⁠  ⁠

वडिलांना करायचा पानपट्टीवर मदत; कठीण परिस्थितीवर मात करत बनला PSI

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

वडिलांना पानपट्टीवर मदत करण्यापासून ते पोलिस उपनिरीक्षक पदावर यशाची मोहर उमटविणाऱ्या अजिंक्य अनिल पवार याचा हा प्रेरणादायी विलक्षण प्रवास. अजिंक्य हा सर्वसामान्य कुटुंबात वाढलेला मुलगा. त्याने त्याच्या वडिलांना पानपट्टीवर मदत करत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन पोलिस उपनिरीक्षक पदावर आपली मोहोर उमटवली आहे. वडीलांना मदत करत असताना तो नियमितपणे दररोज दोन तास व्यायाम आणि आठ तास अभ्यास करायचा. MPSC Success Story

अजिंक्यचे वडील पानपट्टी चालवतात तर त्याची आई गृहिणी आहे. दहिवडी कॉलेजमध्ये इंग्रजी विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर अजिंक्यने पोलिस भरतीसाठी प्रयत्न सुरु केले. त्यानंतर विक्रीकर निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी प्रोत्साहन दिल्यानंतर त्याने स्पर्धा परिक्षांकडे आपला मोर्चा वळवला. MPSC PSI Success Story

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक पदासाठी २०२० साली त्याने अर्ज केला. सप्टेंबर २०२१ मध्ये पूर्व परिक्षेत तर ऑक्टोबर २०२२ मध्ये मुख्य परिक्षेत त्याने यश संपादन केले. कोरोनामुळे शारीरिक चाचणी व मुलाखतीसाठी वाट पहावी लागली. मार्च २०२२३ मध्ये शारीरिक चाचणी व मुलाखत पार पडली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. ६५० जागांपैकी आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग सोडून ५८३ जागांचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये २५८ वा क्रमांक मिळवून अजिंक्यने पोलिस उपनिरीक्षक पद पटकावले आहे.

विशेष म्हणजे अजिंक्यने महाविद्यालयीन शिक्षण तसेच पोलिस उपनिरीक्षक पदाचा अभ्यास दहिवडी कॉलेजमध्येच केला आहे. दहिवडी कॉलेजच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात अभ्यास करून त्याने हे यश प्राप्त केले आहे. अजिंक्य अभ्यासासोबत वडिलांना दुकानकामात मदत करायचा; पण त्याचबरोबर तो दिवसातील २ तास व्यायाम आणि ८ तास अभ्यास करायचा. त्याच्या या यशाबद्दल रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्रभाकर देशमुख, प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. अनिल दडस, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ. व्ही. पी. गायकवाड, प्रा. बजरंग मोरे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.

“अजिंक्यने मिळवलेल्या यशाबद्दल बोलताना तो म्हणतो, माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद, चंद्रकांत पवार सर यांचे मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये मिळालेल्या प्रशिक्षणामुळे मी हे यश मिळवू शकलो.” दहिवडी कॉलेजचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे दुष्काळी भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत आहे. अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या शहरात जावून महागडे कोचिंग क्लास लावणे परवडत नाही. पण प्रबळ इच्छाशक्ती असेल तर असे विद्यार्थी गावाकडे राहून अभ्यास करुन यश मिळवू शकतात; हे अजिंक्यने सिध्द करुन दाखवले आहे.

Share This Article