नोकरी व घरची शेती सांभाळत केली स्पर्धा परीक्षेची तयारी ; मिनाज मुल्ला झाले उपजिल्हाधिकारी!
MPSC Success Story कोरडवाहू शेती, दिवसभर शेतात कष्ट, आर्थिक चणचण अशा परिस्थितीत देखील आपल्याला अधिकारी व्हायचे आहे या स्वप्नपूर्तीच्या ध्यासासाठी सातत्याने अभ्यास करणाऱ्या मिनाज मुल्ला यांची ही कहाणी….
मिनाज हे मूळचे सांगोला गावातील रहिवासी. त्यांचे आई – वडील दोघेही शेतकरी…त्यात दुष्काळी पट्टा, कोरडवाहू चार एकर शेती अशा परिस्थितीत मिनाजने शिक्षण पूर्ण केले आणि सरकारी अधिकारी होण्यासाठी प्रयत्नशील राहिले. शेतीवर उदरनिर्वाह व आर्थिक खर्च भागत नसल्याने मिनाज यांचे वडील सुरूवातीला शिवणकाम करायचे. आपल्या मुलांनी खूप शिकावं आणि मोठं व्हावं या इच्छेपोटी मिनाजला देखील त्यांनी शहरात उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठवले.
मिनाजचे दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण हे न्यू इंग्लिश स्कूल येथून झाले. तर अकरावी – बारावीचे शिक्षण विद्यामंदिर प्रशालामधून झाले. बारावीमध्ये देखील मेरीटमध्ये आल्यामुळे एमबीबीएससाठी शासकीय महाविद्यालयात नंबर लागला पण इतकी फी कुठून भरणार? यामुळे त्यांनी डी.एडसाठी प्रवेश घेतला.यात ते राज्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तर इंग्रजी माध्यमातून पदवी शिक्षण पूर्ण केले.
आपण काही तरी करू शकतो या विचाराने पुढे मिनाज यांनी अनेक सरकारी परीक्षा दिल्या. त्यातल्या तलाठी परीक्षेत उत्तीर्ण होऊन पहिल्याच प्रयत्नात तलाठी झाले. याच सातत्याने अभ्यास करणाऱ्या चिकाटीवर पुन्हा स्पर्धा परीक्षा देऊन ओबीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवत मिनाज उपजिल्हाधिकारी झाले. शिक्षक ते तलाठी, तलाठी ते उपजिल्हाधिकारी हा त्यांचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.