कृषीकन्या आली राज्यात तिसरी; एमपीएससी परीक्षेत पटकावला मान !
सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथील शेतकरी कुटुंबातील ज्योती अंबादास आव्हाड हिने राज्यात तिसरा क्रमांक मिळवून यश मिळविले आहे. चापडगाव येथील परिसर डोंगराळ असून बहुतांश कुटूंब शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात, ज्योतीचे वडील अंबादास आव्हाड हे देखील शेतकरी आहेत तर आई गृहिणी आहे. जिद्द, चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील कृषीकन्येने अवघड परीक्षेत यश साध्य केले आहे.
ज्योतीचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. तर दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण जवळच असलेल्या दापूर येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे पूर्ण केले. त्यानंतर बारावी व पदवीचे शिक्षण सिन्नर येथील जीएमडी महाविद्यालयात घेतले. कला शाखेत शेवटच्या वर्षांत पदवीचे शिक्षण घेत असतानाच ज्योतीने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी सुरु केली दररोज नित्यनेमाने वाचन करणे, अभ्यासिकेला जाणे आणि लेखनाचा सराव करणे ही ज्योतीची दिनचर्या होती. तिला घरच्यांनी खूप पाठिंबा दिला. आम्ही शेतकरी आहोत, पण मुलीने उच्च शिक्षण घ्यावे, ही त्यांची धारणा होती.
याचमुळे ज्योती भटक्या विमुक्त जमाती गटातून राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहेत. या निकालानंतर तिची मंत्रालयात लिपिक म्हणून निवड झाली आहे, ज्याचे नवीन नाव महसूल सहाय्यक म्हणून बदलण्यात आले आहे.