चालू घडामोडी : ३ ऑगस्ट २०२१
दिपक दास: भारताचे 25 वे लेखा महानियंत्रक (CGA)
दिपक दास हे 01 ऑगस्ट 2021 पासून भारताचे नवीन आणि 25 वे लेखा महानियंत्रक (CGA) आहेत.
दिपक दास हे 1986च्या तुकडीचे भारतीय नागरी लेखा सेवा (ICAS) अधिकारी आहेत.
भारताचा लेखा महानियंत्रक
भारताचा लेखा महानियंत्रक हा भारत सरकारच्या केंद्रीय वित्त मंत्रालयातील व्यय विभागाचा प्रमुख असतो.
केंद्रीय सरकारच्या खात्यांशी संबंधित सर्व माहिती लेखा महानियंत्रक प्रसिद्ध करतो. त्यात अर्थसंकल्पाचा अंदाज, वित्तीय / महसूल तूट इत्यादींशी संबंधित माहितीचा समावेश असतो.
पंतप्रधानांचे सल्लागार सिन्हा यांचा राजीनामा
पंतप्रधान कार्यालयातील सल्लागार अमरजित सिन्हा यांनी राजीनामा दिला आहे. ते १९८३ च्या बॅचचे बिहार केडरचे आयएएस अधिकारी आहेत. सिन्हा यांची गेल्या वर्षी फेब्रुवारीत पीएमओत नियुक्ती झाली होती. ते सामाजिक क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांचे काम पाहत होते.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचे अध्यक्षपद भारताकडे
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचा ऑगस्टमधील अध्यक्ष म्हणून दहशतवादाचा मुकाबला, शांतता रक्षण व सागरी सुरक्षा या बाबींना प्राधान्य देण्यात येईल, असे भारताने म्हटले आहे.
भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी राजदूत टी.एस तिरुमूर्ती यांनी दृश्यफीत संदेशात सांगितले, की सुरक्षा मंडळाचे अध्यक्षपद भारताला ऑगस्ट महिन्यासाठी मिळाले आहे ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे.
भारत ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना हा बहुमान मिळाला आहे. भारताने रविवारी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. फ्रान्सने हे अध्यक्षपद भारताला मिळण्यासाठी दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांचे आभारी आहोत. दोन्ही देशांचे ऐतिहासिक व दृढ संबंध आहेत असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचा अध्यक्ष म्हणून भारत या महिन्यात अनेक बैठकांचे आयोजन करून त्यात वेगवेगळे विषय हाताळणार आहे. सीरिया, इराक, सोमालिया, येमेन, पश्चिम आशिया यांसारखे अनेक मुद्दे विषयसूचीवर असू शकतात. सुरक्षा मंडळ सोमालिया, माली, संयुक्त राष्ट्रांचे लेबनॉनमधील अंतरिम सुरक्षा दल याबाबत ठरावांना मंजुरी देण्याची शक्यता आहे, असे तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे.
बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कांस्य पदक जिंकले
टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत दमदार वाटचाल करणाऱ्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने रविवारी अखेर कोट्यवधी भारतीय चाहत्यांना कांस्यपदकाचा नजराणा दिला.
जगज्जेत्या सिंधूने कांस्यपदकाच्या लढतीत चीनच्या ही बिंग जियाओला नेस्तनाबूत करून ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला क्रीडापटू ठरण्याचा मान मिळवला.
सिंधूने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. बिंग जिआओविरुद्धच्या सामन्यात सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत पहिल्या गेममध्ये ११-८ अशी आघाडी घेतली. यानंतर १६-१०, १९-१२ अशी आघाडी टिकवली आणि पहिला गेम २१-१२ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्येही भारतीय शटलरने चांगली सुरुवात केली आणि ५-२ अशी आघाडी घेतली. पहिला गेम गमावल्यानंतर, बिंग जिआओ दबावाखाली असल्याचे दिसून आले.
जुलै जीएसटी कलेक्शन १ लाख कोटी पेक्षा जास्त
सलग आठ महिने जीएसटी कलेक्शन एक लाख कोटींच्या पार जमा होत होता. मात्र गेल्या महिन्यात जीएसटीचं कलेक्शन १ लाख कोटींच्या खाली जमा झालं होतं. मात्र या महिन्यान पुन्हा एकदा जीएसटी संकलनात वाढ झाली आहे. जुलै महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत १ लाख १६ हजार ३९३ कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. यात राज्याची कर रक्कम २८ हजार ५४१ कोटी आणि केंद्राचा वाटा २२ हजार १९७ कोटी आहे. तर एकीकृत जीएसटी ५७ हजार ८६४ कोटी आहे. एकीकृत जीएसटीत २७ हजार ९०० कोटी आयातीच्या माध्यमातून आले आहेत. तर उपकर ७ हजार ७९० कोटी जमा झाला आहे. ८१५ कोटी आयतीवरील उपकरातून मिळाला आहे. जीएसटीची रक्कम १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान जीएसटीआर-३ बी च्या माध्यमातून जमा झाला आहे.
जुलै २०२० च्या तुलनेत ३३ टक्के अधिक कर जमा झाला आहे. जुलै २०२० मध्ये जीएसटी ८७ हजार ४२२ कोटी जमा झाला होता. त्यात केंद्राचा वाटा १६ हजार १४७ कोटी, तर राज्याचा वाटा २१ हजार ४१८ कोटी होता. तर एकीकृत जीएसटी ४२ हजार ५९२ कोटी रुपये इतका होता.