चालू घडामोडी : ०१ जून २०२१
आर्थिक वर्ष २०२०-२१ वर्षातील जीडीपी आकडेवारी जाहीर
भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या ४० वर्षांतील निराशाजनक कामगिरी केली आहे. करोनाच्या संकटाने मोठा तडाखा बसलेल्या भारताचा २०२०-२१ या आर्थिक वर्षांतील विकास दर (सकल राष्ट्रीय उत्पादन) उणे (-) ७.३ टक्के नोंदवला गेला.
चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे १९७९-८० या वर्षांत आर्थिक विकासदराची उणे ५.२ टक्के घसरण झाली होती. त्यानंतर प्रथमच विकासदर उणे ७.३ टक्क्य़ांवर घसरला आहे. देशाचा विकास दर दुहेरी संख्या गाठण्याची अपेक्षा खुद्द सरकारनेही सोडून दिली होती.
देशात करोना साथीचा उद्रेक मार्च २०२० मध्ये झाला. परिणामी गेल्या वर्षी देशव्यापी टाळेबंदी लागू झाली. सप्टेंबर २०२० मध्ये करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याआधीच अर्थविकास दर उणे स्थितीत आला.
कठोर टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यातच म्हणजे एप्रिल ते जून २०२० दरम्यान विकास दर थेट उणे २४.४ टक्के नोंदला गेला होता, तर तिसऱ्या तिमाहीत तो शून्यावर आला. चौथ्या तिमाहीत त्याने १.६ टक्क्याच्या रूपात थोडी उभारी घेतली होती.
२०२०-२१ या आर्थिक वर्षांतील उणे विकास दर हा राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या उणे ८ टक्के आणि रिझव्र्ह बँकेच्या उणे ७.५ टक्के अंदाजानजीक आहे. अर्थवेगाच्या गेल्या चारपैकी तीनही तिमाही उणे स्थितीत गेल्या आहेत.
विकासदर असा..
२०२०-२१ आर्थिक वर्ष : उणे ७.३ टक्के
जानेवारी-मार्च २०२१ : १.६ टक्के वाढ
ऑक्टोबर-डिसेंबर २०२० : ०.४ टक्के वाढ
जुलै – सप्टेंबर २०२० : उणे ७.३ टक्के
एप्रिल-जून २०२० : उणे २४.४ टक्के
क्षेत्रवाढीचा निर्देशांक
उंचावला : देशातील प्रमुख आठ क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारा निर्देशांक चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्याच महिन्यात उंचावला आहे. एप्रिल २०२१ मध्ये तो ५६.१ अंश होता. ५० अंश हा समाधानकारक निर्देशांक मानला जातो
आशियाई बॉक्सिंग स्पर्धा : संजीतला सुवर्ण
आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत संजीतने भारताला एकमेव सुवर्णपदक मिळवून दिले.
अमित पांघल आणि शिवा थापा यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
उत्तरार्धात ९१ किलो वजनी गटात संजीतने पाच वेळा आशियाई अजिंक्यपद विजेत्या आणि रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या व्हॅसिली लेव्हिलचा ४-१ असा पराभव केला.
५२ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात उझबेकिस्तानच्या शाखोबिदिन झॉयरोव्हने जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पध्रेतील कांस्यपदक विजेत्या अमितवर असा निसटता विजय मिळवला.
६४ किलो गटाच्या अंतिम सामन्यात मोंगोलियाच्या आशियाई रौप्यपदक विजेत्या बतारसुख शिंझॉरिगने ३-२ असे विभाजीत निकालाआधारे नामोहरम केले.
‘सीआयआय’ अध्यक्षपदी टी. व्ही. नरेंद्रन; हीरो मोटोकॉर्पचे पवन मुंजाल उपाध्यक्ष
भारतीय उद्योग महासंघाचे (सीआयआय) वर्ष २०२१-२२साठी टाटा स्टील लिमिटेडचे मुख्याधिकारी व व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. तर हीरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल यांनी उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे.
देशव्यापी उद्योग संघटनेच्या सोमवारी दूरचित्र संवादाद्वारे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड जाहीर करण्यात आली.
बजाज फिनसव्र्ह लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज हे २०२१-२२ साठी ‘सीआयआय’चे नियुक्त अध्यक्ष असतील.
नवनियुक्त अध्यक्ष नरेंद्रन यांनी कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक यांच्याकडून पदभार स्वीकारला.
२०१३ ते २०१८ या कालावधीत ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या ‘मायनिंग अँड मेटल्स गव्हर्नर्स कौन्सिल’चे सह- अध्यक्ष होते.
ते १९९६ मध्ये सीआयआयच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष होते. संजीव बजाज हे २०१९-२०२० दरम्यान सीआयआयच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष होते.