आदिवासी पाड्यात राहणाऱ्या मुलीची पोलीस उपनिरीक्षक पदावर झेप
MPSC PSI Success Story : आदिवासी बहुल वस्ती राहणारी चांदवड तालुक्यातील पारेगाव शिवारातील रामायेसूचापाडा येथील लता कोंडाजी बागुल हरहुन्नरी लेकीने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे. आदिवासी पाड्यात राहून मिळवलेले हे यश सगळ्यांसाठी सकारात्मक बाब आहे.
रामायेसूचापाडा ही दीडशे ते दोनशे लोकसंख्येची वस्ती, अत्यल्प शेतीतून येणाऱ्या कमी अधिक उत्पन्नातून बागुल दांपत्य घर खर्च व मुलांचा शिक्षणाचा खर्च भागवीत असत. लता हिने ही परिस्थिती बदलवण्याचा निश्चय खेळण्याबागडण्याच्या वयातच केला. अधिकारी होण्याचे ठरविले.
लताचे शालेय शिक्षण आदिवासी वस्तीवरच पूर्ण केले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण व पदवी चांदवडलाच पूर्ण केली. प्राथमिक ते पदवी पर्यंतच्या शैक्षणिक प्रवासात लताने अनेक कष्ट व हालअपेष्टा सहन केल्या. मात्र तरी देखील ती न डगमगता स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिली. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षाचा अभ्यास सुरु केला.
आपल्याला सक्षम व समाजपयोगी कार्य करायचे असेल तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा देण्याचा तिने निश्चय केला. यासाठी तिने पुणे शहर गाठले. एक ते दीड वर्ष चांगला अभ्यास केल्यानंतर लताने केंद्रीय लोकसेवा आयोगाचे दोन वेळेस पेपर दिले. त्या परीक्षेत तिला अपयश आले पण यामुळे हताश न होता लताने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने योग्य नियोजन करीत अभ्यास केला. याचे फळीत स्वरुपात तिने पहिल्याच प्रयत्नात राज्य उत्पादन शुल्काच्या पोलीस उपनिरीक्षक पदी यश संपादन केले.