चालू घडामोडी – ६ जुलै २०१६
देश-विदेश
कोची मेट्रो ठरणार तृतीयपंथियांना नोकरी देणारी देशातील पहिली मेट्रो!
# पुढील वर्षी सुरु हाणाऱ्या कोची मेट्रोमध्ये तृतीयपंथीय सुद्धा काम करणार आहेत. त्यांना हाऊसकिपिंग, कस्टमर केअर आणि क्राऊड मॅनेजमेंटसारखी कामे देण्यात येणार आहेत. कोची शहर पोलिसांच्या सांगण्यावरून कोची मेट्रो रेल लिमिटेडच्या (KMRL) व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला. मेट्रो रेल्वे सेवेत तृतीयपंथियांना नोकरी देण्याची देशातील ही पहिलीच घटना असेल, असे केएमआरएलच्या अधिकाऱ्याने सांगितले. देशात खूप कमी ठिकाणी तृतियपंथियांना नोकरीत सामावून घेतले जाते. कोचीच्या मेट्रोसेवेत काम करणाऱ्या तृतियपंथियांचा मुख्य कर्मचाऱ्यांमध्ये सहभाग नसेल. परंतु, ते यंत्रणेचा भाग असतील, अशी माहितीदेखील त्याने दिली.
राज्य
राळेगणसिद्धी विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार
# गुजरातमध्ये नर्मदा नदीवर उभारण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या धर्तीवर कुकडी कालव्यावर अर्धा किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा सौरऊर्जा प्रकल्प उभारून आदर्श गाव राळेगणसिद्धी व परिसराला (ता. पारनेर) विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यात येणार आहे. या सुमारे ८ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे. यामुळे राळेगणच्या उपसा जलसिंचन योजनेच्या वीजबिलात सुमारे २१ लाख रुपयांची बचत होईल.
‘बॉम्बे हायकोर्टा’चे नामांतर मुंबई हायकोर्ट करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
# बॉम्बे व मद्रास या उच्च न्यायालयांची नावे आता मुंबई उच्च न्यायालय व चेन्नई उच्च न्यायालय अशी करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्याबाबतचा कायदा मंत्रालयाचा प्रस्ताव मान्य केला असून संसदेत कायदा केल्यानंतर नावे बदलली जातील. मुंबई व चेन्नई शहरांची नावे १९९० मध्ये बदलली असून त्यानंतर अनेकदा उच्च न्यायालयाची नावे शहराच्या नावानुसार करण्याची मागणी करण्यात आली होती. द हायकोर्ट अल्टरेशन ऑफ नेम्स बिल २०१६ मांडण्यात येणार असून उच्च न्यायालये १८६० मध्ये स्थापन झाली असल्याने १८६१ च्या कायद्यात नावे बदलण्याची तरतूद नाही.
क्रीडा
लिओनल मेस्सीला करचुकवेगिरीप्रकरणी २१ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा
# अर्जेंटिना आणि बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याला स्पेनमधील न्यायालयाने बुधवारी २१ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. मेस्सीविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या करचुकवेगिरी प्रकरणात ही शिक्षा सुनाविण्यात आली आहे. मेस्सीबरोबरच त्याच्या वडिलांनाही कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. त्यामुळे आता फुटबॉलच्या मैदानापाठोपाठ वैयक्तिक जीवनातही मेस्सीच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. हे प्रकरण आपला वकील मार्गी लावेल, अशा आशावाद मेस्सीने काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. मात्र, न्यायालयाने मेस्सी आणि त्याचे वडील जॉर्ज यांना कारावासाची शिक्षा सुनावली.
प्रणीत, मनू-सुमिथ यांना अजिंक्यपद
# बी. साई प्रणीत आणि रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या मनू अत्री आणि बी. सुमिथ रेड्डी यांनी कॅनडा खुल्या ग्रां. प्रि. बॅडमिंटन स्पध्रेत अनुक्रमे पुरुष एकेरी व दुहेरी गटाचे जेतेपद पटकावले. चौथ्या मानांकित २३ वर्षीय प्रणीतने कोरियाच्या ली ह्यूनचा २१-१२, २१-१० असा अवघ्या २८ मिनिटांत धुव्वा उडवत पुरुष एकेरीत दिमाखदार विजय मिळवला. अव्वल मानांकित मनू व रेड्डी या जोडीने स्थानिक खेळाडू अॅड्रियन लियू व टोबी नग या जोडीवर २१-८, २१-१४ असा विजय मिळवला. ऑलिम्पिकसाठी पहिल्यांदा भारताचा पुरुष दुहेरी पात्र ठरला असून मनू व रेड्डी यांनी हा मान पटकावला. या विजयाने त्यांना ऑलिम्पिकमध्ये सातत्यपूर्ण खेळ करण्याची प्रेरणा मिळेल.