⁠  ⁠

Current Affair 15 November 2018

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

इस्त्रोची यशस्वी झेप! GSAT-29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

  • भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने बुधवारी संध्याकाळी GSLV-MK-III D2 या प्रक्षेपकाद्वारे GSAT-29 या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. जीएसएलएव्हीने संध्याकाळी ५.०८ मिनिटांनी जीसॅट-२९ उपग्रहासह अवकाशाच्या दिशेने उड्डाण केले.
  • आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन हे प्रक्षेपण झाले. जीएसएलव्ही भारताचे सर्वात वजनदार रॉकेट असून त्याला बाहुबली सुद्धा म्हटले जाते.
  • श्रीहरीकोटोवरुन झालेले हे ६७ वे प्रक्षेपण होते. जीसॅट-२९ हा भारताचा ३३ वा दळणवळण उपग्रह आहे. जीसॅट-२९ उपग्रह ३,४२३ किलो वजनाचा आहे. या उपग्रहामुळे ईशान्य भारत आणि जम्मू-काश्मीरचे दुर्गम भाग इंटरनेट सुविधेने जोडता येतील.
  • हे रॉकेट बनवायला भारतीय शास्त्रज्ञांना १५ वर्ष लागली. या रॉकेटच्या एका उड्डाणासाठी येणारा खर्च ३०० कोटी रुपये आहे.

नेओमी राव अमेरिकेत न्यायाधीशपदी

  • भारतीय-अमेरिकन वकील नेओमी राव (४५) यांची अमेरिकेच्या डीसी सर्कीट अॅपिलेट न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. हे न्यायालय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानंतरचे सर्वात शक्तिशाली न्यायालय मानले जाते.
  • ट्रम्प यांच्या निर्णयावर सिनेटने शिक्कामोर्तब केले, तर यापदावर बसणाऱ्या न्या. श्री श्रीनिवासन यांच्यानंतरच्या त्या दुसऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्ती असतील. राव या सध्या ऑफिस ऑफ इन्फॉर्मेशन अँड रेग्युलेटरी अफेअर्सच्या प्रशासक आहेत.

संसदेचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान

  • संसदेचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान होणार आहे. संसदीय प्रकरणांतील कॅबिनेट कमिटीने बुधवारी राष्ट्रपतींकडून यावर सहमती मागितली.
  • या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मध्य प्रदेश, राजस्थानसहीत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल येणार आहे. या वेळी सर्वांची नजर राम मंदिर उभारणीबाबतच्या सरकारच्या भुमिकेवर असणार आहे. कारण भाजपाचे राज्यसभा खासदार राकेश सिन्हा यांनी या प्रकरणी खासगी विधेयक आणणार असल्याची घोषणा केली होती. तर संतांकडून सरकारला याच अधिवेशनात राम मंदिराचा मार्ग मोकळा करण्याची मागणी होत आहे.

चलनात येणार ७५ रूपयांचे नाणे

  • लवकरच ७५ रूपयांचे नाणे चलनात येणार आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे प्रथम तिरंगा फडकावल्याच्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून सरकार ७५ रूपयांचे नाणे चलनात आणनार आहे.
  • यासंदर्भातील नोटिफिकेशन अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. या नव्या ७५ रूपयांच्या नाण्यावर सेल्युलर जेलच्या मागे तिरंग्याला सलामी देत असलेल्या नेताजींचे चित्र असेल. तसेच नाण्यावर देवनागरी आणि इंग्रजीत ‘प्रथम ध्वजारोहण दिवस’ असे लिहलेले असेल.
  • चलनात येणारे ७५ रूपयांच्या नाण्याचे वजन ३५ ग्रॅम आहे. यामध्ये ५० टक्के चांदी तर ४० टक्के तांबे असणार आहे. तर निकेल आणि जस्त धातूचे प्रमाण प्रत्येकी पाच टक्के असणार आहे.

मोदी- पेन्स यांच्यात व्यापक चर्चा

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांच्यात बुधारी संरक्षण आणि व्यापारातील सहकार्यासह व्यापक द्विपक्षीय तसेच परस्पर हिताच्या मुद्दय़ांवर चर्चा झाली. दहशतवादाचा सामना करण्याचे उपाय आणि भारत- पॅसिफिक क्षेत्र मुक्त व खुले ठेवण्याच्या आवश्यकतेबाबतही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. येथे झालेल्या पूर्व आशिया परिषदेच्या (ईस्ट एशिया समिट) निमित्ताने दोन्ही नेत्यांची सौहार्दपूर्ण भेट झाली.
  • व्यापाराशी संबंधित द्विपक्षीय मुद्दय़ांवरही दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गेल्या दोन वर्षांत अमेरिकेची भारतातील आयात ५० टक्क्यांनी वाढली आहे, याचा मोदी यांनी उल्लेख केला..

श्रीलंका: राष्ट्रपती सिरिसेनांना धक्का,
पंतप्रधान राजपक्षेंविरोधात संसदेचे मतदान

  • सर्वोच्च न्यायालयाने झटका दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांना आणखी एक धक्का बसला आहे. संसदेने नवनियुक्त पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव मंजूर केला आहे. विरोधकांनी राजपक्षे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. यावर मतदान झाले.
  • संसदेने पंतप्रधान महिंद्रा राजपक्षेंविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती श्रीलंका संसदेचे अध्यक्ष कारु जयसूर्या यांनी दिली.

तामिळनाडूला धडकणार ‘गज’ वादळ 

  • बंगालच्या उपसागरासह अंदमान समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर ‘गज’ चक्रीवादळात झाले आहे. हे चक्रीवादळ तामिळनाडू व आंध्रप्रदेशच्या किनारी भागात धडकण्याची शक्यता आहे.
  • २ महिन्यांपूर्वीच्या तितली वादळापेक्षा या चक्रीवादळाची तीव्रता मोठी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गज वादळ ताशी १२ ते १५ किमी वेगाने तामिळनाडू व आंध्रकडे सरकत आहे.

धावपटू हिमा दासची UNICEFच्या भारतीय सदिच्छादूतपदी नियुक्ती

  • आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी हिमा दास हिची UNICEFची भारतीय युवा सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली.
  • हिमा दासने IAAF वर्ल्ड अंडर २० अथलॅटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये तिने ४०० मीटर फायनलमध्ये सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला होता. ट्रॅक इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिला भारतीय महिला ठरली होती.
  • १८ वर्षीय हिमाने ५१.४६ सेकंदात ४०० मीटरचे अंतर पार करीत पहिली जागा मिळवली होती.

प. बंगालचे नाव ‘बांग्ला’ करण्यास केंद्राचा नकार

  • पश्चिम बंगालचे नाव बदलून ‘बांग्ला’ करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव मंजूर न करता परत पाठविताना केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्याला ‘पश्चिमबंगा’ असे पर्यायी नाव सुचविले.
  • ‘पश्चिमबंगा’ हे राज्यातील भाजपाच्या पसंतीचे नाव आहे. ‘बांगला’ या नावात बांग्लादेश या देशाच्या नावाशी साधर्म्य असल्याने परराष्ट्र मंत्रालयाने त्यास आक्षेप घेतला.
Share This Article