जालना जिल्ह्यातील सेलगांव ता.बदनापूर येथील रिक्षा चालकाच्या मुलाने यशाला गवसणी घालत जिद्द आणि मेहनतीच्या बळावर अवघड अशी राष्ट्रीय स्थरावरील केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा वयाच्या 22 व्या वर्षी देऊन देशातून 361 व्या क्रमांकावर पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन मराठवाड्यातून प्रथम येण्याची किमया शेख अन्सारने केली आहे.
शेख अन्सार शेख अहमद यांचे शिक्षण जालना शहरापासून पासून 13 कि.मी. अंतरावर असलेल्या बदनापूर तालुक्यातील सेलगांव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर त्याने जालना येथील बद्रीनाथ महाविद्यालयात 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतले. भारतीय प्रशासकीय सेवेत जायचेच असा निश्चय केल्यामुळे पुणे येथे चार वर्षे वस्तीगृहात राहून फर्ग्युसन महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले. कठोर मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर वयाच्या 22 व्या वर्षी आणि तेही पहिल्याच प्रयत्नात देशातून 361 वे स्थान मिळविले. युपीएससी परिक्षेचा निकाल जाहिर होताच अन्सारने आपल्या परिश्रमाचे फळ मिळाल्याचे सांगितले.
कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेच्या युगात मनात परिक्षेची कोणतीही भिती व न्यूनगंड न बाळगता अभ्यास करावा. कोणतेही यश सहज मिळत नाही हे लक्षात ठेवावे. आपली इच्छा शक्ती आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर अपयशला घाबरण्याचे काहीच कारण नाही. कारण या जगात अशक्य काहीच नाही अशा शब्दात शेख अन्सार याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवाहन स्पर्धा परीक्षेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
घरची परिस्थिती बिकट
शेख अन्सार यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची व हलाकिची आहे. वडील शेख अहमद वयाच्या 55 वर्षाचे असून सुद्धा आजही रिक्षा चालवून आपल्या परिवाराचा उदर निर्वाह करतात. शेख अन्सार यांची आई अजमद बी या दुसऱ्याच्या शेतात मजुरी करतात. शेख अन्सार यांना दोन भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. मोठी बहिण शबाना हिने 7 वी पर्यंतचे शिक्षण घेतले असून ती विवाहीत आहे. दुसऱ्या क्रमांकाची नाजमी ही सुद्धा 7 वी पर्यंत शिकली असून आपत्या पती समवेत राहते. तर सर्वात लहान अनीस याने इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण घेतले असून तो सध्या सिपोरा बाजार ता.भोकरदन येथे किराणा दुकानात कामाला आहे. अशा आर्थिक बिकट परिस्थितीत आपली जिद्द पूर्ण करुन भाऊ कलेक्टर झाला ही बातमी कळताच शेख अन्सारची बहीण शबाना यांच्या डोळ्यात आनंद अश्रु दिसत होते.
गरीब घरका बच्चा कलेक्टर बन गया इसका हमे फक्र है !
सहाब बच्चे की पढनेकी लगन देखी, उसके सर ने भी बोला बच्चा पढाई मे तेज है, उसे जितना चाहो उतना पैसा लगने दो लेकीन पढाओ.. असे सांगतांना त्यांच्या आईला अश्रु अनावर झाले आणि आज हमने जो बेचा उसका गम नही. बल्की हमारे जैसे गरीब घर का बच्चा कलेक्टर बन गया इसका हमे फक्र है. अशी मनोभावी प्रतिक्रीया अजमद बी शेख अहमद यांनी व्यक्त केली.
त्याचप्रमाणे अन्सारचे वडील शेख अहमद हे रिक्षा चालक असून शेलगांव ते जालना या मार्गावर ते प्रवासी वाहतुकीचे काम करतात. निकालाची माहिती कळताच अन्सारने त्यांना फोनवरुन माहिती दिली. तेव्हा त्यांना आनंदाश्रु आवरता आले नाहीत. शेख अहमद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण आतापर्यंत कष्टानेच सर्व काही उभे केले. मुलानेही कष्टाने यश मिळविले. त्यामुळे मुलगा अधिकारी झाला. तरी अपनी ‘मेहनत की रोजी रोटी भली’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
– एस.के.बावस्कर,
जिल्हा माहिती अधिकारी, जालना