---Advertisement---

हमालाच्या मुलीनं MPSC परीक्षेत मिळविलं मोठं यश ; राज्यात आली पहिली

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा(MPSC) च्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून यात एका हमालाच्या मुलीनं यश मिळविले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या रेश्मा बाजीराव ऱ्हाटोळ या मुलीनं MPSC परीक्षेत ओबीसी महिलांच्या गटात राज्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. तिच्या यशाने वडिलांची छाती अभिमानाने फुलून गेली आहे.

रेश्मानं जोगेवाडी गावातच प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण तळाशी येथील शाळेत तर बिद्रीमध्ये बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलं.मेकॅनिकल या ब्रांचमधील डिप्लोमाची पदवी पॉलिटेक्निक कॉलेज, कोल्हापूर येथे प्राप्त केली. तर डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात तिने बी.ई. मेकॅनिकल ही इंजिनिअरिंगची पदवी घेतली. रेश्मानं कॉलेजात शिकत असतानाच सरकारी अधिकारी होण्याचं ध्येय निश्चित केलं होतं.

रेश्मानं बीईनंतरया एमपीएससी परीक्षेसाठी पूर्ण वेळ दिला होता. पण काही परीक्षांमध्ये अगदी थोड्या गुणांनी अपयश आले होते. तरी देखील खचून न जाता अभ्यास सुरू ठेवला. आणि त्यातूनच आता राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परिक्षेत यश प्राप्त झाले आहे,

रेश्माचे वडील बाजीराव ऱ्हाटोळ हे भोगावती साखर कारखान्यात हमालीचे काम करतात. रेश्माला आणि तिच्या भावांना संपूर्ण शिक्षण पूर्ण करू देताना वडिलांनी खूप कष्ट घेतले आहेत. पैशाची कोणतीही कमतरता न जाणवू देता त्यांनी रेश्माला सर्व बाजूंनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता तिच्या यशाने त्यांची छाती अभिमानाने फुलून गेली आहे.

हमाली करत असून देखील बाजीराव ऱ्हाटोळ यांनी एका मुलाला आयटीआय, तर दुसऱ्या मुलाला बीएस्सी पर्यंत शिकवले आहे. आता, रेश्मानं राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षेत ओबीसी महिलांमधून राज्यात प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली आहे. यामुळे तिचे घरातील सर्व सदस्यांकडून देखील विशेष कौतुक होत आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now