⁠  ⁠

मना बी पोरा एक दिन कलेक्‍टर हुई…

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 6 Min Read
6 Min Read

rajendra_bharud_ias

शाळेचा पहिला दिवस मला आजही लख्ख आठवतोय… मी सकाळपासून रडत होतो. पाटी, पेन्सिल, पुस्तक एका नायलॉनच्या पिशवीत टाकून माय मला घेऊन शाळेकडे निघाली. माझं रडणं सतत चालूच होतं. मध्येच मायच्या हाताला जोराचा झटका देत, मी मोठमायच्या घराकडे धावत सुटलो… मोठमायच्या घरात जाणं म्हणजे आगीतून निघून फुफाट्यात सापडणं होतं, हे त्या वेळी माझ्या बालमनाला समजत नव्हतं. मोठमाय म्हणजे महाकाली. तिने सरळ मला उचललं आणि मायला सोबत घेऊन थेट मला हेडमास्तरांकडे घेऊन गेली. मी निषेध म्हणून जमिनीवर पडून गडबडा लोळत होतो. पण या दोघीही माझ्याकडे जराही ढुंकून न पाहता घरी निघून गेल्या…

धुळे जिल्हा हा एक आदिवासीबहुल जिल्हा… याच जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सामोडे गावात एका भिल्ल कुटुंबात माझा जन्म झाला. घरामध्ये कर्ता पुरुष कोणीही नसला तरी दोन खमक्या बायका होत्या… माय, मोठमाय (मावशी), मोठा भाऊ, मोठी बहीण आणि एक म्हैस असा आमचा कुटुंबकबिला. आमच्या भिलाटीमध्ये शिक्षण, शाळा याचा कित्येक वर्षे कुणाचाही दुरान्वये संबंध आला नव्हता. चुकून कधीतरी एखादा मुलगा फाटका सदरा आणि ठिगळ लावलेली चड्डी घालून मध्येच कळपातून चुकलेल्या वासरासारखा शाळेत जाताना दिसे, पण तेवढाच… त्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या. अशा परिस्थितीत मोठमाय आणि मायने शाळेत माझे नाव घातले. तिथेच माझ्या आयुष्याच्या बदलाला सुरुवात झाली. मावशी आणि आई निरक्षर असली तरीही शिक्षणाचे महत्त्व त्यांना कळले होते. कदाचित त्याचमुळे मला शाळेत पाठवण्याचा अट्टहास होता…

पाठीवर बि-हाड घेऊन फिरणारी आम्ही भिल्ल समाजातील माणसं… पोट नेईल तिथं जायचो. असेच आमचे पूर्वज कधीतरी सामोड्यामध्ये येऊन स्थिरावले… काही भिल्लांची स्वत:च्या मालकीची जमीन असली तरी पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे शेवटी मजुरीसाठी परप्रांतात जावंच लागत असे. बहुतेककरून आमच्या खान्देशातील भिल्ल गुजरातेत जात असत. बहुसंख्यांकडे ना स्वत:चा व्यवसाय ना शेतजमीन; रानावनात राहणारे आम्ही, मासे पकडणे अथवा दारू गाळणे हा व्यवसाय करीत असू. घरातील लहान-थोर सर्वच दारू पीत. त्यामुळे दारू हे व्यसन वाईट असून ते करू नये, असे सांगणारे घरात कुणीच नाही. अशा वातावरणात मी वाढलो. मी आईच्या पोटात असतानाच वडील गेले. गर्भपात करून घेण्यासाठी प्रचंड दबाव असताना माझ्या आईच्या बाजूने ठामपणे उभ्या राहणा-या मावशीने आईला आणि माझ्या दोन्ही भावंडांना तिच्या घरी आणले. आमच्या सामोड्यामध्येदेखील अभिजनांची शाहू वस्ती होती. तेथील मुले शाळेत जात.

…माझी शाळेमधली प्रगती उत्तरोत्तर उंचावत गेली. पुस्तकी अभ्यासाबरोबरच इतर गोष्टींमध्ये मला गती होती. आता शाळेतील शिक्षक घरी येऊन माझी प्रगती सांगत होते. मी प्रगती करतो म्हणजे काय, हे जरी कळत नसलं तरी मी काही तरी चांगलं करतोय आणि म्हणूनच शाळेतले शिक्षक घरी येताहेत, इतकंच मायला आणि मोठमायला कळत होतं. मी दहावीत असतानाच, माझ्या ब-याचशा मित्रांची लग्नं झाली होती. म्हणजे 15-16व्या वर्षीच माझ्या मित्रांची लग्नं होऊन ते भिलाटीतील इतरांसारखे मजुरीवर जात होते. शाळा शिकाऊन पो-याला कोठे नोकरी लागाऊ शे? घर राही त पैसा तरी कमाई, असा साधारण सगळ्यांचा सूर होता. खरे तर त्या पालकांचे म्हणणे बरोबर होते. कारण गरिबीमुळे शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाला हातभार लावणे, ही त्या क्षणाची गरज होती.

अगदी माझ्या मामा, काका यांची पोरंसुद्धा कधीच शाळेत गेली नाहीत. या सर्वांचा खरा शत्रू गरिबी होती असं नव्हे; तर अज्ञान होतं, असंच मला वाटतं. कदाचित हेच आमच्या मायला आणि मोठमायला कळलं होतं आणि म्हणूनच गावातल्या शाळेतून नंतर मला ‘नवोदय’ या अक्कलकुव्याच्या शाळेत शिक्षकाच्या आग्रहाखातर पाठवले. माझ्या आयुष्यात सुदैवाने चांगली माणसे आली. बारावीनंतर इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा, असं मनात होतं. कारण गणितामध्ये चांगले मार्क मिळत होते. परंतु इंजिनिअर झालास तर केवळ तुझा आणि तुझ्या कुटुंबीयांचाच फायदा होईल; आणि डॉक्टर झालास तर संपूर्ण समाजाला त्याचा फायदा होईल. शिवाय डॉक्टर झाल्यानंतर प्रशासक झालास तर अधिक व्यापक प्रमाणात लोकसेवा करता येईल, हे माझ्या देवरे सरांनी समजावून सांगितले… जी. एस. मेडिकलसारख्या नावाजलेल्या कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला. सामोड्यातील नवोदयसारख्या ग्रामीण भागातील शाळेमध्ये कधी जातीवरून माझी क्षमता जोखली गेली नव्हती. मात्र मुंबईसारख्या आधुनिक विचारांच्या शहरामध्ये असा अनुभव आला. खरे तर मला त्यांची कीव वाटली होती. पण या गोष्टी उराशी कवटाळून, मला माझी प्रगती रोखायची नव्हती… सामोड्यातून ‘केईएम’मध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आलेला एक आदिवासी मुलगा उत्तम गुणांनी डॉक्टर झाला होता. ज्या ‘केईएम’मध्ये सुरुवातीला तुच्छतेची वागणूक मिळाली होती, त्याच ‘के ईएम’मध्ये ‘बेस्ट स्टुडंट अवॉर्ड’ मिळवून मी स्वत:ला सिद्ध केले. त्या वेळच्या मुलाखतीदरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन समाजाची सेवा करणार असल्याचे मी सांगितले होते. पहिल्या प्रयत्नात माझी ‘इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस’साठी निवड झाली होती; परंतु ‘आयएएस’ बनण्याचे ध्येय पक्के असल्याने मी पुन्हा एकदा प्रयत्न करून 2012मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि अखेर आयएएस झालो… एक ध्येय गाठले…

आयुष्य एका नव्या वळणावर उभे असताना मला लहानपणी घडलेला प्रसंग आठवतोय… भिलाटीमध्ये आमच्या घरी घरखर्चाला हातभार लावण्यासाठी आम्ही आमचा दारू विकण्याचा पारंपरिक व्यवसाय करीत असू. गावातील लोक दारू पिण्यासाठी घरीच येत असत. ब-याच वेळेस आम्हा लहान मुलांना त्यांना चखणा वगैरे आणून द्यावे लागत असे.

माझी परीक्षा असली की साहजिकच मी ही कामं करायला तयार होत नसे, यावरून आमच्या एका गि-हाइकाने, तो-यात ‘जाय थोडं काम करीये, शिकसीन मोठा डाक्टर-कलेक्टर व्हनार शे’ असं हिणवून मला चखणा आणायला सांगितले. मी रडू लागलो, तेव्हा आईने त्या गि-हाइकाला सांगितले, ‘मना बी पो-या एक दिन डाक्टर-कलेक्टर हुई. तुम्ही चखणा आज दुस-या कडतीनं मांगडा, आनी याले अभ्यास करू द्या!’

(शब्दांकन – विकास नाईक)
साभार दैनिक दिव्य मराठी
[email protected]
सौजन्य- ‘मी एक स्वप्न पाहिलं’
(दीपस्तंभ प्रकाशन)

Share This Article