गडचिरोली सारख्या मागास भागात राहूनही अंजलीची पोलीस उपनिरीक्षक पदी गगनभरारी!
MPSC PSI Success Story : अंजलीचे बी.कॉम पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे काय करायचं हा तिला प्रश्न पडला होता. त्यामुळे, उच्च शिक्षण तर घ्यायचं या उद्देशाने तिने तपदव्युत्तर पदवी एम.कॉमला प्रवेश घेतला. तिचे वडील प्रशासकीय सेवेत असल्यामुळे तिला देखील लहानपणीपासून प्रशासकीय सेवेत येण्याची आवड होती. तिने एके दिवशी वर्तमानपत्रांमध्ये राज्यसेवा परीक्षेचा निकाल लागण्याची बातमी वाचली.
त्यात पुणे शहरात अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तेव्हाच तिला वाटले की, आपणही पुण्याला जाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे. याचं इच्छेपोटी तिच्या वडिलांनी पुण्यातील खाजगी शिकवणीची माहिती घेतली व पुणे शहरात युपीएससीची तयारी करायला पाठवले. त्यादिवशी पासून तिच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासाला सुरुवात झाली.या प्रवासात तिने प्रचंड अभ्यास केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी ओबीसी प्रवर्गातून निवड झाली.
गडचिरोली जिल्ह्यातील सर्वोदय वार्ड येथील अंजली खोब्रागडे ही रहिवासी. पहिल्या वर्षी तिला स्पर्धा परीक्षेचा आवाका समजण्यातच वेळ गेला. तिने २०१९ यावर्षीच्या परीक्षा चांगली तयारी केली पण पूर्व परीक्षाच नापास झाली. या पूर्व परीक्षेत झालेल्या चुका दुरुस्त करून पुन्हा परीक्षा दिली. २०२०ची तिने जोमाने तयारी सुरू केली. परीक्षा येणारच तेवढ्यात जागतिक महामारी (कोरोना) ला सुरुवात झाली. एक वर्ष जग थांबले होते, परंतू तिने अभ्यासात सातत्य ठेवून अभ्यास करत राहिली.
तिच्या याच अभ्यासातील सातत्यामुळे चांगल्या गुणांनी पूर्व परीक्षा झाली. इतकेच नाहीतर मुख्य परीक्षेला पात्र झाली. तिला मुख्य परीक्षेला चांगले गुण मिळवल्यामुळे मी शारीरिक चाचणी व मुलाखती याकरिता पात्र झाली. या सगळ्या पायऱ्यांवर तिला यश मिळत गेले आणि ती पीएसआय झाली.
गडचिरोली जिल्ह्यामधील मागासवर्गीय, आदिवासी व मध्यमवर्गीय मुलामुलींसाठी तिचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.