MPSC PSI Success Story आपल्याला जर कुटुंबाची साथ असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करत आपण खात्रीशीर यश मिळवू शकतो. हेच संदीप याने करून दाखवले आहे. संदीपला गेली सात वर्ष त्याच्या कुटुंबाने चांगली साथ दिली. त्याला तीन प्रयत्नात यश मिळाले नाही तरी तो खचून गेला नाही. घरच्यांनी त्याला अधिक प्रोत्साहन दिले आणि आत्मविश्वास वाढवला. त्यामुळे त्याची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.
संदीप लगस हा मूळचा दौंड तालुक्यातील चौफुला गावचा. त्याचे वडील बांधकाम मजूर असून आई शेत मजूर आहे. संदीपचे प्राथमिक शिक्षण धायगुडेवाडी प्राथमिक शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षण त्याने वरवंड येथील गोपीनाथ विद्यालयातून घेतले. त्याने डीएडचे शिक्षण घेतले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्याने पदवी घेतली. २०१५ पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. या काळात तो प्रचंड अडचणींना सामोरा गेला. पहिल्या तीन प्रयत्नात त्याला यश मिळाले नाही. मात्र त्याने जिद्द सोडली नाही. चौथ्या प्रयत्नात त्याला यश मिळाले. यात त्याची पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाली असून त्याला १००वा रॅंक मिळाला आहे.
मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हणजे संयमाची परीक्षा. या परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करताना जिद्द व आत्मविश्वास यासोबतच संयम देखील महत्त्वाचा आहे.