पुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (६८) यांनी एका कायद्यावर स्वाक्षरी केली असून त्यामुळे त्यांचा २०३६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
रशियात गेल्या वर्षी झालेल्या मतदानानुसार रशियामध्ये घटनादुरुस्तीवर औपचारिक शिक्कामोर्तब करण्यात आले, त्यानुसार पुतिन यांना आणखी दोन वेळा अध्यक्षपदाच्या शर्यतीत सहभागी होता येणार आहे.
पुतिन गेल्या दोन दशकांपासून सत्तेवर आहेत. सध्याची अध्यक्षपदाची मुदत २०२४ मध्ये संपुष्टात येणार असून पुन्हा अध्यक्षपदाच्या शर्यतीत सहभागी व्हावयाचे की नाही याचा निर्णय नंतर घेण्यात येईल, असे पुतिन यांनी म्हटले आहे.
नियमित कामकाजावर लक्ष ठेवण्याऐवजी आपल्या सहकाऱ्यांना आपला वारसदार कोण, याकडे लक्ष देण्यापासून दूर ठेवण्यासाठी अध्यक्षपदाच्या मुदतीचा कालावधी वाढविणे गरजेचे होते, असे पुतिन यांनी म्हटले आहे. पुतिन यांनी स्वाक्षरी केलेला कायदा सोमवारी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.
डॉ. हर्ष वर्धन: ‘स्टॉप टीबी पार्टनर्शिप’ मंडळाचे नवे अध्यक्ष
भारताचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची ‘स्टॉप टीबी पार्टनर्शिप’ मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. हर्ष वर्धन यांना या पदावर जुलै 2021 पासून तीन वर्षांच्या मुदतीसाठी नेमण्यात आले आहे.
‘स्टॉप टीबी पार्टनर्शिप’ विषयी…
‘स्टॉप टीबी पार्टनर्शिप’ ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था एक सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी जगभरात कार्य करते. संस्था क्षयरोगाविरूद्धच्या लढाईत जगभरातील कर्त्यांना संरेखित करण्याचे काम करते.
संस्थेची स्थापना वर्ष 2000 मध्ये झाली. संस्थेचे सचिवालय जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे.
क्षयरोगाविषयी…..
हा रोग प्राचीन काळापासून जगातल्या अनेक देशांमध्ये अस्तित्वात आहे. 24 मार्च 1882 रोजी डॉ. रॉबर्ट कॉच यांना क्षयरोगाचे कारक असलेल्या ‘TB बॅसीलस’ नामक जिवाणूचा शोध लागला.
क्षयरोग मुख्यत: हवेच्या माध्यमातून पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. क्षयरोगाच्या निर्मितीस मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस हे सूक्ष्मजंतू कारणीभूत असतात. त्यांचा प्रसार रुग्णाच्या खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या द्रवाच्या सूक्ष्म थेंबांमुळे होतो. क्षयरूग्णाचे निदान झालेल्या रूग्णाला डॉट्स (DOTS) प्रोव्हायडरमार्फत औषधोपचार दिला जातो.
एच. के. मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली ‘स्टार्टअप इंडिया बीज निधी योजना’ याची सल्लागार समिती
भारत सरकारने ‘स्टार्टअप इंडिया बीज निधी योजना’ (SISFS) याच्या अंमलबजावणी आणि देखरेखीसाठी एक तज्ञ सल्लागार समिती तयार केली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे एच. के. मित्तल ही या समितीचे अध्यक्ष असतील.
समितीच्या इतर सदस्यांमध्ये DPIIT, नीती आयोग, जैवतंत्रज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभाग आणि स्टार्टअप परिसंस्थेमधील तज्ञांचा समावेश आहे.
‘स्टार्टअप इंडिया बीज निधी योजना’ (SISFS)….
स्टार्टअप उद्योग क्षेत्रासाठी समर्पित असा 1000 कोटी रुपयांचा ‘स्टार्टअप इंडिया बीज निधी’ तयार करण्यात आला आहे. स्टार्टअप उद्योगांना आर्थिक पाठबळ पुरवणे हा या निधीमागचा हेतु आहे. त्यामुळे नवोदित उद्योजकांना त्यांच्या नवकल्पनांचा पाठपुरावा करण्यात मदत मिळणार.
स्टार्टअप उद्योगाची व्याख्या…..
स्टार्टअप ही अशी एक संस्था आहे ज्याची पाच वर्षाहून अधिक काळासाठी भारतात नोंदणीकृत नाही आणि ज्याची वार्षिक उलाढाल कोणत्याही आर्थिक वर्षात 25 कोटी रुपयांपेक्षा अधिक नाही.
तंत्रज्ञान किंवा बौद्धिक संपदेद्वारे प्रेरित असलेली नवीन उत्पादने किंवा सेवांच्या अभिनव, विकास, उपयोजन किंवा व्यवसायीकरणाच्या दिशेने कार्य करणारी ही एक संस्था आहे.