Current Affairs 7 March 2018
1) ब्रिटनच्या स्कॉटलॅण्ड यार्डमध्ये दहशतवादविरोधी विभागप्रमुखपदी भारतवंशीय अधिकारी
ब्रिटनच्या स्कॉटलॅण्ड यार्डमध्ये दहशतवादविरोधी विभागप्रमुखपदी भारतवंशीय अधिकारी नील बसू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ४९ वर्षीय तरुण तडफदार अधिकारी नील बसू सध्या ब्रिटनच्या महानगर पोलीस विभागात उपसहायक पोलीस आयुक्त म्हणून कर्तव्य बजावत आहेत; परंतु आता त्यांची थेट सहायक आयुक्तपदी वर्णी लागली आहे. यापुढे ते राष्ट्रीय दहशतवादविरोधी विभागात सेवा देणार आहेत. तसेच महानगर पोलिसांतील विशेष अभियानाचे ते प्रमुख म्हणूनही भूमिका बजावणार आहेत. नील बसू हे मार्क राऊली यांचे उत्तराधिकारी बनले आहेत. सीरिया व इराकमध्ये कुख्यात ‘इसिस’मध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या शेकडो ब्रिटिश नागरिकांना परावृत्त करण्याचे विशेष कार्य त्यांनी केले आहे.
2) रवींद्रनाथ टागोरांची स्वाक्षरी असलेल्या पुस्तकाचा अमेरिकेत लिलाव
नोबेल पारितोषिक विजेते तथा भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार रवींद्रनाथ टागोर यांची स्वाक्षरी असलेले ‘द किंग ऑफ द डार्क चैंबर’ या पुस्तकाचा मंगळवारपासून अमेरिकेत लिलाव सुरू झाला आहे. प्रस्तुत पुस्तक हे टागोरांच्या लोकप्रिय बांगला नाटक ‘राजा’चा इंग्रजीतील अनुवाद आहे. ‘द किंग ऑफ द डार्क चैंबर’ या पुस्तकाच्या प्रथम पृष्ठावर फाऊंटेन पेनने रवींद्रनाथ टागोर यांनी स्वाक्षरी केली आहे. द मॅकमिलन कंपनीने १९१६ साली वरील पुस्तकाची बोलपूर आवृत्ती प्रकाशित केली होती. राजा हे नाटक एक करिश्माई, कधीही न पाहिलेले तथा अंतर्यामी राजाच्या अवतीभोवती फिरणारे आहे.
3) ज्येष्ठ साहित्यिक वसंत नरहर फेणे यांचे निधन
कथा, कादंबरी, नाटक, विनोदी लेखन अशा विविध साहित्य प्रकारांत विपुल लेखन करून साहित्य जगतात मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक वसंत नरहर फेणे यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. फेणे यांचा जन्म २८ एप्रिल १९२६ रोजी झाला.’काना आणि मात्रा’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९७२ मध्ये प्रसिद्ध झाला. या कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार प्राप्त झाला. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांची ‘कारवारी माती’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. ‘हे झाड जगावेगळे’, ‘ज्याचा त्याचा क्रूस’, ‘मावळतीचे मृदगंध’, ‘ध्वजा’, ‘निर्वासित नाती’, ‘पहिला अध्याय’, ‘विश्वंभरे बोलविले’, ‘शतकान्तिका’, ‘सहस्त्रचंद्रदर्शन’, ‘सेंट्रल बस स्टेशन’, ‘पिता पुत्र’, ‘पंचकथाई’ ही आणि अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.
4) महिला समुपदेशानासाठी ‘सुहिता’ हेल्पलाइन
महिला आयोगाने ८ मार्चच्या महिला दिनी महिलांना ‘सुहिता’ची भेट दिली आहे. ही समुपदेशानासाठीची हेल्पलाइन आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून समोरच्या महिलेचे म्हणणे ऐकून तिचे समुपदेशन केले जाईल. तसेच तक्रारीचे स्वरूप जाणून घेऊन संबंधित जिल्ह्यातील संबंधित विभागाला या हेल्पलाइनमार्फत ई-मेल करून तातडीने माहिती देण्यात येईल. तसेच या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकता असल्यास= आयोगामध्ये सुनावणीसाठीही बोलावण्यात येईल. हेल्पलाइनसाठी ७४७७७२२४२४ हा फोन नंबर उपलब्ध करून देण्यात आला असून कार्यालयीन कामकाजाच्या वेळात ही हेल्पलाइन सुरू राहणार आहे. ती मराठी आणि हिंदी या दोन भाषांमधून उपलब्ध असल्याने त्याचा फायदा शहरी तसेच ग्रामीण महिलांनाही चांगल्या प्रकारे होणार आहे.
5) माटुंगा, अजनी रेल्वे स्थानकांची जबाबदारी महिलांवर
पश्चिम रेल्वेवरील माटुंगा आणि मध्य रेल्वेवरील नागपूरजवळील अजनी स्थानकाची संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे सोपवून आगळ्यावेगळ्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. महिला दिनी मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनचे सारथ्य करण्याचा मान आशिया खंडातील पहिली महिला चालक म्हणून परिचित असलेल्या सुरेखा यादव यांना देण्यात येणार आहे. तसेच वरिष्ठ साहाय्यक लोको पायलट तृष्णा जोशी व गार्ज श्वेता घोणे यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.