महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार
देशातील ४६ शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश आहे.
दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
अहमदनगरमधील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाळेतील डॉ. अमोल बागुल, मुंबईतील ऑटोमिक एनर्जी सेंट्रल स्कूलचे डॉ. ए. जेबीन जोएल आणि पुण्यातील विस्डम वर्ल्ड शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका दळवी या महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.
राज्याच्या निवडणूक आयुक्तपदी मदान
राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून माजी मुख्य सचिव यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला. राज्याचे मुख्य सचिव राहिलेले यू.पी.एस. मदान हे १९८३ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मदान यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. ज. स. सहारिया यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याच्या मुख्य सचिवासह त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणूनही सेवा बजावली आहे. त्याचबरोबर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे काम पाहिले आहे. एमएमआरडीए आयुक्त आणि म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे.
रशियाच्या विकासासाठी भारत देणार १ अब्ज डॉलरचे कर्ज
अति पूर्वेकडच्या भागाच्या विकासासाठी भारत रशियाच्या खांद्याला खांदा लावून काम करेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. मोदी सध्या दोन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या या भागाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदी यांनी एक अब्ज डॉलरचे कर्ज देण्याचीही घोषणा केली आहे.
रशियाच्या अति पूर्वेकडच्या भागाबरोबर भारताचे फार जुने नाते आहे. व्लादिवोस्तोकमध्ये दूतावासा सुरु करणारा भारत पहिला देश आहे असे मोदी म्हणाले. सोवितय रशियाच्यावेळी जेव्हा इतर परदेशी नागरिकांवर व्लादिवस्तोकमध्ये बंदी होती तेव्हा भारतीयांसाठी प्रवेश खुला होता.
विदेशी गुंतवणुकीत २८ टक्क्यांची वाढ
वृत्तसंस्था, नवी दिल्लीः चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेला विविध क्षेत्रांत फटका बसला असला तरी विदेशी थेट गुंतवणुकीच्या (एफडीआय) क्षेत्रात मात्र चांगली कामगिरी नोंदवली गेली आहे.
जूनअखेरच्या तिमाहीमध्ये एफडीआयने तब्बल २८ टक्के वृद्धी साधली आहे. या कालावधीत भारतात १२.७५ अब्ज अमेरिकी डॉलरची विदेशी थेट गुंतवणूक आली. केंद्र सरकारने गुरुवारी ही आकडेवारी घोषित केली.
सेवाक्षेत्र, कम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर, टेलिकम्युनिकेशन्स आणि व्यापारक्षेत्रात प्रामुख्याने एफडीआय वाढली, असे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. या तिमाहीत भारतात सिंगापूरने सर्वाधिक गुंतवणूक केली. यानंतर मॉरिशस व अमेरिकेचा क्रमांक लागतो.
प्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, कादंबरीकार किरण नगरकर यांचं निधन
मुंबई :- सिद्ध साहित्यिक, कादंबरीकार, पटकथा लेखक, नाटककार आणि अस्तित्ववादी साहित्याचे बिनीचे शिलेदार किरण नगरकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आपल्या वेगळ्या शैलीनं सात सक्कं त्रेचाळीस, रावण अॅड एडी, ककल्ड, द एक्स्ट्राज अशा साहित्यांनी साहित्य रसिकांच्या मनावर अधिराज्य नगरकर यांनी निर्माण केलं.
नगरकर यांची नाटकं-
बेडटाइम स्टोरी
कबीराचे काय करायचे
स्ट्रेंजर अमंग अस
द ब्रोकन सर्कल
द विडो ऑफ हर फ्रेण्डस
द एलिफंट ऑन द माऊस
ब्लॅक टुलिप
नगरकर यांच्या कादंबऱ्या
सात सक्कं त्रेचाळीस
रावण अँड इडी
ककल्ड
गॉड्स लिट्ल सोल्जर
रेस्ट अँड पीस
जसोदा: अ नॉवेल