नीलिमा किराणे
हव्या त्या अभ्यासक्रमाला प्रवेश न मिळण्याचा धक्का, दु:ख पचवायला थोडा वेळ जातो. पर्यायी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला तरी एवढे दिवस जपलेला मनातला करिअरचा ट्रॅक बदलताना अवघड जातं. मात्र, या नकाराला जेवढय़ा लवकर मागे सोडून नवा रस्ता धरू, तेवढी पुढे जाण्याची शक्यता वाढते.. आणि त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणं आवश्यक असतं!
हावी-बारावीनंतर सीईटी, जेईई अशा प्रवेश परीक्षांचे निकाल लागतात. अनेक विद्यार्थ्यांना हवा होता तिथे प्रवेश मिळतो, पण हवं ते न मिळालेल्यांची संख्या त्याहून कित्येक पटींनी जास्त असते. ज्यांच्या मनासारखं घडलंय त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन आहेच, पण ज्यांना मिळालं नाही त्यांचंही अभिनंदनच करायला हवं. कारण आयुष्याकडे पाहण्याचा जुना दृष्टिकोन बदलण्याची संधी त्यांना आली आहे. व्यक्ती म्हणून जास्त कणखर बनण्याची शक्यता अजमावता येणार आहे. मनातल्यापेक्षा वेगळं काहीतरी करून पाहण्याची एक संधीदेखील त्यांना मिळालेली आहे. हे अपयशाचं उदात्तीकरण नाही, तर नकाराकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन आहे. आयुष्यातल्या या एका ‘घटने’नं आपल्या मनावर एक ओरखडा जरूर उठवलाय, पण आता फोकस त्या ओरखडय़ावर करायचा की उरलेल्या बलस्थानांवर?
अपेक्षित करिअर मिळालेली व्यक्ती यशस्वी आणि न मिळणारी अपयशी असं आपण सरसकटपणे म्हणतो. पण खरंच असं असतं का? दोन-चार मार्कानी प्रवेश हुकलेल्यांना अपयशी कसं म्हणणार? भरपूर अभ्यास करूनही ऐनवेळेला आजारी पडल्यामुळे मार्क कमी पडलेल्यांच्या क्षमता शून्य कशा होऊ शकतात? तसेच फाजील आत्मविश्वासानं गाफील राहिल्यामुळे किंवा अगदी आळसामुळे मार्क कमी पडलेले असले तरीही तेवढय़ानं त्या व्यक्ती आयुष्यभरासाठी बाद कशी काय होऊ शकेल? आज परिस्थिती त्यांच्या हातातून सुटलीय, याचा अर्थ यापुढे आता आयुष्यभर अशीच परिस्थिती असणार असा कसा काढता येईल? खूप जीव घालूनही मनासारखं नाही झालं की मन खट्ट होतं हे खरं, पण हा एक नकार आपल्याला वेगळी परिपक्वता देऊच शकतो. मोठं करतो, हातपाय मारायला शिकवतो हे जास्त महत्त्वाचं नसतं का?
हवं ते करिअर न मिळण्याचा धक्का, दु:ख पचवायला थोडा वेळ जातो. त्यानंतर आपल्याला पडलेले मार्कस्, आपल्या क्षमता, आíथक परिस्थिती यानुसार बहुतेक विद्यार्थी पर्यायी अभ्यासक्रम निवडतात. आपल्या पहिल्या आवडीच्या जवळ जाणाऱ्या अभ्यासक्रमाला प्राधान्य दिलं जातं. उदा. ‘एमबीबीएस’चा प्रवेश हुकला तर दंतवैद्यक, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक असे अभ्यासक्रम निवडणं हे नेहमीचे पर्याय. त्यानंतर फार्मसी, फिजिओथेरपी, हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन इत्यादी. तिथे रस वाटला आणि प्रवेश मिळाला तर उत्तमच, पण त्यात समाधान वाटत नसेल तर आपल्या ‘फर्स्ट लव्ह’ला बाजूला ठेवणं तेव्हा भागच असतं. या टप्प्यावर एकदा पूर्णपणे नव्यानं विचार करून पाहायचा. म्हणजे आपल्या दुसऱ्या बलस्थानावर, सेकंड लव्ह- पॅशनवर फोकस करायचं. उदा. कॉम्प्युटर आवडतो, आपली कला-चित्रकला चांगली आहे. व्हिज्युअल सेन्स आणि कल्पनाशक्ती चांगली आहे तर अॅनिमेशन, फोटोग्राफीसारख्या पूर्ण वेगळ्या क्षेत्रांचा विचार करणंही शक्य असतं.
हे सगळं एकीकडे व्यावहारिक पातळीवर चालू असतं, कारण दुसरा पर्याय निवडण्याला आता पर्याय नसतो. पण एवढे दिवस जपलेला मनातला करिअरचा ट्रॅक बदलताना अवघड जातं, ते आपल्या ‘फर्स्ट लव्ह’ला मनातून काढून टाकणं. या एक-दोन वर्षांत व्यावसायिक अभ्यासक्रम हातातून सुटले तर ते कायमचे सुटतात खरे, पण त्याबाबत असंही आपण आता काय करू शकणार असतो? या नकाराला जेवढय़ा लवकर मागे सोडून नवा रस्ता धरू, तेवढी पुढे जाण्याची शक्यता वाढते; कारण पहिल्या गोष्टीतून मन पूर्ण मुक्त झाल्यानंतरच आपल्याला दुसऱ्या गोष्टीला १०० टक्के देता येणार असतात.
तर मग त्या चुकलेल्या गाडीच्या दु:खातून मनाला मोकळं कसं करायचं? तर हे करिअर आपल्या मनात कधीपासून आणि कशामुळे घट्ट बसलं ते प्रथम शोधायचं. लहानपणापासून आपल्यावर ज्यांचा प्रभाव असतो, त्यांचा व्यवसाय किंवा त्यांचं मत आपली करिअरविषयक मतं घडवतं. ती व्यक्ती म्हणजे आई-बाबा, काका-मामा, काकू-मावशी, कौटुंबिक स्नेही, परिचित, आवडलेली/आदर्श मानलेली व्यक्ती, आपले मित्र असं कुणीही असू शकतं. शोधल्यानंतर लक्षात येतं की, अमुक चच्रेमुळे, अमुक प्रसंगांमुळे हे करिअर आपल्या मनात घट्ट रुतून बसलंय. मग ‘खरंच हे करिअर हा माझ्यासाठी एवढा जीवनमरणाचा प्रश्न होता का?’ असा प्रश्न स्वतला विचारून त्याचं उत्तर प्रामाणिकपणे शोधणं हा त्या अडकलेपणातून मोकळं होण्याचा एक मार्ग आहे.
‘अमुक एक करिअर असेल तरच मी यशस्वी, नाहीतर कशात काही अर्थच नाही’ या विधानाचा उगम कुठून का असेना, हा विचार अताíकक असतो. त्यातल्या ‘च’ मुळे त्याला विलक्षण धार येते आणि ती आपल्यालाच कापत जाते. त्यापेक्षा, ‘अमुक करिअर केलेलं मला आवडलं असतं, जास्त मजा आली असती’ हे विधान जास्त वस्तुनिष्ठ आहे. आपली वेदना ते मांडतं, पण आपल्यालाच कापणारी ‘च’ची धार तिथे बोथट होते. ‘हेच करिअर हवं होतं’ मधल्या ‘च’ चा हा त्रास आहे, हे समजून घेऊन तो ‘च’ काढण्याचा प्रयत्न करायचा.
‘मी अमुक करणार आहे, असं सर्वाना सांगत होते/ होतो. ते मिळालं नाही, आता मला कुणाला तोंडसुद्धा दाखवावंसं वाटत नाहीए,’ अशी अगतिक लाजिरवाणी भावना कधीकधी मनात िपगा घालत असते. पर्यायी करिअर चांगलं मिळूनही आपल्या मनातलं स्वतबद्दलचं ‘बिच्चारं’ वाटणं जात नाही. ही ‘सेल्फ पिटी’ फक्त सहानुभूती शोधत राहते. स्वत:जवळ, इतरांजवळ रडगाणं गाते. ‘त्यात माझी काही चूक नव्हती’ हे पुन:पुन्हा पटवत राहते. तात्पुरतं बरं वाटत असल्याने ‘सेल्फ पिटी’च्या व्हर्चुअल जाळ्यात अडकलेलं लक्षातच येत नाही. त्यातून वास्तवात काहीच बदल घडणार नसतो. नव्यानं निवडलेल्या क्षेत्राकडेही आपण सावत्रपणेच पाहतो, प्रेमानं पाहात नाही. नव्या विषयाला सर्व शक्तीनिशी भिडत नाही. त्यामुळे पुढचा रस्तादेखील अर्धवट उघडतो. त्यासाठी जाणीवपूर्वक त्या बिचारेपणातून बाहेर पडलं पाहिजे. ठाम व्हायला पाहिजे. एकदा निर्णय घेतल्यानंतर तो आपला ‘चॉइस’ असला पाहिजे. अगतिकता नाही. वस्तुस्थिती मनापासून स्वीकारल्यानंतर झगडा संपतो. नवा रस्ताही आपला वाटायला लागतो. त्यासाठी स्वत:वर विश्वास हवा.
काही विद्यार्थ्यांना विशिष्ट अशी पॅशन नसते. त्यांना अनेक गोष्टी आवडतात आणि करता येणार असतात. अशांचा प्रश्न आणखी वेगळा असतो. असंख्य पर्यायांमधून काय निवडायचं हे त्यांना ठरवता येत नाही. या क्षणाला घेतला जाईल तोच पूर्ण आयुष्याचा निर्णय असं वाटतं आणि मग हा निर्णय जीवनमरणाचा प्रश्न बनतो. माझा निर्णय योग्य ठरेल ना? मला जमेल ना? मी निर्वविाद यश मिळवेन ना? अशा अनेक भीती वाटायला लागतात. अशा वेळी थोडं सबुरीनं घ्यायचं. आपल्याला अजिबात नकोशी असणारी दिशा निवडायची नाही, इतकीच काळजी घ्यायची.
सध्याच्या चालू ट्रेंडनुसार काहीजण कुठेतरी प्रवेश घेतात, शिक्षणही पूर्ण होतं, पण त्यात जीव रमत नाही. आपली खरी पॅशन कालांतरानं निश्चित कळते. हे कन्व्हिक्शन पक्कं होण्यासाठी स्वत:चा शोध घ्यावा लागतो, अनुभव घ्यावे लागतात, आपली काही र्वष अशा स्वत:वरच्या प्रयोगांना देण्याचीदेखील अनेकांना गरज असते. पण विशिष्ट शिक्षण, विशिष्ट नोकरी, विशिष्ट वेतन, विशिष्ट स्टेटस.. आणि तेही लवकरात लवकर, असं एक चाकोरीतलं समाजमान्य चित्र मनात पक्कंअसतं. एवढं, की प्रयोग करणं, इतर शक्यता अजमावणं हे जाणीवपूर्वक घडत नाही.
एकदा स्वत:ची पॅशन सापडली की रस्ताही सापडत जातो. या पक्क्य़ा खात्रीपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ देणं ज्यांना शक्य आहे, त्यांनी प्रयोगांना थोडा वाव दिला पाहिजे, स्वत:च्या आवडीचा शोध घेतला पाहिजे, थोडा धीर धरला पाहिजे. मग चारचौघांपेक्षा वेगळं काहीतरी घडू शकतं. डॉक्टर होऊनही आपल्या फर्स्ट लव्हकडे परत गेलेले चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल, संगीतकार सलील कुलकर्णी आपल्याला माहीत असतात. टेक्स्टाइलच्या व्यवसायातून बाहेर पडून तिशीच्या दरम्यान ‘एनएसडी’मध्ये दाखल होणारे अभिनेते अतुल कुलकर्णी माहीत असतात. ‘आपल्याला काय हवं आहे, काय नकोय’चा निर्णय जेव्हा अनुभव घेतल्यानंतर केला जातो तेव्हा तिथे चूक-बरोबरची भीतीच उरत नाही. ते मिळवण्यासाठी कितीही कष्ट घेण्याची तयारी मनाच्या या पक्क्या खात्रीतूनच येते. द्विधा मन:स्थितीत निर्णय घेताना मनात भीती असते, शंका असते, आत्मविश्वास नसतो. त्यामुळे कन्व्हिक्शनपर्यंत पोहोचण्यामध्ये काही र्वष ‘वाया गेली’ असं म्हणणं धाडसाचं ठरेल. तेवढा प्रवास केल्याशिवाय ती खात्री येणार नसते आणि दरम्यानच्या काळात आपण काहीतरी शिकतच असतो. किमान एक परिपक्वता तर येतेच.
थोडक्यात, आपण चुकीचं करिअर तर निवडणार नाही? अशी भीती बाळगल्यानंतर आपण योग्य करिअर निवडू अशी शक्यता नसते. भीती आपल्याला द्विधा बनवते. खरं तर तंत्रज्ञान अशा वेगानं वाढतंय की, वर्षांगणिक नवीनवी करिअर येताहेत. आजपर्यंत कल्पनाही न केलेल्या शक्यता निर्माण होताहेत. रोजगाराच्या संधी वाढताहेत. मग आपण घाबरायचं कशाला? स्वत:ला काही प्रश्न विचारायचे. माझा पुढचा रस्ता आधीपासूनच आखीव, रेखीव, गुढय़ा-तोरणांनी सुशोभित असेल, तरच मी तो चालणार आहे का? आणि नसेल तर चालायचंच थांबणार आहे का? की हा अनोळखी रस्त्याही मी देखणा करेन आणि दिमाखात चालेन या निर्धारानं पुढची पावलं टाकणार आहे?
सौजन्य: दैनिक लोकसत्ता.