# योगींचा आदेश!; ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’शिवाय नव्या बांधकामांना परवानगी देऊ नका!
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. सरकारी अधिकाऱ्यांचे ‘ऑफिस कल्चर’ झटक्यात बदलणाऱ्या योगी आदित्यनाथ यांनी आणखी एक नवीन आदेश काढला आहे. पाण्याचे महत्त्व जाणलेल्या योगी आदित्यनाथांनी जलसंवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नवीन बांधकामांच्या नकाशात रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणेचा समावेश नसल्यास संबंधित बांधकामांना परवानगी देऊ नये, असे आदेशच त्यांनी काढले आहेत. नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी हे आदेश दिले आहेत.
# पॅन कार्डला आधार कार्डशी जोडणे अनिवार्य
पॅन कार्डला आधार कार्डशी संलग्न करण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र अनेकांना पॅन कार्डला आधार कार्डशी संलग्न करण्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. नावाच्या स्पेलिंग वेगवेगळ्या असल्याने समस्या उद्भवण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र आता ही प्रक्रिया सरळ आणि सोपी करण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्हाला यासाठी फक्त पॅन कार्डची एक स्कॅन केलेली प्रत द्यावी लागेल. आयकर विभागाकडून यासाठी ऑनलाइन पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. आयकर विभागाकडून ई-फाईलिंग पोर्टलवर करदात्यांना आधारला जोडण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. या पर्यायाद्वारे नावात कोणताही बदल न करता वन टाईम पासवर्डचा (ओटीपी) पर्याय निवडावा लागेल. हा पर्याय निवडल्यावर दोन्ही कागदपत्रांवील जन्मदिनांक भरावा लागेल. दोन्ही कागदपत्रांवरील जन्मतारीख सारखी असल्यास आधार कार्डला पॅन कार्डशी जोडता येईल. आधार कार्डला पॅन कार्डशी जोडणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. ‘याविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, यासाठी प्रसारमाध्यमांच्या मदतीने यंदाच्या आठवड्यात प्रयत्न केले जातील,’ अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
# भारतीय नौदलाची चीन, पाकिस्तानसह संयुक्त कारवाई
आशिया खंडातील दोन सर्वात मोठे देश असलेल्या भारत आणि चीनमध्ये कायमच वर्चस्वाची लढाई सुरु असते. त्यातच पाकिस्तान हा भारताचा पारंपारिक शत्रू असल्याने चीनकडून पाकिस्तानला हात दिला जातो. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, यानुसार चीन आणि पाकिस्तान एकत्र येत अनेकदा भारताला अडचणीत आणतात. मात्र एडनच्या आखातात चक्क भारत, चीन आणि पाकिस्तानने संयुक्त कारवाई केली आहे. सोमालियन चाच्यांकडून एका मालवाहू जहाजावर हल्ला करण्यात आल्यानंतर भारत, चीन आणि पाकिस्तानच्या नौदलाच्या जहाजांनी संयुक्त कारवाई केली. शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. ओएस ३५ हे मालवाहू जहाज मलेशियातील केलांगमधून निघाले असताना एडनच्या आखातात त्यावर हल्ला झाला. यानंतर धोक्याचा संदेश मिळाल्यानंतर भारतीय नौदलाची आयएनएस मुंबई आणि आयएनएस तरकश जहाजे ज्या भागात हल्ला झाला, त्या ठिकाणी पोहोचली. ही दोन्ही जहाजे या भागात तैनात असलेल्या चार जहाजांच्या ताफ्याचा भाग होती.
# अमेरिकी नौदलाचा ताफाउत्तर कोरियाकडे रवाना
सीरियावर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर आता अमेरिकी नौदलाचे हल्ला पथक कोरियन द्वीपकल्पाकडे रवाना झाले आहे. उत्तर कोरियाच्या अनियंत्रित अणुकार्यक्रमाविरोधात उत्तर कोरियावर अमेरिका कारवाई करण्याची शक्यता आहे. यामुळे आता कोरिया द्वीपकल्पात तणावाचे वातावरण आहे. सीरियावर क्षेपणास्त्र हल्ले करताना अप्रत्यक्षपणे मुजोर उत्तर कोरियाला तो इशारा होता असे मानले जात आहे. उत्तर कोरियाने गुरुवारी सीरियावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांचा निषेध करताना ते असहनीय आक्रमणच होते, असे म्हटले आहे. उत्तर कोरियाने अनेकदा त्यांच्या अणुकार्यक्रमाचे समर्थन केले आहे. अमेरिकेच्या पॅसिफिक कमांडने कार्ल विन्सन युद्धनौका ताफ्याला पश्चिम प्रशांत महासागरात सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत, असे पॅसिफिक कमांडचे प्रवक्ते कमांडर डेव्ह बेनहॅम यांनी सांगितले. उत्तर कोरिया हा या भागातील मोठा धोका आहे, कारण त्यांनी क्षेपणास्त्र अणुचाचण्या केल्या असून तो बेजबाबदार देश आहे, असे ते म्हणाले. या ताफ्यात निमित्झ वर्गातील यूएसएस कार्ल विन्सन ही विमानवाहू युद्धनौका आहे व ती आता सिंगापूरकडून पश्चिम प्रशांत महासागराकडे निघाली आहे.
# सीरियाप्रश्नी ट्रम्प प्रशासनातच संभ्रम
सीरियातील संघर्षांबाबत अमेरिकेची नेमकी काय भूमिका आहे याबाबत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनामध्येच एकवाक्यता नसल्याचे दिसून येत आहे. सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांनी त्यांच्याच नागरिकांवर रासायनिक शस्त्रांनिशी केलेल्या हल्ल्यांना प्रत्त्युत्तर म्हणून अमेरिकेने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर ट्रम्प प्रशासनातील नेते व अधिकारी जी परस्परविरोधी वक्तव्ये करत आहेत त्यातून हेच स्पष्ट होत आहे. असाद सत्तेत असताना सीरियात शांतता प्रस्थापित होण्याची काहीही शक्यता नाही. ते असताना राजनैतिक तोडगा निघण्याची सुतराम शक्यता नाही. सीरियामध्ये सत्तांतर होण्याची चिन्हे दिसत आहेत, असे अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रांतील राजदूत निक्की हॅले यांनी सीएनएनचे पत्रकार जेक टॅपर यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
# पाकिस्तान विकणार चीनला गाढवं!
उद्योग-व्यापार वाढवण्यासाठी कुणी कोणती शक्कल लढवेल याचा खरंच भरोसा राहिलेला नाही. पाकिस्तानचीही बिझनेस आयडियाही अशीच हटके आहे. एका प्रस्तावित योजनेनुसार आता पाकिस्तान चीनसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी गाढवांचा वापर करणार आहे. देशातील गाढवं चीनला विकण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. या योजनेबाबत ऐकून जरा विचित्र वाटेल पण तेथील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, या योजनेमुळे पाकिस्तानला चांगलाच फायदा होणार आहे. गाढवांच्या कातडीचा चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. गाढवाच्या कातडीपासून मिळणाऱ्या जिलेटिनचा वापर अनेक महागड्या औषधांच्या निर्मितीसाठी केला जातो.
Source – Loksatta