MPSC Success Story : सर्वसाधारण शेतकऱ्याचा पोरगा बनला अधिकारी..!
MPSC Success Story राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अर्थात एमपीएससी तर्फे नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. एमपीएससी कडून 405 पदांसाठी ही परिक्षा घेण्यात आली होती. यात सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तरुणाने राज्यसेवा परीक्षेत दुसऱ्यांदा घवघवीत यश मिळवले आहे. शशिकांत मारुती बाबर असे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे नाव असून त्यांनी राज्यात आठवे स्थान पटकावले.
मनाची तयारी आणि स्वतःवर आत्मविश्वास असेल तर बऱ्याचदा अशक्यप्राय वाटणारी गोष्ट देखील सहज शक्य होऊ शकते. हे शशिकांत यांनी दाखवून दिले. शशिकांत हे जालना जिल्ह्यातील बोररांजणी येथील रहिवाशी आहेत.
शशिकांत यांचे सिव्हिल इंजिनिअर पर्यंतचे शिक्षण झाले असून त्यांनी 2020 साली एमपीएससी परीक्षेत यश मिळविले होते. राज्यात 16वे स्थान पटकावून नायाब तहसीलदार म्हणून पदभार सांभाळला. आता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 च्या यादीत शशिकांत यांनी पुन:श्च परीक्षा उत्तीर्ण करत राज्यातून आठवे स्थान पटकावले आहे.
शशिकांत यांच्या घरी आई बाबा शेती करतात. लहान भाऊ त्यांना त्या कामात मदत करतो. मोठा भाऊ फायनान्स मध्ये कामाला आहे. सर्वसामान्य मध्यवर्ती शेतकरी कुटुंबाप्रमाणेच त्यांचे कुटुंब आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी कुठलाही क्लास अथवा तत्सम गोष्टींना प्राधान्य न देता उपलब्ध साहित्यांचा, पुस्तकांचा साह्याने अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यात अनेक थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन लाभले. मुळात त्यावेळी माझ्याकडे पुरेसे पैसे नसल्याने कमीत कमी किमतीत युट्युब, टेलिग्राम यासारख्या माध्यमांच्या वापरातून सर्व क्षेत्रातून ज्ञान कसे मिळवता येईल या कडे बघत गेलो. यापूर्वी होऊन गेलेले यशस्वी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळत असल्याने मला मोठी मदत झाली, असे शशिकांत सांगतात.
इतर विद्यार्थ्यांना संदेश
एखादी उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून आपण त्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न करत राहिले तर यश नक्की मिळतं असा मला विश्वास आहे. तुम्ही वयाच्या 22 व्या वर्षी देखील अधिकारी होऊ शकता, तसेच वयाच्या चाळीसाव्या वर्षी देखील अधिकारी होऊ शकतात. फक्त या दरम्यानच्या काळात खचून जाऊ नका आणि प्रयत्न करणे सोडू नका. एक दिवस यश नक्की तुमच्या हातात राहील असा संदेश शशिकांत बाबर यांनी इतर विद्यार्थ्यांना दिला.