⁠
Uncategorized

Current Affairs – 7 April 2017

राज्य

# नोकरभरती घोटाळाप्रकरणी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. माने निलंबित
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कथित नोकरभरती घोटाळा चांगलाच भोवला आहे. नोकरभरतीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यामुळे राज्य सरकारने आज त्यांचे निलंबन केले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी डॉ. माने यांच्या निलंबनाची घोषणा विधिमंडळात केली. माने यांच्या कार्यकाळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ५३ अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याबाबत सिनेट सदस्य आणि भाजपचे आमदार अतुल सावे यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी माने यांच्या निलंबनाची घोषणा केली.

# ‘अ’श्रेणीतील सर्वाधिक शाळा पुणे विभागात
केंद्र शासनाच्या ‘शाळा सिद्धी’ उपक्रमात राज्यातील केवळ नऊ हजारांवर शाळा ‘अ’ श्रेणीस पात्र ठरल्या असून पुणे विभाग हा राज्यात अव्वल आला, तर कोकण दुसऱ्या स्थानावर आहे. देशभरातील शाळांचे मूल्यांकन करीत अव्वल शाळांना मानांकन प्रदान करण्याचा उपक्रम केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रथमच हाती घेतला आहे.
शासनाने ‘प्रगत शाळा’ म्हणून हा उपक्रम राज्यात अमलात आणला आहे. राज्यातील शंभर टक्के शाळा प्रगत करण्याचा चंग शासनाने बांधला आहे. पण पहिल्या फेरीत सर्व गटांतील प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील शाळांपैकी ९ हजार ३७० शाळा अ श्रेणीचा दावा करू शकल्या. प्रत्येक शाळेने काही निकषांवर स्वत:चे मूल्यमापन करीत ‘अ’ श्रेणीसाठी दावा करणे अपेक्षित होते. ३१ मार्चपर्यंत हे स्वयंमूल्यमापन सादर झाल्यानंतर हा उपक्रम हाताळणाऱ्या विद्या प्राधिकरणाने शाळांची यादी घोषित केली. यानंतर या ‘अ’ श्रेणीतील शाळांची तपासणी शिक्षण विभागाची चमू करणार आहे. त्यासाठी प्रशिक्षक ‘निर्धारक’ गट तयार करण्यात आले आहे.

# लाभाच्या पदांच्या नियमातून प्रतोदांना वगळण्याचा निर्णय
सत्ताधारी पक्षाचे प्रतोद व मुख्य प्रतोद यांना लाभदायक पदांच्या नियमातून वगळण्याचे महत्त्वपूर्ण विधेयक बुधवारी विधानसभेत मंजूर झाले. सध्याच्या नियमानुसार सत्ताधारी पक्षाच्या प्रतोद व मुख्य प्रतोदांना विशेष सुविधा पुरविल्या जातात. त्यामुळे हे लाभाचे पद असून संबंधित प्रतोद किंवा मुख्य प्रतोदांची विधानसभा किंवा विधानपरिषदेत नियुक्ती करण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १९१ चा खंड (१) च्या उपखंड (क) मधील तरतुदीनुसार भारत सरकारच्या किंवा कोणत्याही राज्याच्या शासनाच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभपद धारण केले असेल तर ती, व्यक्ती राज्याच्या विधानसभेची किंवा विधानपरिषदेची सदस्य म्हणून निवडली जाण्यास आणि तशी सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरते. या पार्श्वभूमीवर सरकारकडून ही सुधारणा करण्यात आली आहे. मात्र, राज्य विधानमंडळात सरकार स्थापन करणाऱ्या पक्षाचा मुख्य प्रतोद आणि प्रतोद ही पदे सभागृहाचे कामकाज चालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. प्रतोद किंवा मुख्य प्रतोदांना असलेल्या सुविधांमुळे राज्य विधानमंडळाचा सदस्य म्हणून निवडला जाण्यास निरर्ह ठरवता येणार नाही. त्यामुळे संबंधित विधेयकात सुधारणा करण्यात आल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

क्रीडा

# सिंधूची क्रमवारीत द्वितीय स्थानी झेप
घरच्या मैदानावर जल्लोषी चाहत्यांच्या उपस्थितीत इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या पी.व्ही. सिंधूने जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानी झेप घेतली आहे. कारकीर्दीत सिंधूने क्रमवारीत घेतलेली ही सर्वोत्तम आगेकूच आहे. ‘भारताची फुलराणी’ सायना नेहवालनंतर क्रमवारीत अव्वल पाचमध्ये स्थान पटकावणारी सिंधू केवळ दुसरी भारतीय बॅडमिंटनपटू आहे. जपानच्या अकेन यामागुचीला मागे टाकत सिंधूने ७५७५९ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या कॅरोलिन मारिनला नमवत सिंधूने इंडिया खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाची कमाई केली होती. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत महिला एकेरी प्रकाराच्या लढतीत कॅरोलिननेच सिंधूचे सुवर्णपदकाचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. यानंतर सिंधूने दुबई सुपर सीरिज फायनल्स स्पर्धेत कॅरोलिनवर मात केली. मात्र प्रीमिअर बॅडमिंटन लीग स्पर्धेत कॅरोलिनने सिंधूला नमवले होते. कोर्टबाहेर एकमेकींच्या मैत्रिणी असलेल्या या दोघी खेळताना कट्टर प्रतिस्पर्धी होतात. राजधानी दिल्लीत झालेल्या स्पर्धेत सिंधूने सर्वसमावेशक खेळासह कॅरोलिनला निष्प्रभ केले. सिंधूविरुद्धच्या पराभवामुळे कॅरोलिन क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे.

Related Articles

One Comment

Back to top button