महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) पोलीस उपनिरीक्षक (Sub-Inspector of Police) परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांची यादी नुकतीच जाहीर झालेली आहे. यात वयाच्या तिसऱ्या वर्षी आई वडिलांचं छत्र हरवलेल्या मुलीनं परिस्थितीपुढे हात न टेकवता आपला संघर्षाची वात तेवत ठेवली आहे. तिने पहिल्याच प्रयत्नात मोठं यश मिळवत PSI पदाला गवसणी घातली आहे.
सुंदरी एस बी (Sundari SB) असं संबंधित तरुणीचं नाव असून ती लोणावळ्यातील रहिवासी आहे. सुंदरी एस बी ही महाराष्ट्र राज्याच्या अनाथ मुलांच्या कोट्यातून पोलीस उपनिरीक्षक बनणारी पहिलीच कन्या आहे.
सुंदरी एस बी या वयाच्या तिसऱ्या वर्षी मळवली येथील संपर्क बालग्राम या संस्थेत दाखल झाल्या होत्या. या संस्थेत राहून त्यांनी बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. या संस्थेतून बाहेर पडल्यानंतरही त्यांनी आपल्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. त्यांनी लोणावळ्याजवळील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. याठिकाणी त्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. दरम्यान आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी त्यांनी महाविद्यालयातील कॉम्प्युटर लॅबमध्ये सहाय्यक म्हणून नोकरी केली.
या महाविद्यालयातून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी PSI पदासाठी परीक्षा दिली आणि पहिल्याचं प्रयत्नात मोठं यश संपादन केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या अनाथ मुलांच्या कोट्यातून PSI पदासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. अनाथ कोट्यातून पोलीस उपनिरीक्षक बनणारी सुंदरी ही पहिलीचं मुलगी आहे. त्यांच्या या यशाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. सोशल मीडियावर देखील अनेकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
सुंदरी यांनी आपल्या यशाचं सर्व श्रेय ‘सनाथ वेल्फेअर फाऊंडेशन’ या संस्थेला दिलं आहे. अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या या संस्थेनं मदत केल्याचं हे यश संपादन करता आल्याची भावना सुंदरी यांनी व्यक्त केली आहे. केवळ PSI पदावर समाधानी न राहता महिला आणि बालविकास विभागात अधिकारी व्हायचं असल्याचं सुंदरी यांनी सांगितलं आहे. त्यासाठी पुन्हा जोमानं अभ्यासाला सुरुवात करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
हे देखील वाचा :
- महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 140 जागांसाठी नवीन भरती
- इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात नवीन भरती जाहीर; 10वी आणि 12वी उत्तीर्णांना संधी
- 10वी आणि 12वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी; एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये भरती
- कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती
- नागपूर महानगरपालिकेत विविध पदांच्या 245 जागांसाठी भरती