आई – वडिलांनी कष्टाचे लेकाने केलं चीज; ज्ञानेश्वर बनला पोलिस उपनिरीक्षक !
MPSC PSI Success Story गुळवंची सारख्या छोट्याशा गावातील गरीब कुटुंबातील तरुण पोलिस उपनिरीक्षकपदी होणे, हे सगळ्यांसाठी खरोखरच प्रेरणादायी बाब आहे. ज्ञानेश्वर शिवाजी पलंगे हा अत्यंत सामान्य कुटुंबातील लेक. मूळचा उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथील रहिवासी आहे.
आपल्या मुलाने उच्च शिक्षणात गगनभरारी घ्यावी, यासाठी प्रत्येक पालक धडपडतात तसेच ज्ञानेश्वरचे पालक देखील धडपडत होते. त्याचे वडील गवंडी काम करून तर आईने कपडे शिवून त्याच्या शिक्षणाला मदत केली. त्यामुळेच यत्याचे प्राथमिक शिक्षण गुळवंची येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण सोलापूर येथील श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेत झाले. बारावी वाणिज्य शाखेतून हरिभाई देवकरण प्रशालेत झाले.
त्याला लहानपणापासून अभ्यासाची गोडी होती.
त्यामुळे अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली.पंढरपूर येथील द. ह. कवठेकरमध्ये डी. एड्. पूर्ण केले. त्याचवेळी त्याने अधिकारी होण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवले होते. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो मुंबई पोलिस दलात भरती झाला. तेवढ्यावरच न थांबता त्याने अभ्यासात सातत्य ठेवत एमपीएससी तयारी सुरू ठेवली.आई-वडिलांनी लहानपणी घेतलेल्या कष्टाची जाणीव ही अधिकारी होण्यासाठी त्याला कायम बळ देत राहिली. म्हणूनच,महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० परीक्षेत पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली.