⁠  ⁠

एक दोन नव्हे तब्बल 25 वेळा अपयश, तरी पट्ठ्याने जिद्द सोडली नाही ; अखेर झाला PSI

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC Success Story : जर तुमच्यात संयम आणि जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट मिळविणे कठीण नाही. याची प्रचिती टेम्पो चालकाच्या मुलाने स्वयंअभ्यास करून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना मयूर पाटोळे याने जिद्द आणि मेहनतीच्या बळावर मोठं यश संपादित केलं असून त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे येथील मयूर पाटोळे यांची पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली आहे.

कसा झाला प्रवास?
मयूरचे वडील मारोती पाटोळे टेम्पो चालक तर आई सुगंधा गृहिणी आहे. त्याने प्राणिशास्त्र विषयाची पदवी मिळवलेली आहे. त्याला लहानपणापासूनच वर्दीची आवड होती. बारावीला असताना एनडीएची परीक्षा दिली. त्यात दोन वेळा अपयश आले. त्यानंतर पोलिस भरतीच्या प्रयत्नांचा प्रवास सुरु केला. यात 2016 मध्ये चार गुणांनी तर 2017 मध्ये एका गुणाने अपयश आले. त्यानंतर लेखी परीक्षेची तयारी असूनही शारीरिक आजारपणामुळे माघार घ्यावी लागली. 2018 मध्ये अग्निशमन दलाच्या अधिकारीपदी निवड झाली. दिल्ली पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षाही तो उत्तीर्ण झाला होता. परंतु, पोटाच्या आजारामुळे त्याला जॉईन करता आले नाही.

त्यानंतर त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात पूर्व परीक्षा, मुख्य शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखतीतसुद्धा यश आले. चांगल्या गुणांनी यश मिळाले, पण नशीब आडवे आले. हा निकालच राखून ठेवल्याने यश मिळवूनही भविष्य अधांतरी राहिले. पुढील तीन वर्षे अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या. वेगवेगळ्या पदांसाठी 25 स्पर्धा परीक्षा दिल्या. अपयश येत होते, पण जिद्द सोडली नाही. अखेर शासनाने 2020 च्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.

Share This Article