⁠  ⁠

Current Affair 27 November 2018

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

निवडणूक लढवण्यासाठीची वयोमर्यादा घटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

  • लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी निश्चित करण्यात आलेली वयोमर्यादा घटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे सध्याची २५ वर्षे वयाची अट निवडणूक लढवण्यासाठी कायम राहणार आहे.
  • सार्वत्रिक निवडणुका लढवण्यासाठी २५ वर्षे वयाची अट शिथील करुन ती १८ वर्षे करण्यात यावी या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी सध्याची २५ वर्षे वयोमर्यादा कायम राहणार आहे.

नासाच्या ‘इनसाइट’ यानाचे मंगळ ग्रहावर यशस्वी लँडिंग

  • नासाचे इनसाइट (इंटरिअर एक्सप्लोरेशन यूजिंग सिस्मिक इन्व्हेस्टिगेशन) यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. सोमवार आणि मंगळवारच्या दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १ वाजून २४ मिनिटांनी इनसाइट यान मंगळ ग्रहावर उतरले. नासाकडून याचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले. मंगळ ग्रहावरील रहस्य जाणून घेण्यासाठी हे यान बनवण्यात आले आहे. ग्रहाच्या पृष्ठभागावर यान उतरताना १९८०० किमी प्रति तास वेगाने जाणारे हे यान सहा मिनिटांत शून्य वेगावर आले. त्यानंतर यान पॅराशूटमधून बाहेर आले आणि लँड झाले.
  • सहा महिन्यांच्या प्रवासानंतर इनसाइटने मंगळावर लँड केले. नासाच्या या प्रकल्पासाठी १ बिलियन डॉलर म्हणजेच ७० अब्ज रुपये खर्च करण्यात आले आहे. सौर ऊर्जा आणि बॅटरीने ऊर्जा मिळवणाऱ्या लँडरला २६ महिन्यांपर्यंत संचलित केले जाऊ शकते. परंतु, नासाला यापेक्षा अधिक कालावधी ते सुरु राहू शकेल अशी अपेक्षा आहे.
  • नासाने म्हटले आहे की, इनसाइट यान पृष्ठभागावर १० ते १६ फुट खोल खड्डा करेल. यापूर्वीच्या मंगळ अभियानांच्या तुलनेत हे १५ टक्के अधिक खोल असेल. २०३० पर्यंत मनुष्याला मंगळावर पाठवण्याच्या प्रयत्नासाठी नासाला मंगळ ग्रहाचे तापमान समजणे महत्वाचे आहे.

अझीम प्रेमजी यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

  • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) उद्योगपती अझीम प्रेमजी यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘शेव्हेलियर डि ला लीज डि ऑनर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
  • आयोजकांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतात आयटी उद्योग विकसित करणे, फ्रान्समध्ये आर्थिक गुंतवणूक करणे तसेच अझीम प्रेमजी फाऊंडेशन आणि विद्यापीठाच्या माध्यमातून एक समाजसेवकाच्या रुपात त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान केला जात आहे.
  • प्रेमजी यांच्यापूर्वी भारतातील बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी आणि अभिनेता शाहरुख खान यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

सुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

  • निवडणूक आयुक्त सुनील अरोरा देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त असतील. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांचे स्थान ते घेतील. निवडणूक आयोगाने सोमवारी या नियुक्तीला पुष्टी दिली. येत्या २ डिसेंबरला अरोरा हे पदभार स्वीकारतील. रावत यांचा कार्यकाळ १ डिसेंबर रोजी संपुष्टात येणार आहे.
  • अरोरा हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) १९८० च्या तुकीडीचे राजस्थान केडरचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. ३१ ऑगस्ट २०१७ रोजी त्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.
  • राजस्थानमध्ये प्रशासकीय सेवेत असताना ६२ वर्षीय अरोरा यांनी विविध विभागाचे कामकाज पाहिले आहे. त्याचबरोबर ते केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाचे सचिव आणि कौशल विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. त्याचबरोबर त्यांनी अर्थ आणि वस्त्रोद्योग आणि योजना आयोगाच्या विविध पदांवर काम केले आहे. ते १९९३ ते १९९८ पर्यंत राजस्थानच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि २००५ ते २००८ पर्यंत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून काम केले आहे.
Share This Article