Current Affairs 25 January 2018
1) किराणा दुकानांमध्ये तंबाखू विक्रीवर बंदी
किराणा तसेच अन्य दुकानांतून तंबाखू व तंबाख पदार्थांच्या विक्रीवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. ज्या दुकानातून ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी) विक्री होते अशा दुकानात आता विक्रीसाठी तंबाखू ठेवता येणार नसल्याचे राज्याच्या अन्न व औषधी प्रशासनाने बुधवारी स्पष्ट केले. याशिवाय सुगंधी सुपारीवरील बंदीला जुलै २०१८ पर्यंत मुदतवाढ दिल्याचे प्रशासनाने सांगितले. दरम्यान, शाळा व महाविद्यालयांचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी ६ फेब्रुवारीपासून विशेष मोहीम राबवण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.
2) मुंबईत उभे राहणार ‘विंदां’चे राष्ट्रीय स्मारक
मराठीतील श्रेष्ठ कवी, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त विंदा करंदीकरांचे राष्ट्रीय स्मारक मुंबईत उभे राहणार आहे. चेतना महाविद्यालय आणि विंदा करंदीकर स्मारक समिती यांच्या संयुक्त प्रयत्नातून राष्ट्रीय स्मारक उभारण्याचे कार्य सुरू झालेले आहे. वांद्रे पूर्वेकडील चेतना महाविद्यालयात हे स्मारक उभारण्यात येत आहे. यंदा विंदांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या वर्षाची सांगता २३ आॅगस्ट २०१८ रोजी होत आहे. राष्ट्रीय स्मारकाची उभारणी आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार विंदा करंदीकर स्मारक समिती आणि चेतना महाविद्यालय यांनी केला आहे.
3) महाराष्ट्रातील ३ पोलीस अधिका-यांना राष्ट्रपती पोलीस पदक, ७ जणांना शौर्य
राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण ४९ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये ३ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक, ७ जणांना पोलीस शौर्यपदक तर ३९ जणांना पोलीस पदक जाहीर झाली आहेत. यावर्षी यातंर्गत १०७ पोलीसांना पोलीस शौर्य पदक, ७५ पोलिसांना उत्कृष्ट सेवा राष्ट्रपती पोलीस पदक आणि ६१३ पोलिसांना पोलीस पदक जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या एकूण ४९ पदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये प्रशिक्षण आणि विशेष विभाग, मुंबईचे अतिरीक्त महासंचालक एस जगन्नाथ, वागळे इस्टेट ठाणेचे सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले आणि नंदुरबार येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उपनिरीक्षक विनायक राजपूत यांचा समावेश आहे.
4) चारा घोटाळा : लालूंना आणखी पाच वर्षे शिक्षा
कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्याशी संबंधित तिस-या खटल्यातही बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आणखी एक माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही ५ वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे. चैबासा कोषागारातून १९९० मध्ये बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपये ३७.६२ कोटी परस्पर काढल्याप्रकरणी यादव व मिश्रा यांना ५ वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा, तसेच लालू प्रसादना १० लाख रुपये, तर मिश्रा यांंना ५ लाख रुपयांचा दंडही सुनावण्यात आला आहे. आधीच्या चारा घोटाळ्यात शिक्षा सुनावल्यापासून लालू २३ डिसेंबरपासून तुरुंगात आहेत. दंड न भरल्यास लालू व मिश्रा यांना आणखी एक वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल.
या प्रकरणात आणखी ३ माजी आमदार व १ मंत्री यांनाही दोषी ठरविले असून, त्यांनाही शिक्षा व दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय ३ माजी प्रशासकीय अधिकारीही दोषी ठरले आहेत. मात्र, पशुसंवर्धन विभागाचे दोन अधिकारी व चारा पुरवठादारांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात एकूण ७६ आरोपी होते. पैकी १४ जणांना मृत्यू झाला असून, २ आरोपींना साक्षीपुराव्याआधारे दोषी ठरविण्यात आले आहे, तर ३ आरोपी माफीचे साक्षीदार बनले आहेत. १ आरोपी अद्याप फरार आहे.
5) देशातील पहिले राज्य : सिक्कीममध्ये यापुढे केवळ सेंद्रिय भाज्या, फळे
येत्या १ एप्रिल, २०१८ पासून सिक्कीममध्ये केवळ आणि केवळ रसायनांचा वापर न करता पिकवलेल्या सेंद्रिय भाज्याच मिळणार आहेत. एवढेच नव्हे, तर रसायनांचा वापर करून पिकवलेल्या (असेंद्रिय) भाज्या आणि फळे यांच्यावर सिक्कीमध्ये बंदी घालण्यात आली आहे. अन्य राज्यांतून रसायनांचा वापर करून पिकवलेल्या भाज्या येऊ न देण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे. केवळ सेंद्रिय कृषी उत्पादने म्हणजे भाज्या आणि फळेच उपलब्ध असणारे सिक्कीम हे त्यामुळे भारतातील पहिले राज्य असेल. २०१०मध्ये सिक्कीम आॅर्गनिक मिशनची स्थापना करून प्रारंभिक प्रकल्पात ८,१५० हेक्टर्स सेंद्रिय शेतीला सुरुवात झाली. आज राज्यातील लागवडयोग्य ७७ हजार हेक्टर्सपैकी ९९ टक्के शेती सेंद्रिय व्यवस्थापनाखाली आहे. १५ वर्षांपूर्वी सिक्कीम पूर्णपणे सेंद्रिय शेतीचे राज्य करण्याची विधानसभेत केलेली घोषणा आता प्रत्यक्षात आली आहे. विद्यमान मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांनीच २००३मध्ये ही घोषणा केली होती.
MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.