ना कोणता क्लास, ना कोणाचे मार्गदर्शन, तरी रोहित पहिल्याच प्रयत्नात झाला PSI
PSI Success Story आपल्या आयुष्याचे निर्णय जर ठाम आणि दिशादर्शक असतील तर कमी वयात देखील यश हे मिळतेच. हेच रोहित जाधवने देखील दाखवून दिले आहे. कोणतेही क्लास किंवा कोणाचे मार्गदर्शन न घेता त्याने पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदी हे यश गाठले आहे. वाचा विशी मधल्या तरूणाची ही यशोगाथा….
रोहितचा प्राथमिक ते पदवी पर्यंतच्या शैक्षणिक प्रवास हा अनेक कष्ट व हालअपेष्टा सहन करत गेला. तरी देखील न डगमगता स्वप्नांचा पाठलाग करत राहिला.सिन्नर शहरातील सिन्नर शिर्डी महामार्गावर असलेल्या खंडोबा मंदिरा जवळील अष्टविनायक नगर येथील नानासाहेब भगवान जाधव यांच्या मुलाने एम.पी.एस.सीच्या पोलिस विभागात पहिल्या प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. त्याचे वडील मुसळगाव येथील बोरा क्रिस कंपनीत केमिस्ट म्हणून नोकरीला आहेत. कमी उत्पन्नातून जाधव दांपत्य घर खर्च व मुलांचा शिक्षणाचा खर्च भागवित असतं. या परिस्थितीत आई -वडिलांची होणारी घालमेल बघता परिस्थिती बदलायलाच हवी यासाठी त्याने उच्च शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षेची पण तयारी केली.
त्याचे शालेय शिक्षण सिन्नर येथील स्वर्गीय नानासाहेब गडाख यांच्या ज्ञान संकुलात अर्थात एस जी पब्लिक स्कूल माध्यमिक विभाग येथे झाले. त्याने त्याच ठिकाणी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण व पदवी राजे छत्रपती संभाजी स्कूल धुळे तसेच पदवी शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे पूर्ण केले.
पदवीच्या अभ्यासासोबत त्याने पुणे येथे लायब्ररीमध्ये स्वतः अभ्यास करून व योग्य नियोजन करीत अभ्यास केला. त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी वडील थोडे थोडे पैसे पाठवायचे यावर तो शिक्षण आणि इतर खर्च भागवायचा. म्हणूनच त्याने पुण्याला शिक्षणाला पाठवले तरी कोणताही क्लास लावलेला नाही स्वतःचे नियोजन करून अभ्यास केला. त्याने एक – दीड वर्षे फक्त अभ्यासासाठी दिले. याच जोरावर त्याने एमपीएससीचा पेपर दिले व पहिल्याच प्रयत्नात पास झाला. इतकेच नाहीतर पी.एस.आय हे पद देखील मिळाले.
त्याची खुल्या गटातून ४८ वी रॅंक आली आहे. त्याला पुढे जाऊन डी.वाय.एस.पी अधिकारी व्हायचे असून अधिकाधिक देशसेवा करून देशाचे व आई – वडिलांचे नाव उज्ज्वल करायचे आहे.