⁠  ⁠

अंधत्वावर मात करत सागर एमपीएससीच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत प्रथम

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 2 Min Read
2 Min Read

निसर्गाच्या हातून एखादी चूक घडली की माणसाला अपंगत्व येत आणि या अपंगत्वावर मात करण्यासाठी निसर्गच आपल्याला एक शक्ती जास्त परिधान करतो असंच उदाहरण म्हणजे या वर्षी STI परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला सागर सुभाष ढेरे हा तरुण होय.

नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील लोहगाव या गावातून एका अंध तरुणाने MPSC STI परीक्षेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सागरचे कौतुक करावे तितके थोडे आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे मागील वर्षी MPSC STI च्या एकशे एक्याऐंशी जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला यात सागर सुभाष ढेरे हा तरुण एकशे एक्कावन्न गुण मिळवून राज्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. सागरला डाव्या डोळ्याने दिसत नाही आणि उजव्या डोळ्याने सुद्धा त्याला अतिशय कमी दिसते.

सागर तसा लहानपणापासूनच अतिशय हुशार सागरला शाळेत शिकत असताना फळ्यावर लिहिलेले अजिबात दिसायचे नाही सागर नेहमी पहिल्या बेंचवर बसायचा. मात्र तरीही फळ्यावरच दिसत नसल्यामुळे सागर आपल्या मित्राच्या वहीमध्ये पाहून अभ्यास पूर्ण करायचा असे शिक्षण घेत सागरने बारावी सायन्सपर्यंत शिक्षण पूर्ण केले. विज्ञान विषयाचा अभ्यास करताना प्रॅक्टिकल करत असताना त्याला खूप अडचण येत असे म्हणून सागरने बारावीनंतर कला शाखेत पदवी घेण्याचे ठरविले व सागरने कला शाखेत सोलई येथील महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले.

या सर्व प्रवासात सागरचे वडील सुभाष ढेरे यांची मोठी मदत लाभली सागरचे वडील लोहगाव येथे संत एकनाथ माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत तर आई सुशीला गृहिणी आहे.सागरच्या आई वडिलांचा सागरच्या विकासात निश्चितच खूप मोठा वाटा आहे. आई वडिलांच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने सागरने वडाळा येथून बीएडचे शिक्षणही पूर्ण केले. तोपर्यंत सागरला स्पर्धा परीक्षांविषयी कुठलीही माहिती नव्हती मात्र २०१५-२०१६ मध्ये जळगाव येथील दीपस्तंभ फाउंडेशन संचालित मनोबल केंद्रासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली या परीक्षेत सागर उत्तीर्ण झाला व त्यामुळे त्याला देशातील पहिल्या अंध व अपंग विद्यार्थ्यांसाठीच्या स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रवेश मिळाला.

दीपस्तंभच्या मनोबल केंद्रात प्राध्यापक यजुर्वेंद्र महाजन सरांच्या मार्गदर्शनाने त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली, मनोबल केंद्रातील ऑडिओ पुस्तके कॅसेट्स तसेच मार्गदर्शक यांच्या मदतीने सागरने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला व या वर्षी विक्रीकर निरीक्षक परीक्षेत सागर प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

Share This Article