अभ्यासाच्या दीर्घकालीन नियोजनाची गरज
२०१४ सालच्या डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न पाहता काही बाबी लक्षात घ्याव्या लागतात. एकतर मुख्य परीक्षेसाठी विशेषीकृत अभ्यास बाजूला सारून व्यापक निरीक्षणात्मक अभ्यासाची पद्धत स्वीकारणे आज अपरिहार्य बनले आहे. चौफेर नजर ठेवत वर्षभरात घडणाऱ्या घटना, घडामोडी अचूकपणे टिपण्याची आणि त्या घटनांचा अभ्यास करत, विश्लेषणात्मक दृष्टी विकसित करण्याची नितांत आवश्यकता आहे. यासाठी सुरुवातीला अभ्यासक्रमाच्या सर्व विषयांतील मूलभूत संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर अभ्यासक्रमातील घटकांना समकालीन घटना-घडामोडींशी जोडण्याची हातोटी विकसित करावी. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर अभ्यासक्रमातील मूळ घटकांची चालू घडामोडींशी नाळ जोडता आल्याशिवाय मुख्य परीक्षेतील प्रश्नांना सामोरे जाणे जिकिरीचे होऊन बसते. हा संबंध जोडताना संबंधित विषयाचे मूलभूत आकलन होणे क्रमप्राप्त ठरते. या पाश्र्वभूमीवर नागरी सेवा परीक्षेच्या तयारीमध्ये नियोजनाची भूमिका अधिकच महत्त्वपूर्ण ठरणारी आहे.
वास्तविक कोणत्याही ध्येयापर्यंत अचूकपणे मार्गक्रमण करण्यासाठी नियोजनाची गरज असते. नियोजन ही एकदाच ठरवण्याची बाब नसून ती दीर्घकालीन प्रक्रिया आहे. यूपीएससी परीक्षेच्या संदर्भात नियोजन कळीचे ठरते ते पुढील कारणांमुळे- व्यापक अभ्यासक्रम, वाचायचे बरेच संदर्भ, विविध प्रकारच्या विषयांचा अभ्यास, पूर्व-मुख्य परीक्षा आणि मुलाखत अथवा व्यक्तिमत्त्व चाचणी असे विविधांगी स्वरूप असणारी परीक्षा आणि त्यासाठी किमान एका वर्षांचा पूर्ण वेळ, सातत्यपूर्ण अभ्यासाची गरज या बाबींमुळे प्रत्येक विद्यार्थ्यांला या परीक्षेच्या तयारीचे सखोल नियोजन करावेच लागते.
काही कालावधीत केलेला प्रचंड अभ्यास नव्हे तर निर्धारित कालावधीत केलेला नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास ही बाब या परीक्षेसाठी अत्यावश्यक आहे.
नागरी सेवा परीक्षेच्या अभ्यासामध्ये नियोजनाची भूमिका काय असते हे समजून घेताना काही उद्दिष्टे दृष्टिक्षेपात येतात. ती उद्दिष्टे किंवा हेतू संपादन करण्यातून या परीक्षेचा अभ्यास अधिकाधिक सुलभ बनतो. ही उद्दिष्टे पुढीलप्रमाणे दिसून येतात-
* पहिला हेतू म्हणजे पर्याप्त (केवळ एकच किंवा भाराभर अशी दोन्ही टोके टाळून) संदर्भस्रोत वापरत या परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करावी. मात्र, निवड करताना त्या संदर्भसाहित्याचा दर्जा आणि गुणवत्ता लक्षात घ्यावी. आपण अभ्यासासाठी जे संदर्भसाहित्य वापरणार आहोत, ते अस्सल आहे काय याचा विचार प्रामुख्याने करणे अपेक्षित आहे. अस्सल संदर्भच का निवडावेत आणि कसे निवडावेत, असाही प्रश्न समोर येऊ शकतो. खरेतर विषयाची संकल्पनात्मक मांडणी, विस्तारित दृष्टिकोन, विश्लेषण आणि विषयाच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि त्याच्या समकालीन संदर्भाची चर्चा अस्सल संदर्भसाहित्यांमध्येच केलेली असते. उदा. ‘एनसीईआरटी’ची क्रमिक पुस्तके वाचून झाल्यानंतर पुढील टप्प्यावर त्या विषयावरील निवडक संदर्भसाहित्यांचे वाचन आवश्यक ठरते. मात्र बहुतांश विद्यार्थी अभ्यास करताना हे करताना दिसत नाहीत.
* या परीक्षेच्या तयारीसाठी वेळेचे व्यवस्थापन करणे अनिवार्य ठरते. सुरुवात मुख्य परीक्षेच्या अभ्यासापासून करायची झाल्यास मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात किती विषय समाविष्ट आहेत, कोणत्या विषयांना अधिक महत्त्व आहे, कोणत्या विषयांना किती प्रमाणात वेळ देण्याची आवश्यकता आहे, हे ठरवल्याशिवाय वेळेचे गणित सोडविता येत नाही. उदा. राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, नीती आणि प्रशासन हे अभ्यासघटक मोठे असल्याकारणाने त्यांना किती वेळ द्यावा लागेल याचा विचार सर्वप्रथम करायला हवा. त्यानंतर उर्वरित अभ्यासघटकांना वेळेचे वाटप करता येऊ शकते. कोणत्या घटकाचे आकलन होण्यास अधिक काळ लागू शकतो अथवा कमी लागू शकतो या मापदंडावरही वेळेचे वितरण करता येते. थोडक्यात, सर्व विषयांना योग्य न्याय देता येईल या दृष्टीने वेळापत्रक निश्चित करणे उपयुक्त ठरेल.
* मुख्य परीक्षेसाठीचा अभ्यास करताना संदर्भसाहित्यांवर कात्री चालवण्याचे कौशल्ये येणे हीसुद्धा आवश्यक बाब ठरते. याचा अर्थ आपण जी काही संदर्भसाधने वापरतो, ज्यामध्ये पायाभूत पुस्तके, संदर्भग्रंथ, वृतपत्रे तसेच नियतकालिके इत्यादींचा समावेश होतो, अशा साधन स्रोतांचे वाचन करताना या परीक्षेला पूरक आणि पुरेसा होईल एवढाच आवश्यक भाग त्यातून घ्यावा. त्यातील अनावश्यक भागाचे वाचन टाळता आले पाहिजे. एखाद्या संदर्भपुस्तकाचे संपूर्ण वाचन न करता त्यातील काही महत्त्वाचे िबदू विचारात घेण्याची गरज असते. त्यातून आपल्याला वेळ वाचवता येऊ शकतो. थोडक्यात, संदर्भसाहित्यातून कोणता भाग घ्यायचा आणि कोणता नाही याविषयीची संपादकीय दृष्टी आत्मसात करणे अनिवार्य आहे.
* या परीक्षेच्या अभ्यासाची चौकट नियोजनाशिवाय निर्माण करता येऊ शकत नाही. आपण जेव्हा अभ्यासाची चौकट आखतो, त्या वेळी आपला अभ्यास काही विषय घटकांपुरता केंद्रित व एकांगी पद्धतीने न होता सर्व विषयांना त्यांच्या गरजानुरूप समन्याय देणारा असेल, याची खात्री बाळगायला हवी. एखादा घटक कितीही छोटा असो, आपण आखलेल्या चौकटीतून निसटून जाता कामा नये. अभ्यासाच्या चौकटीमुळे तयारी करताना नेमकेपणा आणि अचूकता येते. त्यामुळे आपल्याला तयारी करायची म्हणजे नेमके काय करायचे, कसे करायचे आणि कोणत्या संदर्भसाहित्याचा कसा वापर करायचा आणि कोणती कौशल्ये आत्मसात करायची याचा आराखडा सुस्पष्ट होतो. नागरी सेवा परीक्षेचा व्यापक पट बघता परीक्षेच्या अभ्यासाची आपापली चौकट विकसित करणे नितांत आवश्यक आहे.
* नियोजनातून वाचन, चिंतन आणि लेखन यांचा धागा जुळवता यायला हवा. वाक्यांच्या पाठीमागील (केवळ शब्दार्थ नव्हे, मथितार्थही) अर्थ लक्षात घेऊन केलेल्या वाचनाला ‘सूक्ष्म वाचन’ म्हटले जाते. अशा वाचनातूनच आपल्या मनात चिंतनाची प्रक्रिया सुरू होते. या चिंतनातून किंवा विचारप्रक्रियेतून वाढलेली आकलनक्षमताच आपल्या लेखनात नवनिर्मिती आणू शकते. आपल्या नियोजनात लेखनाच्या सरावास योग्य वेळ देऊन त्यात नेमकेपणा व प्रभावीपणा याची हमी देता येईल.
या परीक्षेच्या अभ्यासाची तयारी सुरू करताना वरील हेतू साध्य होण्याकरता दीर्घकालीन नियोजनाचे महत्त्व अधोरेखित होते. दीर्घकालीन नियोजन आखताना ते लवचीक किंवा परिस्थितीसापेक्ष ठेवण्याचीही गरज असते. त्याच जोडीला प्रत्येक टप्प्यावरचे सूक्ष्म नियोजनसुद्धा तयार ठेवावे लागते. या परीक्षेची तयारी करताना विद्यार्थीसापेक्ष नियोजनाची पातळी वेगवेगळी असू शकते, याचे भान असणे अत्यावश्यक ठरते. नियोजनाची वरील चर्चा ही केवळ पद मिळवण्यापुरती मर्यादित न राहता आपण यशस्वितांच्या यादीमध्ये वरच्या क्रमांकावर कसे असू याचा विचार करून ही मांडणी केलेली आहे. नवीन वर्षांच्या सुरुवातीला या परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करण्याचा संकल्प ज्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे, त्यांना नियोजनाचे महत्त्व समजल्यानंतर त्यांच्या अभ्यासाची सुरुवात प्रत्यक्षात कुठून व कशी असेल, याची चर्चा आपण पुढील लेखात करणार आहोत.
हा लेख चंपत बोड्डेवार (admin@theuniqueacademy.com) यांनी लिहला असून दैनिक लोकसत्तावरून साभार घेण्यात आला आहे.