मुख्य परीक्षेसाठी ७ हजार उमेदवारांची निवड
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षेसाठी राज्यभरातील ७ हजार ४० उमेदवार आले आहेत.
आयोगाने फेब्रुवारीमध्ये ही परीक्षा घेतली होती. निकालासह कटऑफ गुणांची यादीही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. त्यात खुल्या गटात सर्वसाधारण जागांसाठी १९८, महिलांसाठी १८०, खेळाडूंसाठी १४३ आणि अनाथांसाठी १४० कटऑफ आहे.
एसईबीसी आणि ओबीसी गटात सर्वसाधारण जागांसाठी १९७, महिलांसाठी १८०, खेळाडूंसाठी १४३ कटऑफ असल्याचे नमूद करण्यात आले आहे.निवड झालेल्यांत पुणे (२ हजार ४९५), मुंबई (४१८), नगर (३९९), औरंगाबाद (३१२), जळगाव (१२२), कोल्हापूर (३८५), लातूर (१५९), नागपूर (१९९), नांदेड (१५१), नाशिक (३५२), नवी मुंबई (१८२) आदी जिल्ह्य़ातील उमेदवार आहेत. मुख्य परीक्षा १३ ते १५ जुलै दरम्यान होईल.
गट अ आणि ब पदांसाठी निश्चित केलेली क्रीडाविषयक अर्हता धारण करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर करणे बंधनकारक आहे. तसेच अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापूर्वीची क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या उपसंचालकांकडे प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर करणे, त्याची पोचपावती, मुलाखतीवेळी प्रमाणपत्र पडताळणी अहवाल सादर करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
लक्ष्मण कसेकर, रामदास दौंड, प्रतीक्षा काळे राज्यात प्रथम ; वनसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या वन सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात कोल्हापूरचे लक्ष्मण कसेकर हे राज्यातून आणि नगरचे रामदास दौंड हे मागासवर्गीयांतून प्रथम आले. महिला गटातून लातूरच्या प्रतीक्षा काळे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.
महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २४ जून २०१८ रोजी घेण्यात आली होती. पूर्व परीक्षा दिलेल्या २९ हजार २०६ उमेदवारांमधून मुख्य परीक्षेसाठी १ हजार २२४ उमेदवार पात्र ठरले. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी २११ उमेदवार पात्र ठरले. ४ते १२ एप्रिलदरम्यान मुलाखती घेण्यात आल्या. सहायक वनसंरक्षक, गट अ संवर्गाची १६ पदे, वनक्षेत्रपाल गट ब संवर्गाची ५३ पदे अशा दोन संवर्गातील एकूण ६९ पदांसाठी २८ ऑक्टोबरला मुख्य परीक्षा झाली. या परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.