समाजसेवेसाठी जीवन समर्पित करा – डॉ. जगन्नाथ वाणी
जळगाव- कोणत्याही क्षेत्रात जा, परंतु समाजाचे ऋण फेडा आणि समाजसेवेसाठी जिवन समर्पित करा,असे प्रतिपादन कॅनडास्थित ’ऑर्डर ऑफ कॅनडा सर्वोच्च बहुमान प्राप्त डॉ. जगन्नाथ वाणी यांनी केले. दीपस्तंभ फाऊंडेशन आयोजित युपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांच्या यशवंतांच्या सत्काराच्या यशोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर पोलीस अधिक्षक एस. जयकुमार, धुळ्याचे माजी आमदार पी. डी. दलाल, खा. रक्षाताई खडसे, माजी शिक्षक आमदार जे. यु. ठाकरे, निळकंठ गायकवाड, भरत अमळकर, सुरेश पांडे उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्री. वाणी म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती समाजाचे देणे लागतो. समाजातील प्रत्येक घडकाच्या विकासासाठी सामुहिक प्रयत्न केले पाहिजेत. समाजात एकत्र राहतांना कोणाचेही मन दुखवु नका असा सल्लाही त्यांनी दिला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना एस. जयकुमार म्हणाले की, आपण यशासाठी उत्तम नियोजन करतो परंतु अंमबजावणीमध्ये कमी पडतो कोणतेही कार्य करतांना उत्तमाचा ध्यास घ्या. कोणत्याही टप्प्यावर अपयश आले तर नाराज होऊ नका. शिस्तबध्द , प्रामाणिक मेहनत केल्यास यश नक्की मिळते. आज देशात प्रामाणिक प्रशासनाची गरज आहे.
युपीएसी परीक्षेद्वारे आय.पी.एस. पदी निवड झालेले मयुर पाटील म्हणाले की, मी १२ वी मध्ये ५७ टक्के मिळवले, इंजिनिअरिंग करतांना दोन वेळा नापास झालो परंतु बी. ई. करतांना युपीएससी करण्याचे ध्येय ठरवले.साधारण विद्यार्थी सुध्दा या परीक्षा यशस्वी होवु शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करतांना सातत्य आणि संयम आवश्यक आहे. आय. आर. एस. पदी निवड झालेले प्रविण चव्हाण यांनी उत्स्फुर्त मनोगत मांडताना म्हटले की, स्वप्नांना कृतीची जोड द्या. आज मी ८ व्यांदा स्पर्धा परीक्षा यशस्वी झालोय. चिखलातुन पायी शाळेत पायपीट करणारा शिक्षक ते आय.आर.एस असा प्रवास केला. माझ्या विधवा आईच्या डोळ्यांत आनंदाने अश्रु येण्यासाठी मी अभ्यास केला. आई व वडिलांच्या डोळ्यातील आनंदाश्रु जगातील सर्वात्र मौल्यवान वस्तु आहे. युपीएससी करतांना हिंदी व इंग्रज़ी दोन्ही भाषांवर प्रभुत्व मिळवा असेही ते म्हणाले. या प्रसंगी गडचिरोली जिल्ह्यांत भामरागड येथील डी.वाय. एसपी. पदावर असणारे दीपस्तंभचे विद्यार्थी विशाल ठाकुर यांच्या नक्षलविरोधी कामाबद्दल राष्ट्रपती शौर्य पदक मिळाल्याबद्दल त्यांच्या आई-वडीलांचा विशेष सन्मान करण्यात आला.
युवकांना संबोधित करतांना खा. रक्षाताई खडसे म्हणाल्या की, मी सध्या राजकारणाच्या करिअरमध्ये संघर्ष करीत आहे. मी माझ्या पतींच्या निधनाचे दु:ख विसरुन जेव्हा समाजातील माता-भगीणींचे दु:ख अनुभवले तेव्हा समाजाचे ऋण फेडायचे व दु:ख दुर करावयचे असे ठरवले. राजकारणाद्वारे समाजाची सेवा करता येते असा आदर्श मला निर्माण करायचा आहे. आज देशाला हजारो सृजनशील तरुणांची गरज आहे. दिल्लीमध्ये काम करतांना भाषेची प्रामुख्याने अडचन येते त्यासाठी त्यासाठी इंग्रज़ी व हिंदी भाषेवर मेहनत घ्या असा सल्ला त्यांनी
दिला.
याप्रसंगी दीपस्तंभ शिष्यवृत्ती अभियानातील स्पर्धा परीक्षा यशवंताच्या सत्कार आला. मागील वर्षी स्पर्धा परीक्षांचे शिक्षण शिष्यवृत्तीतुन घेणारे पंकज पाटील यांनी गरी व होतकरु विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ शिष्यवृत्ती योजनेला ११ हजार रुपयांची देणगी दिली तर योगेश कोठावदे यांनी ५००० रु देणगी दिली. तसेच शारिरीक विकलांगतेवर मात करुन स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या अपंग विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आणि तलाठी, लिपीक, पोलीस इ. पदांवर यशस्वी झालेल्या ३० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
अमेरिकेतील कॅलीगर येथील रटगर्स विद्यापीठात सुवर्णपदक मिळविणार्या निमिष भालचंद्र पाटील यांचा तसेच एम.एच.सी.ई.टी परीक्षेत प्रथम आलेल्या आशय अरुण पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दीपस्तंभचे जयदीप पाटील यांच्या संपुर्ण विज्ञान या पुस्तकाची तिसरी आवृत्ती तसेच दीपस्तंभचे प्रकाशनाचे करिअर आयकॉन, करिअर डायरी, आय.ए.एस राजेश पाटील यांच्या , ताई मी कलेक्टर व्हयनू पुस्तकाचे इंग्रजी अनुवाद आणि संदीप साळुंखे यांच्या अंतरीच्या दिवा या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी असिटंट कामांडर राहुल गरुड, विनोद पाटील, योगिता धांडके यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक यजुर्वेंद्र महाजन तर सुत्र संचालन जयदीप पाटील आभार निळकंठ गायकवाड यांनी मानले.