⁠
InspirationalUncategorized

MPSC Success Story : साखर कारखान्यातील मजुराची पोरगी अधिकारी बनली

स्पर्धा परीक्षांचा मार्ग तस्सा खडतर आणि संयमाची सचोटी बघणारा आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवून शासकीय नोकरी मिळवण्याचं अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. मात्र यात प्रत्येकाला यश मिळंलच असं नाही. दरम्यान, नुकताच राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात साखर कारखान्यातील मजुराची लेक उत्तीर्ण होऊन अधिकारी बनली आहे. श्रद्धा चव्हाण असं उत्तीर्ण झालेल्या मुलीचे नाव असून तिने सलग दुसऱ्यांदा यश मिळवले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात असणाऱ्या कौलगे या लहानशा गावातील श्रद्धा चव्हाण यांनी यापूर्वीही महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा 2020 मध्ये पहिल्याच प्रयत्नात श्रद्धा चव्हाण यांनी यश संपादन केले होते. त्यात त्यांची उपशिक्षणाधिकारी पदावर निवड झाली होती. सध्या या पदाचे त्या प्रशिक्षण घेत आहेत. तत्पूर्वीच, त्यांनी 2021ची राज्यसेवेची पुन्हा परीक्षा दिली होती. त्यात सलग दुसऱ्या परीक्षेत त्यांनी यशाला गवसणी घातली आहे.

श्रद्धा सर्वसाधारण कुटुंबातील आहेत. वडील साखर कारखान्यात नोकरी करतात. तर आई गृहिणी आहे. श्रद्धाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण गावातीलच माध्यमिक शाळेत झाले. तिने साधना ज्युनिअर कॉलेज, गडहिंग्लज येथे बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. शिवराज महाविद्यालयातून रसायनशास्त्रातून पदवी घेतल्यानंतर तिने शिवाजी विद्यापीठातून एमएस्सी पूर्ण केले. गडहिंग्लज साखर कारखान्यामध्ये मजूर म्हणून काम करत असलेले वडील शंकर चव्हाण यांनी मोठ्या कष्टाने आणि मुलीवर पूर्ण विश्वास ठेवत श्रद्धा यांच्या शिक्षणाची पायभरणी केली. या संपूर्ण यशाचे श्रेय श्रद्धा आई वडिलांना देते.

नुकताच राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत श्रद्धा चव्हाण हिनं मुलींमध्ये राज्यात चौथा क्रमांक पटकावला. तर एकूण गुणवत्ता यादीत 88 वे स्थान मिळविले आहे. तिच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अभ्यासात सातत्य, जिद्द आणि चिकाटी असेल तर यश संपादन करणं फार अवघड नाही, हेच श्रद्धा चव्हाण हिनं तिच्या प्रेरणादायी प्रवासातून सिद्ध केलं आहे.

महाविद्यायामध्ये शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी करून ‘क्लास वन’चे पद मिळवावे हे ध्येय निश्चित केले होते. त्यासाठी स्वतःला झोकून देत मी या परीक्षेसाठी तयारी केली. परिणामी घरापासून काही काळ लांब देखील राहिले. या प्रवासात माझ्या घरच्यांनी, शालेय, महाविद्यालयीन शिक्षक, तालुक्यातील यशस्वी अधिकारी, मित्र परिवार वर्ग यांची खूप मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले, असे श्रद्धा यांनी सांगतात.

Related Articles

Back to top button