1) मेघालयमध्ये कोनराड संगमा यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
नॅशनल पिपल्स पार्टी (एनपीपी) चे नेते कोनराड संगमा यांनी मंगळवारी मेघालयच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात अमित शाह आणि राजनाथ सिंह यांचाही समावेश होता. मेघालयच्या आघाडी सरकारमध्ये भाजप, एनपीपी, युनाइटेड डेमोक्रॅटिक पार्टी (युडीपी), हिल स्टेट पिपुल्स डेमोक्रॅटिक पार्टी (एचएसपीडीपी) आणि पिपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट (पीडीपी) यांचा समावेश आहे. 21 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला सत्ता स्थापण्यात यश आलेलेल नाही. तर भाजपला फक्त दोन जागा मिळाल्या आहेत.
कोनराड संगमा मेघालयचे माजी मुख्यमंत्री (1988-91) आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष (1996-98) राहिलेल्या पीए संगमा यांचे पुत्र आहेत. त्यांची बहीण अगाथा संगमा काँग्रेसच्या युपीए सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले आहे. कोनराड यांचे भाऊ जेम्स संगमा गेल्या विधानसभा (2013-18) मध्ये विरोधीपक्ष नेते होते.
2) नागपुरात उभारणार देशातील पहिला तिहेरी उड्डाणपूल
नागपुरात मेट्रो रेल्वे तिहेरी उड्डाणपूल (थ्री-लेअर फ्लायओव्हर) साकारणार आहे. देशात अशा प्रकारचा हा पहिलाच तिहेरी उड्डाणपूल असेल. हा उड्डाणपूल म्हणजे बांधकामाचा एक अनाेखा व अप्रतिम नमुना ठरणार आहे. उपराजधानी नागपुरात मेट्रो रेल्वेचे काम युद्धपातळीवर सुरू असून शहरातील वर्धा मार्गावर डबलडेकर उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. यात खालच्या पुलावरून वाहने जाणार असून वरच्या बाजूने मेट्रो धावणार आहे. तर नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर मेट्रो देशातील पहिला तिहेरी उड्डाणपूल साकारणार आहे. ग्राउंड प्लस थ्री-लेअर असे याचे स्वरूप राहणार आहे. यात शहरातील विविध भागात जाणाऱ्यांसाठी खालून रस्ता मार्ग, त्यावर गड्डीगोदाम परिसरात रेल्वेमार्ग आणि तिसऱ्या लेअरमध्ये शहराबाहेर जाणाऱ्यांसाठी तर पुलाच्या सर्वात वर मेट्रोसाठी अप्पर पोर्शन असणार आहे. अशा प्रकारचा ग्राउंड प्लस थ्री लेअर असलेला देशातील पहिलाच उड्डाण पूल असेल.
3) वर्षात औषधींच्या किमती 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवल्या तर कंपनीचा परवाना रद्द
केंद्र सरकारने औषधी कंपन्या आणि आयातकांच्या मनमानीवर अंकुश ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतीही औषधी कंपनी एका वर्षात १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ करू शकणार नाही. कंपन्यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याचा परवाना रद्द करण्यात येईल. त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नॅशनल फॉर्मास्युटिकल प्राइसिंग अॅथॉरिटीने (एनपीपीए) असा आदेश जारी केला आहे. एनपीपीएने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, जर औषधी कंपन्या त्यांच्या एमआरपीमध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त किंमत एका वर्षात वाढवत असेल तर त्यांच्याकडून व्याजासह वाढीव किंमत व्याजासह वसूल करण्यात येईल. दंडही आकारण्यात येईल. एनपीपीएने म्हटले, निर्णय सर्वप्रकारच्या औषधांवर लागू असेल. मग ते शेड्यूल्ड ड्रग्ज (किमतीवर सरकारी नियंत्रण)च्या यादीतील असो की नॉन शेड्यूल्ड ड्रग्ज(किमतीवर सरकारी नियंत्रण नसलेले)च्या यादीतील असोत. एनपीपीएच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे काम सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन(सीडीएससीओ) यांना करावयाचे आहे.
4) सिंधुताई, ऊर्मिला आपटे यांना ‘नारी शक्ती’ पुरस्कार
अनाथाची माता सिंधुताई सपकाळ आणि भारतीय स्त्री शक्ती या मुंबईतील संस्थेच्या अध्यक्षा ऊर्मिला बळवंत आपटे यांची २०१७ या वर्षीच्या ‘नारी शक्ती’ या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या वतीने महिला दिनानिमित्त दरवर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातात. सिंधुताई सपकाळ यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपले आयुष्य व्यतीत करून शेकडो अनाथांना आईची माया दिली. ‘भारतीय स्त्री शक्ती’च्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या अापटे यांच्या याेगदानाचाही सरकारने गाैरव केला. ही संस्था महिलांचे शिक्षण आणि कौशल्य विकास, मानसिक आणि शारीरिक आरोग्य, स्वाभिमान, आर्थिक स्वातंत्र्य तसेच लिंग समानता या पंचसूत्रीवर मोहीम, सर्वेक्षण, संशोधन, कार्यशाळा, प्रशिक्षणांच्या माध्यमातून सपुदेशनाचे कार्य करते.
5) सर्वात कट्टर शत्रू देशांचे नेते एकमेकांना भेटले
जगातील कट्टर शत्रू राष्ट्र म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाच्या वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांची दुर्मिळ भेट मंगळवारी संपन्न झाली. उत्तर कोरियाचे सुप्रीम लीडर किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या देशात डिनरसाठी आमंत्रित केले होते. दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांचे शिष्टमंडळ उत्तर कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष भवन परिसरात मंगळवारी आले. तेव्हा खुद्द किम जोंग उन आणि त्यांच्या पत्नी री सोल जू यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. गेल्या 7 दशकांपासून एकमेकांचे कट्टर शत्रू असले तरीही उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी दक्षिणसोबत चांगले मैत्री संबंध वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला. किम जोंग उन यांनी उत्तर कोरियाची सत्ता सांभाळली तेव्हापासून दक्षिण कोरियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेण्याची ही पहिलीच भेट आहे.
6) जगातील टॉप 5 सैन्यात इंडियन आर्मी
जगातील विविध देशांच्या सैन्य क्षमतेचे सर्वेक्षण करुन, कुठल्या देशाच्या सैन्याचा कितवा क्रमांक लागतो त्याची एक जागतिक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 133 देशांच्या सैन्य दलांमध्ये भारतीय लष्कर चौथ्या स्थानावर आहे. भारताच्या पुढे अमेरिका, रशिया आणि चीनचा क्रमांक लागतो. भारताचा शेजारी पाकिस्तान या ग्लोबल फायरपावरच्या यादीत 13 व्या स्थानावर आहे. भारताने या यादीत पहिल्या पाचमध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे. मागच्याचवर्षी पाकिस्तानने या लिस्टमध्ये पहिल्या 15 मध्ये प्रवेश केला होता. फ्रान्स, यूके, जापान, टर्की आणि जर्मनी हे देश सुद्धा पहिल्या दहामध्ये स्थान टिकवून आहेत. चीनने रशियाला मागे टाकून दुसरे स्थान मिळवले आहे. चीनकडे आजच्या घडीला रशियापेक्षा जास्त फायटर विमाने आणि जहाजे आहेत. एकूण 50 निकषांचा अभ्यास करुन हे क्रमांक देण्यात आले आहेत. लष्करी,नैसर्गिक स्त्रोत, भौगोलिक वैशिष्ट्य, संरक्षण उद्योग आणि सैनिक संख्या यांचा आढावा घेण्यात आला आहे. जीएफपीच्या सर्वेक्षणानुसार भारताकडे 42 लाख 7 हजार 240 सशस्त्र सैनिक आहेत. तेच चीनकडे 37 लाख 12 हजार 500 सशस्त्र सैनिक आहेत. पण चीनचे 22 लाख 60 हजार सैन्य सक्रिय आहे तर भारताकडे 13 लाख 62 हजार 500 सैनिक सक्रिय आहेत.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.