⁠  ⁠

Current Affairs 1 February 2018

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 5 Min Read
5 Min Read

1) आनंदी जीवनाच्या बाबतीत शिकागो टॉपवर

आनंदीपणा आणि मौजमस्ती जीवनाच्या बाबतीत जागतिक क्रमवारीत अमेरिकेतील शिकागोने सलग दुसऱ्यांदा अव्वल स्थान मिळविले आहे. ३२ शहरांच्या या यादीमध्ये पोर्तुगालच्या किनारी भागातील पोर्टो शहर दुसऱ्या तर नाइट लाइफसाठी जगप्रसिद्ध असणारे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर तिसऱ्या स्थानावर आहे. ब्रिटिश संस्कृती आणि मनोरंजन मासिक ‘टाइम आऊट’कडून मंगळवारी यासंबंधीची क्रमवारी जारी करण्यात आली. या रँकिंगमध्ये अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेल्या शिकागोने अनेक शहरांना पाठीमागे टाकत पुन्हा बाजी मारली आहे. अन्नपदार्थ, पेय, संस्कृती, मित्रत्व, परवडण्याजोगे ठिकाण, आनंददायी जीवन आणि जिवंतपणा अशा विविध पैलूंच्या आधारावर मासिकाकडून प्रत्येक वर्षी शहर जीवन निर्देशांक जारी केले जाते. यामध्ये सुरक्षितता वगळता बाकी सर्व पैलूंमध्ये शिकागोने आघाडी मिळवली आहे. तर आपल्या जिवंतपणा व आनंदीपणाच्या जोरावर पोर्तुगालच्या पोटार्े शहराने दुसरे स्थान पटकावले आहे. आपल्या नाइट लाइफ व संस्कृतीसाठी ओळखले जाणारे न्यूयॉर्क तिसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वेक्षणातील बहुतांश लोकांनी चालू वर्षात न्यूयॉर्कला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहर चौथ्या तर ब्रिटनची राजधानी लंडन हे पाचव्या स्थानावर आहे. मासिकाने ३२ शहरांमधील १५ हजार लोकांचे सर्वेक्षण करत शहर जीवन निर्देशांक जारी केले आहे. निर्देशांकानुसार न्यूयॉर्कमध्ये सर्वात चांगली नाइट लाइफ आहे. यादीमध्ये १४ व्या स्थानावर असलेल्या पॅरिसमध्ये सर्वाधिक सक्रिय लैंगिक जीवन आहे. टेक्सासमधील ऑस्टिन शहर खास लाइव्ह संगीतासाठी सर्वोत्कृष्ट असल्याचे यात म्हटले आहे. तर चीनमधील महत्त्वाचे शहर आणि जागतिक आर्थिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे शांघाय शहर या यादीमध्ये १६ व्या क्रमांकावर आहे.

2) लातूरला मेट्रो, लोकलच्या डबेनिर्मितीचा प्रकल्प

लातूरला मेट्रो व ईएमयू (लोकल) डब्यांचा कारखाना उभारला जाईल. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. बुधवारी रात्री मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची एक बैठक झाली. यात लातूरला डबेनिर्मिती करणाऱ्या कारखान्याला मंजुरी देण्यात आली असल्याचे स्वत: रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केले. लातूर व उस्मानाबाद जिल्हे दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. कृषी क्षेत्रात अनंत अडचणी आहेत. पाण्याअभावी शेतीचे उत्पन्नही मोजकेच होते. या भागात कृषीकडून उद्योगांकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने सरकारने उचललेले हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. वर्षभरात साडेतीनशे ते चारशे डब्यांची निर्मिती होऊ शकते. मुंबई व महत्त्वाच्या शहरांत सध्या ईएमयू लाेकल धावते. लोकलच्या डब्यांची निर्मिती मेक इन इंडियाअंतर्गत. जमीन व करांतही सवलत देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने दिला. टेंबीत ३५० एकर संपादित जागा आहे. उर्वरित जमीन देण्यास परिसरातील शेतकऱ्यांची तयारी.

3) शहीदांच्या कुटुंबियांना आता २५ लाख, मुख्यमंत्र्यांची घोषणा

आपल्या राज्यात शहीदांच्या कुटुंबियांना केवळ साडे आठ लाख रुपये दिले जातात. मात्र भविष्यात हा निधी २५ लाख रुपये इतका करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. अथर्व फाउंडेशन आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडियाच्या सभागृहात हा कार्यक्रम पडला़ त्यात सैन्यातील जवानांचा आणि शहीद कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. ‘वन फॉर आॅल, आॅल फॉर वन’ ही या कार्यक्रमाची संकल्पना होती. फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील राणे यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच जवानांचा सन्मान करणारा कार्यक्रम पार पडला.

4) लोकशाही निर्देशांकात भारताची घसरण

दरवर्षी जागतिक स्तरावर देशांचा लोकशाही निर्देशांक काढला जातो. यंदा यात सुमारे १० ने घसरण होऊन भारत लोकशाही निर्देशांकात ४२ व्या स्थानी आला आहे. भारताचे वर्गीकरण ‘सदोष लोकशाही’ गटात झाले आहे. या जागतिक निर्देशांकात नॉर्वेने नेहमीप्रमाणे अव्वल स्थान राखले आहे. इंग्लंडमधील इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (इआययु) ही पाहणी करते. एकूण १६५ स्वतंत्र देश व दोन प्रदेशांची पाहणी करून अहवाल तयार केला जातो. निवडणूक प्रक्रिया, बहुविधता, नागरी स्वातंत्र्य, सरकारचे कामकाज, राजकीय सहभाग व राजकीय संस्कृती या निकषांच्या आधारे लोकशाही निर्देशांक काढला जातो. त्यानुसार देशांचे वर्णन वर्गीकरण पूर्ण लोकशाही, सदोष लोकशाही, संकरित सरकार, व हुकुमशाही सरकार असे केले जाते. अमेरिका (२१ वा क्रमांक), जपान, इटली, फ्रांस, इस्त्रायल, सिंगापूर, हाँगकाँग यांचा समावेश ‘सदोष लोकशाही’ गटात आहे. यादीतील पहिल्या १९ देशांना ‘पूर्ण लोकशाही’चा दर्जा मिळाला आहे. पाकिस्तान (११०), बांग्लादेश (९२) व भूतान (९९) यांचा समावेश ‘संकरित सरकारे’ या गटात आहे. ‘हुकूमशाही सरकारे’ गटात चीन (१३९), म्यानमार (१२०), रशिया (१३५) आणि व्हिएतनाम (१४०) आहेत आणि उत्तर कोरिया शेवटच्या (१६७ ) व सीरिया १६६ व्या स्थानावर आहे.

MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.

Share This Article