Current Affairs 20 December 2019
राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धा : राहीला सुवर्णपदक
आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या राही सरनोबतने ६३व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात बुधवारी सुवर्णपदक पटकावले. कनिष्ठ गटातील सुवर्णपदक विजेत्या मनू भाकरला वरिष्ठ गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
महिलांच्या वरिष्ठ गटात राहीने ५८९ गुण मिळवले, तर अंतिम फेरीत ४१ गुण मिळवले. मनूला प्राथमिक फेरीत ५८२ आणि अंतिम फेरीत ३२ गुण मिळाले. राहीने अंतिम फेरीत नऊ गुणांच्या फरकाने सुवर्णपदकावर वर्चस्व गाजवले. या गटातील कांस्यपदक महाराष्ट्राच्या अभिज्ञा पाटीलला मिळाले. प्राथमिक फेरीत तिला ५७५ आणि अंतिम फेरीत २७ गुण मिळाले. महाराष्ट्राला १७३८ गुणांसह सांघिक सुवर्णपदक मिळाले, तर हरियाणाला (१७०९ गुण) दुसरे स्थान मिळाले.
म्युनिच (जर्मनी) येथे मे महिन्यात झालेल्या ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकताना राहीने टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारातील एक स्थान निश्चित केले होते.
‘एक भारत’साठी रेल्वेत ५० टक्के सवलत
केंद्र सरकारच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या पाच हजार रुपयांपेक्षा कमी मासिक उत्पन्न असलेल्या तरुणांना रेल्वेचा दुसरा वर्ग/ स्लीपर वर्गाच्या मूळ भाड्यामध्ये ५० टक्के सवलत देण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे. सामान्य रेल्वे सेवांसाठी विशेष बाब म्हणून ही सवलत देण्यात आली असून विशेष रेल्वे वा डब्यांसाठी ही सवलत मिळणार नाही. तसेच आरक्षण शुल्कासह अन्य शुल्क संबंधित सहभागीला पूर्णपणे भरावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे
सर्वाधिक वेतन देण्यात बेंगळुरू अव्वल
नोकरदारांमध्ये सर्वाधिक वेतन घेणाऱ्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी अव्वल स्थान पटकावले असून, सर्वाधिक वेतन देणाऱ्या शहरांमध्ये आयटी नगरी बेंगळुरूने यंदा बाजी मारून ‘हॅट्ट्रिक’ लाधली आहे. २०१७ आणि २०१८मध्येही सर्वाधिक वेतन देणाऱ्या शहरांच्या यादीतही बेंगळुरूच अव्वल होते.
‘रँडस्टँड इनसाइट्स सॅलरी ट्रेंड्स रिपोर्ट २०१९’ या अहवालात नमूद केल्याप्रमाणे बेंगळुरूमधील कनिष्ठ कर्मचाऱ्याला वार्षिक ५.२७ लाख रुपये, त्यापेक्षा अधिक अनुभवी कर्मचाऱ्याला वार्षिक १६.४५ लाख रुपये आणि वरिष्ठ कर्मचाऱ्याला वार्षिक ३५.४५ लाख रुपये वेतन मिळत आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या गटात वार्षिक ५ लाख रुपये आणि ४.५९ लाख रुपयांचे वेतन देऊन हैदराबाद आणि मुंबई यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे. मध्यम गटातील कर्मचाऱ्यांच्या गटात वार्षिक १५.०७ लाख रुपये आणि १४.५ लाख रुपयांचे वेतन देऊन मुंबई आणि नॅशनल कॅपिटल रिजनने दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे. या शिवाय मुंबई आणि पुण्याने वार्षिक ३३.९५ लाख रुपये आणि ३२.६८ लाख रुपये वेतन देऊन अतिवरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या गटात दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे.