषय सुरू करून अनेक संशोधन केंद्रे सुरू करण्यात आली. या विषयांवर त्यांनी ११ पुस्तकांचे लेखन केले. तसेच २५० पेक्षा अधिक शोधनिबंध प्रकाशित केले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
महिला क्रिकेट : १५० वनडे जिंकणारा भारत ठरला जगातील चाैथा संघ
भारतीय महिला संघाने साेमवारी यजमान विंडीज संघाचा घरच्या मैदानावरील मालिका विजयाचा प्रयत्न हाणून पाडला. भारतीय संघाने ५३ धावांनी सामन्यात धडाकेबाज विजयाची नाेंद केली.
भारताचा हा करिअरमधील वनडे सामन्यातील १५० वा विजय ठरला अाहे.
हॅमिल्टन सहाव्यांदा जगज्जेता!

मर्सिडिझच्या लुइस हॅमिल्टनला रविवारी रंगलेल्या अमेरिकन ग्रां. प्रि. फॉर्म्युला-वन शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले तरी त्याने सहाव्यांदा जगज्जेतेपदावर आपले नाव कोरले. यासह हॅमिल्टनने मायकेल शूमाकरच्या सात जगज्जेतेपदांच्या विक्रमाच्या दिशेने कूच केली आहे.
मर्सिडिझच्या वाल्टेरी बोट्टासने सुरुवातीपासूनच शर्यतीवर नियंत्रण मिळवत विजेतेपद पटकावले. त्याचे हे या मोसमातील चौथे तर कारकीर्दीतील सातवे जेतेपद पटकावले. ब्रिटनच्या हॅमिल्टनने पाचव्या क्रमांकापासून शर्यतीला सुरुवात केली. पण फिनलँडच्या बोट्टासचा झंझावात तो रोखू शकला नाही. हॅमिल्टनने दोन वेळा आघाडी घेतली होती. पण तीन फेऱ्या शिल्लक असताना बोट्टासने पुन्हा एकदा आघाडी घेत विजेतेपद संपादन केले. रेड बुलच्या मॅक्स वेस्र्टापेन याने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.
हॅमिल्टनने या शर्यतीतून १८ गुणांची कमाई करत एकूण ३८१ गुणांसह जगज्जेतेपद पटकावले. २०१९ मोसमाच्या अद्याप दोन शर्यती (ब्राझील आणि अबूधाबी ग्रां. प्रि.) शिल्लक असल्या तरी दुसऱ्या क्रमांकावरील बोट्टासला (३१४ गुण) हॅमिल्टनशी बरोबरी करता येणार नाही. फेरारीच्या चार्लस लेकलेर्क याने २४९ गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे. हॅमिल्टनने याआधी २००८, २०१४, २०१५, २०१७ आणि २०१८ मध्ये जगज्जेतेपदाची कमाई केली आहे.
राष्ट्रीय अॅथलेटिक्स : महाराष्ट्राला दोन सुवर्ण
विजयवाडा | अाैरंगाबादच्या धावपटू साक्षी चव्हाण अाणि तेजस शिर्सेने महाराष्ट्र संघाला साेमवारी फेडरेशनच्या ३२ व्या ज्युनियर राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत दाेन किताबांचा बहुमान मिळवून दिला. या दाेघांनी सुवर्णपदकाची कमाई केली. १८ वर्षीय तेजसने पुरुषांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीमध्ये चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवला. त्याने १३.५९ सेकंदात अंतर गाठून २०१५ मधील मीटचा विक्रम ब्रेक केला. तसेच साक्षी चव्हाणने महिलांच्या मिडले रिलेत अापल्या सहकारी दिया सुमेरपूर, सानिया सावंत अािण रिया पाटीलसाेबत सुवर्णपदक पटकावले. प्रशिक्षक सुरेंद्र माेदी यांच्या मार्गदर्शनाखाली या युवा खेळाडूंनी स्पर्धेत साेनेरी यशाचा पल्ला गाठला अाहे.
McDonald च्या CEO ची हकालपट्टी

मॅकडोनाल्डने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) स्टीव्ह ईस्टरब्रुक यांची हकालपट्टी केली आहे. कंपनीच्या एका कर्मचाऱ्यासोबत स्टीव्ह ईस्टरब्रुक हे रिलेशनशीपमध्ये असल्याचं उघड झाल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. स्टीव्ह यांचं कृत्य कंपनीच्या धोरणांच्या विरोधात असल्यामुळे ही कारवाई करत असल्याचं कंपनीच्या मंडळाने सांगितलं. ५२ वर्षीय स्टीव्ह २०१५ पासून सीईओ म्हणून काम करत होते.
चालू घडामोडींच्या नियमित अपडेटसाठी तुम्ही Mission MPSC ला फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता.