एमपीएससी : चालू घडामोडींचे सर्वव्यापी स्वरूप
कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा पेपर दिल्यावर काही उमेदवारांची एक प्रतिक्रिया असते, ती म्हणजे आपण वाचलेल्या पुस्तकांतून प्रश्नच येत नाहीत. चालू घडामोडींचा नेमका आणि विश्वासार्ह स्रोतच कळत नाही. चालू घडामोडींची व्याप्ती फार आहे, असा समज करून घेतला की स्पर्धा परीक्षेच्या मूळ दृष्टिकोनापासून ‘भरकटणे’ सोपे होते. व्याप्ती फार आहे असे समजून व्याप वाढवून घेण्यापेक्षा योग्य विश्लेषण करून आपला अभ्यास योग्य दिशेने जाईल, याची काळजी घेतली पाहिजे.
चालू घडामोडी म्हणजे ‘काय वाट्टेल ते’ विचारले जाऊ शकते या मुक्त छंदातून बाहेर पडायला हवे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाला, मग ती केंद्र, राज्य कोणतीही असो, त्या अभ्यासक्रमाला एक निश्चित चौकट असते, हे समजून, आपला अभ्यास ‘मिनिमाईज’ करायला हवा. प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बघता राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, पर्यावरण, भूगोल, विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकांच्या चच्रेतील मुद्दय़ांचा समावेश प्रश्नांमध्ये केलेला दिसून येतो. प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून लक्षात येईल की चालू घडामोडी घटकात पुढील तीन प्रकार समाविष्ट असतात –
- सामान्य अध्ययनामध्ये समाविष्ट इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राजकारण, विज्ञान, पर्यावरण या घटकांशी संबंधित चालू घडामोडी.
- स्वतंत्र चालू घडामोडी – यामध्ये व्यक्तिविशेष, पुरस्कार, क्रीडा स्पर्धा, पुस्तके व लेखक, संमेलने, नेमणुकी व नियुक्त्या अशा घटकांचा समावेश होतो.
- सामान्य ज्ञान स्वरूपाची माहिती – या प्रत्येक घटकासाठीचा स्रोत व अभ्यासपद्धत समजून घेतली तर या घटकाचे ओझे वाटणार नाही.
पहिल्या प्रकारच्या घडामोडींबाबत मुख्य घटकाशी संबंधित अद्ययावत माहिती असे स्वरूप असते. त्यामुळे मुख्य मुद्दय़ाचा अभ्यास करताना या अद्ययावत माहितीचा संदर्भ लक्षात घ्यायचा व ठेवायचा असतो.
स्वतंत्र चालू घडामोडी हा घटक पूर्णपणे तथ्यात्मक व म्हणूनच स्मरणशक्तीवर विसंबून असलेला मुद्दा आहे. त्याचेच प्रमाण चालू घडामोडीवरील स्वतंत्र प्रश्नांमध्ये जास्त आहे. त्यामुळे सारणीच्या पद्धतीत मुद्दे काढणे आणि त्यांची उजळणी हा यासाठी महत्त्वाचा भाग आहे.
सामान्य ज्ञान हा भाग अमर्याद या वर्गवारीखाली मोडतो. येतो. त्यामुळे या घटकाच्या संपूर्ण तयारीचा किंवा अभ्यासक्रम पूर्ण करायचा ध्यास वगरे न बाळगता इंडिया इयर बुक व लोकराज्य / योजना यातून मिळेल तेवढय़ा ‘ज्ञाना’वर समाधान मानावे आणि जमतील तितके प्रश्न सोडवून हुकमी प्रश्नांकडे वळावे.
पूर्व परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न सर्वसाधारणपणे मागील एक वर्षांच्या घडामोडींवर विचारले जातात. ‘एक वर्ष’ असा लिखित नियम नाही. अजून खोलात जायचे तर मागील आठ-नऊ महिन्यांच्या घडामोडींवर फोकस जास्त असतो. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी असे अभ्यासक्रमात नमूद आहे. पण प्रश्नांचा प्राधान्यक्रम पाहता या क्रमात राष्ट्रीय पहिले आणि मग राज्य व आंतरराष्ट्रीय असे दिसते.
‘चालू घडामोडी’ हा सामान्य अध्ययनाच्या अभ्यासक्रमामधील नुसता काही मार्कासाठी विचारला जाणारा भाग नसून तो परीक्षेचाच एक ‘आधार’ आहे. या घटकाची व्याप्ती पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या तीनही टप्प्यांवर वेढलेली आहे. हा नुसता एक घटक विषय नाही तर अभ्यासक्रमांतील प्रत्येक विषयाशी अनिवार्यपणे जोडलेला मुद्दा आहे. म्हणून चालू घडामोडी हा अभ्यासाचा एक भाग न मानता तो अभ्यासाचा ‘पाया’ बनला पाहिजे. घटक विषय कोणताही असो, बहुतेक प्रश्नांच्या पाश्र्वभूमीवर एखादी राज्य – राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय घडामोड असतेच हे समजून घ्या. म्हणूनच चालू घडामोडी हा स्पर्धा परीक्षांसाठी एक ‘अनिवार्य पेपर’ इतका महत्त्वाचा अभ्यास विषय आहे.
पूर्व परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते. हे टेक्निकली बरोबर आहे. पण एका शब्दात, एका वाक्यात उत्तरे द्या किंवा गाळलेल्या जागा भरा किंवा तारीख, घटना, नाव, नियुक्ती, समिती, अहवाल, तरतूद, शिफारस एवढय़ापुरती वस्तुनिष्ठ माहिती पाठ करून परीक्षा देण्याची परिस्थिती आता राहिली नाही. अशा स्वरूपाचे प्रश्न आता विचारलेही जात नाहीत. काही मोजके पश्न असे विचारले गेलेही असतील पण वस्तुनिष्ठ स्वरूपाची पूर्व परीक्षा तुमच्या विश्लेषणात्मक माहितीची आणि अभ्यासाची परीक्षा पाहणारी असते.
अभ्यास नेमका काय करायचा, कशाचा करायचा आणि कोणत्या संदर्भ साहित्यातून करायचा हा अभ्यास म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास. उमेदवारांचा एक साधारण अनुभव असा आहे की एका विषयाची, घडामोडीची माहिती वेगवेगळ्या दोन-तीन संदर्भ पुस्तकात पाहिली की संभ्रम वाढतो. चालू घडामोडींबाबत हे जसेच्या तसे
लागू पडते. एखादे दुसरे गाइड पाहून किंवा एकच स्रोत हाताळा आणि अभ्यास संपवा हा त्यावरचा उपाय होऊ शकत नाही. आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्या की ही मर्यादा आपल्या लक्षात येते. अशा अभ्यासाने आपण स्पध्रेत टिकू शकणार नाही हेही जाणवते. त्यामुळे डोळे बंद करून विश्वास ठेऊ शकतो, मनात कसलीही शंका न ठेवता अभ्यास करू शकतो.
अशा संदर्भ साहित्याचा ‘पर्याय’ आपल्याकडे फार कमी आहे. त्यामुळे किमान दोन संदर्भ वापरून माहितीची पडताळणी करून मगच मुद्दे काढणे आवश्यक आहे.
- फारूक नाईकवाडे
सदर लेख दै.लोकसत्तामधील आहे.