1) फोर्ब्स 30 अंडर-30 : यंग अचिव्हर्समध्ये बुमराह, हरमनप्रीत, भूमीसह मिथिलाही
फोर्ब्स इंडियाने 30 अंडर ची यादी जारी केली आहे. आपआपल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 30 तरुणांचा या यादीत समावेश आहे. या यादीत सर्वाधिक 4 नावे क्रीडा जगतातील आहेत. तर 3 नाने मनोरंजन क्षेत्रातील आहेत. त्यात भूमी पेडणेकर, अभिनेता विकी कौशल, क्रिकेटर जसप्रित बुमराह, महिला क्रिकेटर हरमनप्रित कौर आणि शूटर हिना सिद्धू यांचा समावेश आहे. 2011 पासून फोर्ब्सने 30 अंडर-30 यादी प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. तर 2014 पासून फोर्ब्स इंडियाची ही यादी जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. त्यात भारताच्याच 30 तरुणांची निवड केली जाते. त्यात 9 स्थानांवर एकूण 10 महिलांची नावे यादीत आहेत. एका स्थानावर 2 महिला जान्हवी जोशी आणि नुपुरा किर्लोस्कर आहेत. दुसऱ्यांदा लिस्टमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक महिलांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. लिस्टमध्ये 30 पैकी 12 स्थाने अशी आहेत ज्याठिकाणी एकापेक्षा जास्त जणांची नावे आहेत. 4 नावे क्रीडा जगताशी संबंधित आहेत. बुमराह, हरमनप्रित, हिना सिद्धू आणि सवित पुनिया. 3 मनोरंजन क्षेत्रातील नावे आहेत. विकी कौशल, भूमी पेडनेकर आणि मिथिला पालकर. एक गायक – जुबिन.9 स्थानांवर 10 महिलांची नावे टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया-कम्युनिकेशन, इंटरप्रिन्योरशिप, हेल्थ केअर, फूड-हॉस्पिटॅलिटी, फायनान्स, फॅशन, ई-कॉमर्स आणि डिझायनिंग अशा क्षेत्रातील 2-2 नावे आहेत.
2) पाकिस्तानी साखर राेखण्यास आयात शुल्कवाढीचा प्रस्ताव
पाकिस्तानची साखर येण्याच्या भीतीमुळे स्थानिक बाजारातले पडलेले साखरेचे भाव स्थिरावण्यासाठी आयातशुल्क वाढीचा प्रस्ताव पुढे आला आहे. गॅट करारामुळे जगातल्या कोणत्याही देशातून येणारी साखर सरकारला रोखता येत नाही. मात्र त्यावरील आयातशुल्क वाढवण्याची संधी सरकारपुढे आहे. या अनुषंगाने साखरेवरील आयातशुल्क शंभर टक्के करण्याची शिफारस केंद्रीय अन्न मंत्रालयाने केली आहे. आयात साखरेवर सध्या ५० टक्के आयातशुल्क आहे. जगभर सध्या साखरेच्या बाजारात मंदी आहे. स्थानिक बाजारात साखरेला मागणी नसल्याने निर्यातीच्या माध्यमातून साखर विक्री करण्याच्या प्रयत्नात अनेक देश आहेत. शेजारी पाकिस्ताननेही (त्यांच्या चलनात) प्रती किलो सुमारे १९ रुपयांचे अनुदान देऊन साखर निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे पाकिस्तानी साखर भारतात येऊ शकते.
महाराष्ट्राचे उत्पादन वाढले
गेल्या हंगामाच्या तुलनेत महाराष्ट्राच्या यंदाच्या साखर उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात १४९ कारखाने गाळप करत होते. यंदा १८३ कारखान्यांचे गाळप सुरू आहे. आतापर्यंत ६१४.५८ लाख टन उस गाळप झाले असून ६६.१० लाख टन साखर तयार झाली आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ३४७.८९ लाख टन ऊस गाळप होऊन ३८.३७ लाख टन साखर तयार झाली होती.
3) दीर्घ भांडवली लाभ कर 1 एप्रिलपासून
यंदाच्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेला दीर्घकालीन भांडवली लाभ कर (एलटीसीजी) येत्या १ एप्रिल महिन्यापासूनच लागू होणार असल्याचे स्पष्टीकरण सोमवारी अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आले. म्हणजेच ३१ मार्च २०१८ पर्यंत विकण्यात आलेल्या शेअर्सवर मिळणाऱ्या दीर्घकालीन भांडवली लाभावर कर आकारला जाणार नाही. शेअरचे खरेदी मूल्य किंवा ३१ जानेवारीला बाजारातील कमाल मूल्य यापैकी जे जास्त असेल त्या आधारावर भांडवली लाभाची गणना केली जाईल. जेव्हा एखादी व्यक्ती एखादा शेअर खरेदी करून त्याला १२ महिन्यांपेक्षा जास्त काळ स्वत:कडेच ठेवते; त्यातून मिळणाऱ्या नफ्याला लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणतात. गुुंतवणूकदारांनी शेअर्स विक्रीतून एक लाख रुपयांपेक्षा जास्त नफा कमावल्यास त्यांना १० टक्के दराने एलटीसीजी कर आकारला जाणार आहे.
4) आकाशगंगेपलीकडच्या ग्रहाचा प्रथमच शोध
नासाच्या चंद्रा एक्स-रे ऑब्झर्वेटरी व अन्य वेधशाळांच्या द्वारे प्रथमच आकाशगंगेच्या पलीकडे असलेल्या ग्रहांचा शोध लागला आहे. वेधशाळांच्या माहितीचा (डेटाचा) वापर करून अमेरिकेतील ओक्लाहोमा विद्यापीठातील खगोलभौतिकी शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे. वैज्ञानिकांनी यासाठी मायक्रोलेन्सिंग या तंत्राचा वापर केला. मायक्रोलेन्सिंग ही एक खगोलशास्त्रीय प्रक्रिया असून ग्रहांचा शोध घेण्याकरिता गुरुत्वाकर्षणामुळे वक्री होणाऱ्या प्रकाशाचा वापर त्यात केला जातो. अथांग पसरलेल्या विश्वातील विशिष्ट घटक शोधण्यासाठी ते तंत्र वापरले जाते. शोध लागलेले ग्रह चंद्राइतक्या लहान आकारापासून गुरू ग्रहा इतक्या विशाल आकाराचेही आहेत.
5) मालदीवमध्ये आणीबाणी
मालदीवमध्ये राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी आज आणीबाणीची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे मालदीवमधील राजकीय संकट आणखी वाढले आहे. राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाचा आदेश मानण्यास नकार दिला होता. त्यानंतरच मालदीवमधील राजकीय संकटाची सुरुवात झाली. दरम्यानच्या काळात भारताने खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय नागरिकांना मालदीवचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. मालदीवमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती यामीन यांनी १५ दिवसांची आणीबाणी जाहीर केली आहे. सुप्रीम कोर्टाने राष्ट्रपतींना राजकीय कैद्यांना मुक्त करण्याचा आदेश दिला होता. राष्ट्रपतींच्या जवळच्या सहकारी अजिमा शुकूर यांनी आज संध्याकाळी टीव्हीवरून आणीबाणीची घोषणा केली. मालदीवच्या राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही ही माहिती देण्यात आली. या आदेशामुळे मालदीवच्या नागरिकांचे सर्व मूलभूत अधिकार निलंबित झाले आहेत.
MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.