1) कल्याणहून सुटणाऱ्या ‘लेडीज स्पेशल’मध्ये मोटरमन, गार्डसह टीसी, आरपीएफ महिलाच
जागतिक महिला दिननिमित्ताने मध्य रेल्वे प्रशासनाने कल्याणहून सुटणा-या लेडीज स्पेशल लोकलची धुरा गुरुवारी महिला मोटरमन मुमताज काझी आणि महिला गार्ड मयुरी कांबळे यांच्यावर सोपवली होती. त्यांनी ही लोकल वेळापत्रकानूसार सीएसएमटीपर्यंत नेली. याच लोकलमध्ये टीसी, आरपीएफ यादेखील महिलाच तैनात करण्यात आल्या होत्या.
2) महाराष्ट्र, दिल्लीतून सर्वाधिक मुले बेपत्ता
गेल्या तीन वर्षांत देशभरातून १ लाख ९३ हजारांपेक्षा अधिक मुले बेपत्ता झाली होती. त्यातील १ लाख ७६ हजार बेपत्ता मुलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. मात्र अद्यापही ५५,६२५ मुले बेपत्ता असून त्यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगालमधील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लोकसभेत उत्तर देताना सांगितले की, २०१४, २०१५ व २०१६ या वर्षात महाराष्ट्रातून अनुक्रमे ११३०१, ४४५० व ४३८८ मुले बेपत्ता झाल्याची प्रकरणे नोंदविली गेली होती. या तीन वर्षांत महाराष्ट्रातून बेपत्ता झालेल्या मुलांपैकी २२८९६ मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आले. मात्र २०१६च्या अखेरीची आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रातील ५६२५ बेपत्ता मुलांचा अद्याप शोध लागलेला नाही.
3) पंतप्रधान मोदींनी घेतली बीएसएफच्या ‘त्या’ जवानाची दखल
21 फेब्रुवारीला बीएसएफच्या 15व्या तुकडीच्या मुख्यालयात झीरो परेड सुरू होती. त्यावेळी जवान संजीव कुमार यांनी एक रिपोर्ट देताना ‘मोदींचा कार्यक्रम’ असा उल्लेख केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाआधी ‘माननीय’ किंवा ‘श्री’ न वापरल्याबद्दल संजीव कुमारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानंतर संजीव यांनी केलेल्या ‘चुकी’बाबत सुनावणी झाली आणि बीएसएफ कायद्याच्या कलम 40 अन्वये त्यांना दोषी धरण्यात आलं. त्या अंतर्गतच त्यांचं सात दिवसांचं वेतन कापण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:या वृत्ताची दखल घेत नाराजी प्रगट केल्यानंतर बीएसएफने हा निर्णय मागे घेतला.
4) अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस जगातील सर्वात जास्त श्रीमंत
फोर्ब्जने जगभरातील श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस जगात पहिल्या क्रमांकावर राहिले. त्यांची एकूण संपत्ती ७.२ लाख कोटी रुपये आहे. अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स असून त्यांची संपत्ती 90 अब्ज डॉलर्सची आहे. गुंतवणूक गुरू अशी ओळख असलेले वॉरन बफेट 84 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर असून बर्नार्ड अरनॉल्ट चौथ्या (72 अब्ज डॉलर्स) व फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग पाचव्या (71 अब्ज डॉलर्स) स्थानावर आहेत. भारतात २.६ लाख कोटींच्या संपत्तीसह मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत ठरले. ३३ व्या स्थानावरून ते १९ व्या क्रमांकावर पोहोचले. भारतात अब्जाधीशांची एकूण संख्या १२१ झाली आहे. याबाबतीत भारत जगात तिसऱ्या स्थानावर आहे. मागील वेळी देशात १०२ श्रीमंत लोक होते. सध्या भारतापेक्षा अधिक श्रीमंत लोक अमेरिकेत (५८५) आणि चीनमध्ये (३७३) आहेत. नीरव मोदीला बाहरे काढले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यादीत ५४४ क्रमांकावरून ७६६ क्रमांकापर्यंत खाली घसरले आहेत. त्यांची संपत्ती २० हजार कोटी रुपये आहे.जिंदल स्टीलच्या अध्यक्षा सावित्री जिंदल भारतात सर्वाधिक श्रीमंत आहेत.
5) भारत आणि चीनमधील व्यापार ८० अब्ज डॉलरच्या वर
भारत आणि चीनमध्ये डोकलामसह इतर मुद्दय़ांवर दोन्ही बाजूंकडून तणावाचे वातावरण असतानाही दोन्ही देशांच्या द्विपक्षीय व्यापारामध्ये गेल्या वर्षी ८४.४४ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा ऐतिहासिक व्यापार झाल्याचे समोर आले आहे. चीनच्या सीमा शुल्क सामान्य प्रशासन विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. २०१७ मध्ये भारताकडून चीनला होणाऱ्या निर्यातीत वाढ झाली असून, ही निर्यात तब्बल ४० टक्क्यांनी वाढून १६.३४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. वर्ष २०१७ मध्ये द्विपक्षीय व्यापार १८.३६ टक्क्यांनी वाढून ८४.४४ अब्ज डॉलर झाला आहे. ही ऐतिहासिक आकडेवारी असून, प्रथमच दोन्ही देशांमधील व्यापार ८० अब्ज डॉलरच्या पुढे गेला आहे. गेल्या वर्षी हा व्यापार ७१.१८ अब्ज डॉलर नोंदवण्यात आला होता.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.