चालू घडामोडी – ९ जुलै २०१६
देश-विदेश
जनमत चाचणीत हिलरी क्लिंटन यांची ट्रम्प यांच्यावर नऊ टक्के मतांची आघाडी
# अमेरिकेच्या अध्यक्षीय उमेदवारीच्या लढतीतील जनमत चाचणीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ९ टक्क्यांची आघाडी घेतली असून, दहा मतदारांपैकी चार मतदारांनी मात्र दोघेही उमेदवार अमेरिकेसाठी चांगले अध्यक्ष नाहीत असे म्हटले आहे. अमेरिकेतील प्यू रीसर्च सेंटर या संस्थेने केलेल्या पाहणीत असे दिसून आले ,की क्लिंटन (वय ६८) यांना ५१ टक्के ,तर रिपब्लिकन ट्रम्प (वय ७०) यांना ४२ टक्के मते मिळाली आहेत. असे असले तरी गेल्या दोन दशकांत प्रथमच उमेदवारांबाबत मतदार असमाधानी आहेत. सध्या ४३ टक्के डेमोक्रॅट व ४० टक्के रिपब्लिकनांना त्यांच्या अध्यक्षीय उमेदवार निवडीबाबत समाधान आहे.
संरक्षण उत्पादनात सहकार्याची भारत, द. आफ्रिकेची तयारी
# संरक्षण सामग्रीचे उत्पादन व खाणकाम व खनिजे यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील प्रतिबद्धता अधिक सुदृढ करण्यास भारत व दक्षिण आफ्रिका यांनी शुक्रवारी संमती दर्शवली. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी ‘सक्रिय’ सहकार्य करण्याचा निश्चयही त्यांनी व्यक्त केला. भारत हा संरक्षण उपकरणांचे उत्पादन करण्यासाठी सुयोग्य ठिकाण असून, केवळ एकमेकांची गरज पूर्ण करण्यासाठीच नव्हे तर प्रादेशिक व जागतिक गरजेला प्रतिसाद देण्यासाठी दोन्ही देश एकत्र येऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर सांगितले. जागतिक स्तरावर दक्षिण आफ्रिका हा संरक्षण सामग्रीच्या उत्पादनात एक महत्त्वाचा देश मानला जातो. अणू पुरवठादार गटाच्या (एनएसजी) सदस्यत्वासाठी भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा दिल्याबद्दल मोदी यांनी या वेळी झुमा यांचे आभार मानले.
दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारताचे बांगलादेशला सहकार्य
# बांगलादेशात इस्लामी कट्टरवाद्यांच्या हल्ल्यांच्या मालिकेचा परिणाम म्हणून पसरणाऱ्या ‘द्वेष, हिंसाचार आणि दहशत’ यांच्या विचारधारांच्या धोक्यापासून समाजाला वाचवण्यासाठी आपण बांगलादेशच्या खांद्याला खांदा लावून काम करू, असे भारताने सांगितले आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी बांगलादेशचे समपदस्थ ए.एच. महमूद अली यांना लिहिलेल्या पत्रात दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारताचे सहकार्य देऊ केले आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी ‘सर्वसमावेशक उपाययोजना’ करण्याचाही प्रस्ताव त्यांनी दिला आहे.
क्रीडा
विशाल माने आणि पूजा शेलार सर्वोत्तम कबड्डीपटू
# महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांच्या जन्मदिनी मधू पाटील स्मृती पुरस्कार मुंबईच्या विशाल मानेला आणि अरुणा साटम स्मृती पुरस्कार पुण्याच्या पूजा शेलारला देऊन गौरवण्यात येणार आहे. याचप्रमाणे मुंबईचे शिवाजी भांदिग्रे आणि ठाण्याचे देवराम भोईर यांना कृतज्ञता पुरस्कार देण्यात येणार आहेत. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली बालगंधर्व रंगमंच, रिलायन्स टाऊनशिप, नागोठणे, ता. रोहा, जिल्हा रायगड येथे १५ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात नीलेश साळुंखे (ठाणे) आणि अपेक्षा टाकळे (मुंबई) यांना सर्वोत्तम चढाईपटूचे पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह अॅड. आस्वाद पाटील यांनी दिली.
अर्थव्यवस्था
साखर उत्पादन सात टक्क्यांनी कमी होणार!
# भारतात साखरेचे उत्पादन आगामी विपणन वर्षांत सात टक्क्यांनी कमी होऊन ते २३.२६ दशलक्ष टन इतके होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमधील गळीत हंगाम संपुष्टात आल्यानंतर साखरेचे विपणन वर्ष सुरू होत असून महाराष्ट्र व कर्नाटकात कमी पावसामुळे साखर उतारा कमी होण्याचे कयास आहेत. साखरेचे उत्पादन लागोपाठ दुसऱ्या वर्षी म्हणजे २०१६-१७ मध्ये कमी होणार असून महत्त्वाच्या ऊस उत्पादक राज्यातील दुष्काळाचा हा परिणाम आहे. भारतीय साखर कारखाना महासंघाच्या अंदाजानुसार, २०१६-१७मध्ये साखर उत्पादन २३.२६ दशलक्ष टन होईल ते २०१५-१६च्या तुलनेत १.८ ते १.९ दशलक्ष टन इतके कमी असेल. २०१५-१६ मध्ये २५.१ दशलक्ष टन इतके उत्पादन झाले होते. तर त्या आधी २०१४-१५ मध्ये २८.४ दशलक्ष टन उत्पादन झाले होते. साखर उत्पादनात भारत ब्राझीलनंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
प्रत्यक्ष कर संकलनात २५ टक्के वाढ
# अग्रिम कर भरणा टप्पा विस्तारल्याचा लाभ देशातील प्रत्यक्ष कर संकलनात वाढ होण्यासाठी झाला आहे. एप्रिल ते जून या २०१६-१७ आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत प्रत्यक्ष कर संकलन २४.७९ टक्क्य़ांनी वाढून १.२४ लाख कोटी रुपये झाले आहे. संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी राखलेले अर्थसंकल्पीय उद्दिष्ट पहिल्या तीन महिन्यांत १४.६३ टक्क्य़ांनी पूर्ण झाले आहे. पहिल्या तिमाहीत वैयक्तिक प्राप्तिकर संकलन २९.८ टक्क्य़ांनी, तर कंपनी कर संकलन १३.५ टक्क्य़ांनी वाढले आहे. परताव्यानंतरचे प्रत्यक्ष कर संकलन ४८.७५ टक्के, तर कंपनी कर ४.४३ टक्के नोंदले गेले आहे. एप्रिल ते जून २०१६ मध्ये वैयक्तिक प्राप्तिकरात परताव्याचे प्रमाण वार्षिक तुलनेत वाढले आहे.
पेटीएमद्वारे अल्प व्याजदरातील कर्जाची सुविधा
# सर्वात मोठे मोबाइल पेमेंट व्यासपीठ असलेल्या पेटीएमने व्यापाऱ्यांसाठी खेळते भांडवल म्हणून पतपुरवठय़ाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पेटीएमने यासाठी विविध वित्त-संस्थांशी करार केला आहे. पेटीएमचे भागीदार म्हणून संबंधित दुकानदाराच्या उपलब्ध इतिहासावरून त्याला हे कर्ज दिले जाणार आहे. यामुळे देशभरातील छोटय़ा दुकानदारांना पहिल्यांदाच औपचारिक पतपुरवठा खुला होणार आहे. किराणा दुकाने, औषधांचे दुकानदार आणि रिक्षाचालक असे छोटे व्यावसायिक आज ग्राहकांकडून येणारे शुल्क पेटीएमद्वारे स्वीकारून इतिहास घडवीत असून त्यांना या बदल्यात आता सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायांच्या तुलनेत बऱ्याच कमी व्याजदरात सहजसाध्य कर्जाचा फायदा मिळणार आहे. डिसेंबर २०१६पर्यंत १० लाख छोटय़ा व्यावसायिकांना या पत सुविधेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. पुढील वर्षांच्या अखेपर्यंत ४० लाख छोटय़ा व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असून त्यात किराणा दुकाने, रिक्षा व टॅक्सीचालक, दुधवाले अशांचा समावेश असेल, अशी माहिती पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष किरण वसिरेड्डी यांनी दिली.