मेमध्ये निर्यातीत भरघोस वाढ
देशाच्या निर्यातीत गेल्या महिन्यात भरघोस वाढ झाली आहे. भारतीय अभियांत्रिकी उपकरणे, इंधन उत्पादने तसेच रत्न व दागिन्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या मागणीमुळे मेमधील निर्यात ६७.३९ टक्क्यांनी झेपावत ३२.३२ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे.
वर्षभरापूर्वी, मे २०२० मध्ये निर्यात १९.२४ अब्ज डॉलर होती. तर आधीच्या वर्षात, याच कालावधीत ती २९.८५ अब्ज डॉलर होती. गेल्या महिन्यात आयात मात्र लक्षणीय प्रमाणात उंचावत ३८.५३ अब्ज डॉलर झाली. वार्षिक तुलनेत त्यात थेट ६८.५४ टक्के वाढ झाली आहे.
परिणामी आयात – निर्यातीतील तूट ६.३२ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. मे २०२० म्ये आयात २२.८६ अब्ज डॉलर तर मे २०१९ मध्ये ती ४६.६८ अब्ज डॉलर होती. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच, एप्रिलमध्ये निर्यात तिप्पट झाली होती. तर व्यापार तूट १५.१ अब्ज डॉलर होती. गेल्या दोन महिन्यात निर्यात ६२.८४ अब्ज डॉलर झाली आहे.
फलोत्पादन समूह विकास कार्यक्रमाचा प्रारंभ
भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्यवतीने ‘फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम’ (Horticulture Cluster Development Program / CDP) याचा प्रारंभ करण्यात आला आहे. फलोत्पादनाच्या क्षेत्रातील निर्यातीला चालना देण्यासाठी हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.
ठळक बाबी
हा एक केंद्रीय कार्यक्रम असून तो जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होण्यासाठी फलोत्पादन समूह / क्लस्टर विकसित करणे आणि त्यांचा विकास करणे या उद्देशाने तयार करण्यात आला आहे.
कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ (NHB) या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणार आहे.
योजनेनुसार कार्यक्रमाच्या प्रायोगिक टप्प्यात, सध्या तयार करण्यात आलेल्या एकूण 53 समूहांपैकी 12 समूहांमध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाईल. त्यात पुढील समूहांचा समावेश आहे –
सफरचंद फळ – शोपियन (जम्मू व काश्मीर) आणि किन्नौर (एचपी)
आंबा फळ – लखनौ (उत्तरप्रदेश), कच्छ (गुजरात) आणि महबूबनगर (तेलंगणा)
केळ फळ – अनंतपूर (आंध्रप्रदेश) आणि थेनी (तामिळनाडू)
द्राक्ष फळ – नाशिक (महाराष्ट्र)
अननस फळ – सिफाहीजला (त्रिपुरा)
डाळिंब फळ – सोलापूर (महाराष्ट्र) आणि चित्रदुर्ग (कर्नाटक)
हळद – पश्चिम जैनतीया हिल्स (मेघालय)
निति आयोगाच्या शाश्वत विकास उद्दिष्टात केरळ अव्वल स्थानी
निति आयोगाने निर्धारित केलेल्या ‘शाश्वत विकास उद्दिष्टे’(एसडीजी) निर्देशांकात २०२०-२१ मध्ये केरळने प्रथम स्थान पटकावले.
निति आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांनी गुरुवारी तिसरा एसडीजी निर्देशांक जारी केला. एसडीजी निर्देशांकात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या विकासाचे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणविषयक मापदंडांवर मूल्यमापन केले जाते. यात ७५ गुणांसह केरळ अव्वलस्थानी राहिला.
हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडू यांनी ७४ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. बिहार, झारखंड आणि आसाम यांची कामगिरी सर्वाधिक वाईट राहिली.
केंद्रशासित प्रदेशांत ७९ गुणांसह चंदीगड प्रथमस्थानी राहिले. ६८ गुण घेऊन दिल्ली दुसऱ्या स्थानी राहिली.
२०२०-२१ मध्ये मिझोरम, हरयाणा आणि उत्तराखंड यांनी अनुक्रमे १२, १० आणि ८ गुणांची वाढ मिळवून कामगिरी सुधारणाऱ्या राज्यांत सर्वोच्च स्थान मिळविले.
एकूण एसडीजी गुणांत भारताने ६ गुणांची सुधारणा केली आहे. २०१९ मध्ये भारताचे एकूण गुण ६० होते. ते २०२०-२१ मध्ये ६६ झाले आहेत. उद्दिष्ट-६ (शुद्ध पाणी व स्वच्छता) आणि उद्दिष्ट-७ (किफायतशीर व स्वच्छ ऊर्जा) यात चांगली सुधारणा झाल्याने ही गुणवाढ झाली आहे. या दोन्ही उद्दिष्टांत भारताला अनुक्रमे ८३ आणि ९२ गुण मिळाले आहेत.
फ्रंट-रनर श्रेणीत महाराष्ट्राला स्थान
२०१९ मध्ये १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची ‘फ्रंट-रनर’ अशी एक स्वतंत्र श्रेणी तयार करण्यात आली होती. ६५ ते ९९ गुण असलेली राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा त्यात समावेश करण्यात आला होता. २०२०-२१ मध्ये ‘फ्रंट-रनर’ श्रेणीत आणखी १२ राज्ये समाविष्ट झाली. त्यात उत्तराखंड, गुजरात, महाराष्ट्र, मिझोरम, पंजाब, हरयाणा, त्रिपुरा, दिल्ली, लक्षद्वीप, अंदमान व निकोबार बेटे, जम्मू व काश्मीर आणि लडाख यांचा समावेश आहे.
डिसले गुरुजींची जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागारपदी नियुक्ती
ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे.
जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या कामात आता झेडपीच्या गुरुजींचं योगदान असणार आहे.
जगभरातील 12 व्यक्तींची या समितीवर सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आली आहे.
चेग या शिक्षण तंत्रज्ञान कंपनीच्या ना-नफा तत्त्वावर काम करणाऱ्या ‘चेग डॉट ओआरजी’च्या सोबतीने वार्के फाऊंडेशनने हा पुरस्कार सुरू केला आहे.
अभिनेते अॅश्टन कुचर व मिला कुनिस, अमेरिकेतील महिलांच्या राष्ट्रीय चमूतील खेळाडू जुली एर्ट्झ व त्यांचे पती झाक एर्ट्झ हे ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकादमीचे इतर सदस्य आहेत. या ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’ वरही डिसले गुरुजींची नेमणूक करण्यात आली आहे.