- आरटीओमध्ये निवड झालेल्या 118 साहाय्यक मोटार पदी नियुक्त झालेल्या उमेदवारांना नोकरीत सामावून घेण्याच्या निर्णयानंतर आता राज्यसेवा परीक्षा 2017 आणि 2018 मध्ये उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या उमेदवारांना एकत्रित प्रशिक्षण कार्यक्रमअंतर्गत रुजू होण्याचे आदेश काढण्याची कार्यवाही सुरु असल्याचं सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
- राज्य सेवा परीक्षा 2017 आणि राज्यसेवा परीक्षा 2018 मध्ये उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आज शासनाने माहिती दिली की, राज्यसेवा परीक्षा 2017 च्या निकालाच्या अनुषंगाने शिल्पा साहेबराव कदम यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात समांतर आरक्षणाशी संबंधित याचिका दाखल केली होती. ही याचिका तसेच समांतर आरक्षणासंदर्भातील इतर याचिका यावरील विशेष सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने 8 ऑगस्ट 2019 रोजी अंतिम आदेश दिले.
- उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2017 साठी शिफारस करण्यात आलेल्या 377 उमेदवारांची सुधारित यादी 9 सप्टेंबर 2019 रोजी शासनास प्राप्त झाली. हे 377 उमेदवार आणि राज्य सेवा परीक्षा 2018 अन्वये शिफारसप्राप्त 129 असे एकूण 506 उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांची मान्यता प्राप्त झाली आहे.
राज्यसेवा परीक्षा 2017-2018 च्या 506 उमेदवारांच्या नियुक्ती प्रस्तावास शासन मान्यता

By Chetan Patil
Updated On:
