MPSC Success Story : राहाता तालुक्यातील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या मुलीने आपले स्वप्न सत्यात उतरवले आहे. शेतकरी कुटुंबातील कन्या ललिता हिने आपली ओळख महाराष्ट्राला करुन दिलीय ती म्हणजे पीएसआय ललिता सातव.
ललिताचे वडील शेतकरी आणि जोड धंदा म्हणून बरेच दिवस मंडपाचा व्यवसाय करीत असत. त्यांनी आपल्या मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. दोन खोल्यांच्या घरांत वडील विजय सातव, आई सुनिता विजय सातव व बहिणी असे तिचे छोटेसे कुटुंब राहते.
तिचे शालेय शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढील शिक्षण घेण्यासाठी तिची आर्थिक परिस्थिती पण नव्हती. ती सायकल घेऊन दुसऱ्या गावात जायची. त्यानंतर तिने अधिकारी होणार ही जिद्द उराशी बाळगून अभ्यासाला सुरुवात केली. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत राहाता तालुक्यातील एकरुखे या गावात राहणारी ललिताने मैदानी सरावा सोबत अभ्यास देखील अहोरात्र केला.जिद्दीच्या जोरावर आणि अतिशय कष्टातुन घेतलेल्या शिक्षणातून तिने नुकतेच पीएसआय या पोलिस विभाग अधिकारी पदावर आपले नाव कोरले आहे.