नाणेनिधीच्या माजी अधिकाऱ्यास पाकमध्ये मानाचे पद
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी अर्थतज्ञ रेझा बकीर यांना आज पाकिस्तानमधील स्टेट बॅंक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आले. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून आर्थिक मदतीचे पॅकेज मिळण्याची आशा आहे. त्या पार्श्वभुमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. रेझा बकीर यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी असणार आहे.
- रेझा बकीर हे हॉर्वर्ड आणि कॅलिफोर्नियातील बर्केन्ले विद्यापिठातील माजी विद्यार्थी आहेत. 2000 सालापासून ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबरोबर काम करत होते. सध्या ते इजिप्तमध्ये नाणेनिधीचे वरिष्ठ निवासी प्रतिनिधी आहेत.
- यापूर्वी रुमानियात नाणेनिधीच्या दूतावासाचे प्रमुख आणि कर्ज धोरण विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. वरिष्ठ अर्थतज्ञाला पाकिस्तानातील प्रमुख बॅंकेच्या गव्हर्नरपदी नियुक्त करून देशाचे डबघाईला आलेले अर्थकारण सुरळीत आणण्याचा प्रयत्न पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे.
तब्बल 126 तास केले नृत्य…नेपाळच्या तरुणीचा विश्वविक्रम
- नेपाळमधील एका तरुणीने जगाला आश्चर्याने बोटे तोंडात घालायची वेळ आणली आहे. या तरुणीने तब्बल 126 तास न थकता न थांबता नृत्य करत वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे. याचबरोबर हा विक्रम करणारी ही जगातील पहिली तरुणी बनली आहे. याआधी हे रेकॉर्ड एका भारतीयाच्या नावे होते.
- वंदना नेपाल असे या तरुणीचे नाव असून नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी वंदनाचा सत्कार केला. वंदनाचे वय अवघे 18 वर्षे आहे.
- वंदना ही नेपाळच्या धनकुटा जिल्ह्यातील राहणारी आहे. वंदनाने भाकताच्या कलामंडलम हेमलता यांनी स्थापित केलेले रेकॉर्ड तोडले आहे. हेमलता यांनी 2011 मध्ये 123 तास आणि 15 मिनिटे सलग नृत्य करत वर्ल्ड रेकॉर्ड केले होते.
थायलंडचे राजे महा वजीरालॉन्गकॉर्न यांचा राज्याभिषेक
- थायलंडचे राजे महा वजीरालॉन्गकॉर्न यांचा थाटामाटाने राज्याभिषेक करण्यात आला. हिंदू आणि बौद्ध अशा दोन्ही पारंपारिक धार्मिक विधींनी राजांचा राज्याभिषेक झाला.
- वजीरालॉन्गकॉर्न यांना राजा राम दहावे म्हणूनही ओळखले जाते. त्यांचे वडील राजा भूमिबोल अडुलयादेज यांचे 13 ऑक्टोबर 2016 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर ऑक्टोबर 2016 मध्येच देशाच्या संसदेने मांडलेला राजा बनण्याचा प्रस्ताव माहा वाजीरालॉन्गकॉर्न यांनी स्वीकारला. त्यामुळे आता वजीरालॉन्गकॉर्न कायदेशीररित्या सिंहासनावर विराजमान झाले. त्याचे वडील 70 वर्ष सिंहासनाधीश होते.
भारताचे आयातीवरील तेल अवलंबीत्व पोचले 84 टक्क्यांवर
- भारताचे तेल आयात करून देशांतर्गत गरज भागवण्याचे प्रमाण सध्या विक्रमी पातळीवर पोहचले आहे. हे प्रमाण सध्या तब्बल 84 टक्क्यांवर पाहोचल्याने देशापुढील इंधन आयातीवर होणारा खर्च वाढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयातीवरील तेल अवलंबीत्व किमान दहा टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दीष्ठ ठेवले होते. पण ते साध्य तर झाले नाहीच पण उलट हे अवलंबीत्व आणखी वाढले असल्याचे स्पष्ट झाले आहे. सन 2013-14 या वर्षात देशाचे आयातीवरील तेल अवलंबीत्व केवळ 67 टक्के इतके होते.
- पेट्रोलियम मंत्रालयाने सन 2018-19 ची आकडेवारी प्रकाशित केली आहे त्यानुसार तेलाची आयात एकूण गरजेच्या तुलनेत 83.7 टक्के इतकी होती.सन 2015-16 मध्ये देशांतर्गत तेल उत्पादनाचे प्रमाण 36.9 दशलक्ष टनावरून 36 दशलक्ष टन इतके घसरले.