Current Affairs 07 March 2020
मुख्य माहिती आयुक्तपदी बिमल जुल्का
माहिती आयुक्त बिमल जुल्का यांना शुक्रवारी मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले.
राष्ट्रपतींनी त्यांना पदाची शपथ दिली. आयोगात सूचना आयुक्तांची ११ पदे आहेत. अद्याप आयोगात ५ माहिती आयुक्तांची पदे रिक्त आहेत.
Maharashtra Budget 2020 Highlight
महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर आज सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सदनात आज अर्थसंकल्प सादर केला.
समाजातील गरीब, वंचित घटकांना न्याय द्यायचा होता आणि अर्थसंकल्पाच्या माध्यातून आम्ही तो प्रयत्न केला असे अजित पवार यांनी सांगितले.
– २ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या व नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्याची घोषणा करण्यात आली.
– दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार योजना आणण्यात येईल. २१ ते २८ वयोगाटतील तरुण-तरुणींसाठी ६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल.
– शेतकऱ्यांची दिवसा वीज मिळत नाही अशी तक्रार होती. त्यामुळे पुढच्या पाच वर्षात शेतकऱ्यांना ५ लाख सौरपंप बसवून देण्यात येतील. वर्षाला एक लाख पंप बसवण्याचे उद्दिष्टय आहे. ६७० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
– महाराष्ट्रातील विविध भागाच्या पर्यटन विकासासाठी १ हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
– गाव तिथे एसटी यासाठी १६०० नव्या एसटी बस विकत घेण्यासाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येईल. बस स्थानकांसाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
– बालेवाडीत आतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे.
– आरोग्यासाठी ५ हजार कोटी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी अडीच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
– क्रीडा संकुलासाठी भरीव तरतूद, राज्यातील प्रत्येक जिल्हा क्रीडा संकुलासाठी रूपये २५ कोटी इतका निधी देण्यात येणार आहे. हा निधी यापूर्वी केवळ ८ कोटींचा होता. त्यात वाढ करण्यात आली आहे.
– आमदारांना मतदारसंघात विकासकामे करायची असतात. त्यासाठी आमदार निधी दोन कोटीवरुन तीन कोटी रुपये करण्यात आला आहे.
– मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये बांधकाम उदयोगाला चालना देण्यासाठी पुढच्या दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कामध्ये एक टक्के सवलत देण्यात आली आहे.
– औद्योगिक वापराच्या वीजेच्या शुल्कातही सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे अडीच हजार कोटी रुपयांचा महसूली तोटा अपेक्षित आहे.
राज्यातील पहिले क्रीडा विद्यापीठ पुण्यात
अर्थमंत्री अजित पवार यांनी औरंगाबादेत प्रस्तावित पहिले क्रीडा विद्यापीठ पुण्यातील बालेवाडीत उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रीडा विद्यापीठ औरंगाबादेत उभारण्याची घोषणा केली होती. कराेडी गावात १३० एकरची जागाही संपादित झाली होती. दरम्यान, बालेवाडीत अभ्यासक्रम सुरू करण्यास इमारतीची गरज अाहे. त्यामुळे ६ महिन्यांत हे विद्यापीठ सुरू हाेऊ शकेल, असे अधिकारी म्हणाले.
वर्ल्ड मॅरेथॉन चॅलेंज :आदित्य पहिला भारतीय
आदित्य राज वर्ल्ड मॅरेथॉन चॅलेंज पूर्ण करणारा पहिला भारतीय ठरला आहे. यात धावपटूंना ७ दिवसांत ७ खंडांतील ७ मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे लागते. यंदा १५ महिला, २७ पुरुष धावपटूंनी ३२ लाखांचे शुल्क जमा केले. यातून त्यांच्यासाठी विमाने भाड्याने घेण्यात आली.
येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने लादले निर्बंध
YES बँकेवर कर्जाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या येस बँकेवर निर्बंध लादले आहेत.
तसेच ग्राहकांना खात्यातून ५० हजार रुपयेच काढता येतील असंही RBI नं म्हटलं आहे.
५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास खातेदारांना RBI ची मंजुरी घ्यावी लागणार आहे. खातेदारांना वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्न या तीन कारणांसाठीच ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येईल. मात्र RBI ची मंजुरी त्यासाठी घेणं बंधनकारक असणार आहे.
खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या या YES बँकेवर ३० दिवसांसाठी निर्बंध लादण्यात आले आहेत.