देश-विदेश
लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याला निवडणूक आयोगाचा पाठिंबा
# लोकसभा आणि सर्व राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याच्या कायदा मंत्रालयाच्या प्रस्तावाला केंद्रीय निवडणूक आयोगाने पाठिंबा दिला. मार्च महिन्यात भाजपच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याची कल्पना मांडली होती. वेगवेगळ्यावेळी विविध राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकामुळे सरकारच्या कामावर परिणाम होतो. त्यामुळे एकाचवेळी सर्व निवडणुका घेण्याची मागणी पुढे आली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक आयोगाने कायदा मंत्रालयाला दोनपानी पत्र पाठवले असून, त्यामध्ये प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.
अॅमेझॉन भारतात आणखी तीन अब्ज डॉलर गुंतवणार
# ई-व्यापाराच्या क्षेत्रात भारतात वेगाने पाय पसरवत असलेल्या अॅमेझॉनने देशामध्ये आणखी तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत येथील एका कार्यक्रमामध्ये अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बिझॉस यांनी ही घोषणा केली. या गुंतवणुकीमुळे भारतात रोजगाराच्या आणखी संधी उपलब्ध होणार आहेत.
अमेरिका भारतात सहा अणुभट्टय़ा उभारणार
# नागरी अणुऊर्जा करारानंतर पुढचे पाऊल टाकत अमेरिका भारतात सहा अणुभट्टय़ा उभारणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यात मंगळवारी झालेल्या भेटीत हा निर्णय घेण्यात आला. या पाश्र्वभूमीवर आण्विक पुरवठादार देशांच्या (न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप -एनएसजी) गटाचे सदस्यत्व भारताला मिळण्यासाठी अमेरिकेने मंगळवारी पाठिंबा दिला आहे तसेच क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवणाऱ्या ‘मिसाइल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिम’ (एमटीसीआर) या ३४ देशांच्या गटाचे दरवाजे भारतासाठी उघडण्यासही अनुकूल वातावरण असल्याचे स्पष्ट होत आहे.
नरेंद्र मोदींनी घेतली बराक ओबामांची भेट
# अमेरिकेच्या दौऱयावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉशिंग्टनच्या व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतली. भेटीवेळी नरेंद्र मोदींनी भारत आणि अमेरिका खांद्याला खांदा लावून एकत्र काम करत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे म्हटले. बराक ओबामा हे आपले जवळचे मित्र असून, आम्ही विविध समस्यांवर यावेळी चर्चा केली. यापुढेही दोन्ही देश एकत्रितरित्या काम करत राहतील, असेही मोदी पुढे म्हणाले.
व्ही. नारायणसामी पुडुचेरीच्या मुख्यमंत्रिपदी
# पुडुचेरीचे दहावे मुख्यमंत्री म्हणून सोमवारी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व्ही. नारायणसामी यांनी शपथ घेतली. पुडुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी नारायणसामी यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासमवेत अन्य पाच मंत्र्यांनी शपथ घेतली. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते मुकुल वासनिक, चिन्ना रेड्डी, द्रमुक नेते स्टालिन, ईव्हीकेएस इलनगोवन आदी नेते उपस्थित होते.
महाराष्ट्र
आता दर महिन्याच्या २१ तारखेला राज्यात योग दिन
# योगाचा प्रचार व प्रसार वाढवून महाराष्ट्रात योगमय वातावरण निर्माण व्हावे, यासाठी २१ जून २०१६ या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिनासोबतच प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला राज्यभर शाळा, महाविद्यालये व विद्यापीठ स्तरावर योग दिन साजरा करण्याबाबतचे निर्देश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी येथे दिले.
राज्याची आरोग्य विमा योजना नव्या स्वरुपात
# महात्मा जोतिबा फुले यांच्या १२५ व्या स्मृतीवर्षानिमित्त विद्यमान आरोग्य विमा योजना नवीन स्वरुपात ‘महात्मा जोतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ या नावाने २ ऑक्टोबरपासून संपूर्ण राज्यात एकाच वेळी लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात सध्या राबविण्यात येत असलेल्या जीवनदायी आरोग्य योजनेची मुदत १ ऑक्टोबर २०१६ रोजी संपत आहे. यापूर्वी ही योजना दोन टप्प्यांत सुरू करण्यात आली होती. त्यामुळे राज्यात नव्याने एकाच टप्प्यात या स्वरुपाची योजना लागू करण्याचा सरकारचा मानस होता. त्यानुसार नवी योजना प्रस्तावित करण्यात आली होती. थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या १२५ व्या स्मृती वर्षात त्यांना अभिवादन करण्यासाठी या योजनेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. ही योजना अधिक सर्वसमावेशक आणि प्रभावी ठरण्यासाठी अनेक वैशिष्ट्यपूर्ण तरतुदींचा तिच्यात समावेश करण्यात आला आहे.
क्रीडा
सेरेना विल्यम्स श्रीमंत महिला खेळाडूंमध्ये अव्वल
# अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला भलेही फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाने हुलकावणी दिली, मात्र श्रीमंत महिला खेळाडूंच्या यादीत तिने अग्रस्थान मिळवले आहे. ‘फोर्ब्स’ नियतकालिकाने श्रीमंत महिला खेळाडूंची यादी जाहीर केली असून, यात सेरेनाने टेनिसपटू मारिया शारापोव्हाला मागे टाकले आहे. तिने गेल्या वर्षभरात दोन कोटी ८९ लाख डॉलरची कमाई केली आहे. गेली ११ वर्षे शारापोव्हाने अग्रस्थान राखले होते. मात्र उत्तेजक सेवनाची कबुली दिल्यामुळे तिच्यावर आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातून बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
टेबल टेनिसपटू सौम्यजित घोषची क्रमवारीत झेप
# भारतीय टेबल टेनिसपटूंसाठी ऑलिम्पिक पदक हे खडतर आव्हान आहे. मात्र ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या टेबल टेनिसपटूंनी जागतिक क्रमवारीत आगेकूच केली आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या सौम्यजित घोषने जागतिक क्रमवारीत ६१वे स्थान गाठले आहे. कारकीर्दीत सौम्यजीतचे हे क्रमवारीतले सर्वोत्तम स्थान आहे. सौम्यजितने चार स्थानांनी सुधारणा करत ६१व्या स्थानापर्यंत मजल मारली आहे. अनुभवी शरथ कमालने ७३वरून ६९वे स्थान पटकावले आहे. दिल्लीकर मनिका बात्राने १२८व्या स्थानावरून १३ स्थानांनी सुधारणा करत ११५वे स्थान मिळवले आहे. हे तिघेही रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले असून, आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये दमदार प्रदर्शनामुळेच त्यांनी क्रमवारीत ही वाटचाल केली आहे.
अर्थव्यवस्था
महागाई दराबाबत दक्षतेच्या इशाऱ्यासह, रिझव्र्ह बँकेचे व्याजदर जैसे थे राखणारे धोरण
# सर्वसामान्यांना गृह कर्ज, वाहन कर्जावरील व्याजाचे दर तूर्त वाढणार नाहीत हा दिलासा, परंतु त्यात कपातीसाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागेल, असे सूचित करणारे पतधोरण मंगळवारी रिझव्र्ह बँकेने सादर केली. अपेक्षेप्रमाणे पाऊस चांगला होऊन, अन्नधान्य वितरणाचे व्यवस्थापन नीट झाल्यास महागाईचा चढू पाहणारा पारा येत्या महिन्यांमध्ये स्थिरावणे आवश्यक असल्याचा इशाराही या निमित्ताने गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला. सार्वत्रिक अपेक्षा केली जात होती त्याप्रमाणे रिझव्र्ह बँकेने आपले प्रमुख धोरण दर आहे त्या पातळीवर कायम ठेवत असल्याचे, मंगळवारच्या द्विमासिक आढावा बैठकीनंतर स्पष्ट केले. त्यानुसार बँक दर ७ टक्के, रेपो दर ६.५ टक्के, रिव्हर्स रेपो दर ६ टक्के, रोख राखीवता प्रमाण (सीआरआर) ४ टक्के आणि वैधानिक तरलता प्रमाण (एसएलआर) २१.२५ टक्के या विद्यमान पातळ्यांवर कायम राखण्यात आले आहेत.
महागाई दराबाबत ५ टक्क्य़ांचे लक्ष्य कायम
# रिझव्र्ह बँकेने किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचे जानेवारी २०१७ साठी निर्धारित केलेले ५ टक्क्यांचे लक्ष्य गाठले जाण्याबाबत आशावाद कायम ठेवला आहे. नजीकच्या भविष्यात मात्र त्या संबंधाने साशंकता निर्माण झाली असल्याची चिंताही मंगळवारच्या पतधोरणाने व्यक्त केली. विशेषत: मार्चच्या तुलनेत सरलेल्या एप्रिलमध्ये तब्बल १ टक्का अधिक ५.३९ टक्के अशी महागाई दरातील तीव्र वाढ अपेक्षेपेक्षा अधिक असल्याचे रिझव्र्ह बँकेने म्हटले आहे. विशेषत: घरभाडे, शिक्षण शुल्क, टॅक्सी-ऑटो रिक्शा यांचे भाडे, पाणीपट्टी अशा सेवांच्या दरवाढीसह, अन्नधान्यांच्या किमतीतील वाढीचे स्वरूप तीव्र स्वरूपाचे दिसून आले आहे. प्रति पिंप ५० डॉलरच्या घरात गेलेल्या खनिज तेलाच्या किमती तसेच सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीतून महागाई दरात वाढीच्या शक्यतांची रिझव्र्ह बँकेने दखल घेतली आहे.