पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी ‘परीक्षेवर चर्चा’ कार्यक्रमातून देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शुक्रवारी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे ‘परीक्षा पर चर्चा’ कार्यक्रम झाला. यावेळी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सर्व शाळांमध्ये थेट प्रक्षेपण करण्यात आले. विद्यार्थ्यांना चिंतामुक्त वातावरणात परीक्षेसाठी तयार करण्यासाठी हा उपक्रम होता. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांसाठी ‘एक्झाम वॉरियर’ हे पुस्तकही लिहिले आहे. विद्यार्थी स्ट्रेस फ्री राहावे आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने परीक्षेला सामोर जावे यासाठी यात 25 मंत्र देण्यात आले आहेत. देशात दरवर्षी परीक्षेच्या ताण-तणावामुळे अनेक विद्यार्थी जीवनयात्रा संपवतात, यावर पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमातही चिंता व्यक्त केली होती.
पंतप्रधानांच्या भाषणातील ठळक मुद्दे –
– ‘गुणांची चिंता न करता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा.’
– देशात 100 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. मला खेद आहे की मी त्यांच्या भाषेत बोलू शकत नाही. त्यांच्यासाठी हे भाषण त्यांच्या स्थानिक भाषेत देण्याची विनंती मोदींनी केली.
– कनिष्का वत्स या विद्यार्थीनीने प्रश्न केला की, जर अभ्यासातून लक्ष विचलित होत असेल तर अभ्यासवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी, एकाग्रतेसाठी काय करावे.
– या प्रश्नाला उत्तर देताना मोदी म्हणाले, ‘ज्या गोष्टी तुमच्या मनाला स्पर्ष करतात त्या तुमच्या कायम स्मरणात राहातात. म्हणजेच मेमरी प्रॉब्लेम नाही. तर तुमच्या मनाला काय स्पर्ष करते हे महत्त्वाचे आहे.’
– ‘पाण्याची चव फार कमी लोकांना माहित असेल. जे मनापासून पाणी पितात त्यांना पाण्याची चव कळते. त्याला म्हणतात एकाग्रता.’
– आत्मविश्वास नसेल तर प्रामाणिकपणे मेहनत करुनही तुम्हालाही यश मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. स्वतःशीच स्पर्धा कराल तर नक्कीच फायदा होईल.
– पालकांची मुलांकडून मोठी अपेक्षा असते, ते विसरुन जातात की प्रत्येकाच्या वेगळ्या क्षमता असतात. तुम्ही आमच्या पालकांना याबद्दल सांगू शकता. हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांनी विचारला. लेहमधील महाविद्यालयीन विद्यार्थीनीनेही हाच प्रश्न विचारला.
– अनेक आई-वडीलांचे स्वप्न असते जे मी होऊ शकलो नाही, ते माझ्या मुलाने-मुलीने व्हावे. मी डॉक्टर होऊ शकलो नाही तर माझ्या मुलांनी डॉक्टर व्हावे असे त्यांचे स्वप्न असते. हे तणावाचे वातावरण कुटुंबाला उद्ध्वस्त करते. यासाठी मुलांनी आई-वडिलांसोबत संवाद साधला पाहिजे. त्यांचा मूड चांगला असेल तेव्हा त्यांच्याकडे हा विषय छेडला पाहिजे.
– आई-वडिलांनीही विचार केला पाहिजे की मुल एका परीक्षेत अपयशी झाले तर आयुष्य संपलेले नसते. यासाठी मोदींनी देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दूल कलाम यांचे उदाहरण दिले. कलामांना फायटर प्लेन पायलट होण्याची इच्छा होती. मात्र ते होऊ शकले नाही. म्हणून आयुष्य संपले का? उलट देशाला एक मोठा शास्त्रज्ञ मिळाला.
– तेव्हा पालकांनी मुलांचा कल ओळखून त्यांना मदत केली पाहिजे. एका परीक्षेने मुलांचे मुल्यमापन करु नका.
– स्वतःला ओळखले पाहिजे. तुमच्यात काय आहे हे पहिले जाणून घ्या. यासाठी तुमच्या मित्रांची मदत घ्या.
– प्रतिस्पर्धा कराल तर एक प्रकारचा तणाव येतो. त्यासाठी कोणाशी स्पर्धा करु नका. तर स्वतःशी स्पर्धा करा. लोक तुमच्यासोबत स्पर्धा करतील अशी स्थिती निर्माण करा.
– आज तुम्ही 2 तास अभ्यास करत असाल तर 3 तास वेळ द्या.
– फोकस करण्यासोबतच डि-फोकस करणेही शिकले पाहिजे. 24 तास परीक्षा, करिअर यांचा विचार करु नका. याच्याही पलिकडे जग आहे. त्यासाठी खेळले पाहिजे.
– सचिन तेंडुलकर म्हणाला की मी ज्यावेळी खेळतो त्यावेळी आधीचा बॉल कसा होता, नंतरचा बॉल कसा असेल, आपण आधी कसे खेळलो होतो आदीचा विचारही करत नाही. तर जो बॉल खेळायचाय फक्त आणि फक्त त्याच्यावर लक्ष केंद्रीत करतो. भूतकाळ अथवा भविष्य यांना अजिबात वर्तमानाच्या मध्ये येऊ न देणं आणि केवळ वर्तमानावर लक्ष केंद्रीत करणं ही एकाग्रताच यशाचं रहस्य आहे. त्यामुळं तुम्ही फक्त आणि फक्त जे काही करत आहात त्यावरच लक्ष केंद्रीत करा
– आपण पंचमहाभूतांच्या संपर्कात आले पाहिजे. पाणी, जमीन, हवा यांच्या संपर्कात गेले पाहिजे. कधी चप्पल-बूट न घातला चालले पाहिजे.
– परीक्षा आहे म्हणून मित्र बंद, खेळणे बंद. छंद बंद. अमिताभ बच्चन असते तर ते म्हणाले असते दरवाजा बंद. टीव्ही बंद, गाणे ऐकणे- गाणे बंद. ऐवढे सर्व करण्याची गरज नाही. परीक्षेवर फोकस करतानाच डी-फोकस होत तुम्ही या सर्व गोष्टींसाठीही वेळ दिला पाहिजे.
– विद्यार्थी गिरीश सिंहने प्रश्न केला की मी 11 वीचा विद्यार्थी आहे. पुढच्या वर्षी आपल्या दोघांचीही ‘बोर्ड’ची परीक्षा आहे. माझी 12वीची परीक्षा आहे तर तुमची लोकसभेची, तुम्ही नर्व्हस आहात का?
– मोदींनी विद्यार्थ्याला पुन्हा एकदा त्याचे नाव विचारले आणि त्याच्या प्रश्नाचे कौतूक केले. म्हणाले, असा घुमवून फिरवून प्रश्न विचारण्याची ताकद फक्त पत्रकारांमध्ये असते. मी तुमचा शिक्षक असतो तर सल्ला दिला असता की तुम्ही जर्नालिझममध्ये गेले पाहिजे.
– विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना मोदी म्हणाले, ‘नेहमी शिकत राहा. नवीन आत्मसात करण्याची तयारी ठेवा. स्वतःमधील विद्यार्थ्याला जेवढे शक्य होईल तेवढे तरुण ठेवा. परीक्षा आणि गुण हे बाय-प्रोडक्ट समजावे. गुणांचा विचार करत बसलो तर आपल्याला जे ध्येय गाठायचे आहे ते कदाचित मिळणार नाही. राजकारणातही मी याच सिद्धांतावर चालतो. माझी जेवढी क्षमता आहे, माझी जेवढी ताकद आहे, माझ्यात जेवढी ऊर्जा आहे तेवढी सव्वाशे कोटी जनतेसाठी लावत राहिल. निवडणूक येते जाते. निवडणुका तर बाय-प्रोडक्ट आहे.’ असे सांगत ते म्हणाले आपले काम करत राहिले पाहिजे. तुमची परीक्षा तर वर्षातून एकदाच असते आमची रोज परीक्षा असते. देशात कुठे तरी एका नगरपालिकेची निवडणूक होत असते आणि तिथे जर आमचा पक्ष पराभूत झाला तर वृत्तपत्रात हेडिंग येतात की मोदींचा पराभव.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.