Current Affairs : 09 November 2020
इंकेटल चॅलेंजर टेनिस स्पर्धा : रामकुमारला उपविजेतेपद
भारताचा आघाडीचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनला वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे रविवारी इकेंटल चॅलेंजर टेनिस स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
बिगरमानांकित रामकुमारला २६व्या वाढदिवसाच्या दिवशी अमेरिकेच्या सातव्या मानांकित सेबॅस्टियन कोर्डाकडून ४-६, ४-६ असा पराभव स्वीकारावा लागला. रामकुमारचा पराभव झाला असला तरी या वर्षांतील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
या उपविजेतेपदासोबतच त्याने जागतिक क्रमवारीत पहिल्या २०० मध्ये स्थान मिळवले आहे. त्याच्या क्रमवारीत ६० गुणांची भर पडली असून त्याला १८५वे स्थान मिळाले आहे.
पहिल्या सेटपासून रामकुमारने चुरस द्यायचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या सेटमध्ये तर ४-४ अशी बरोबरी होती. त्यामध्येच रामकुमारला पुढच्या गेममध्ये ४०-० अशी आघाडी मिळाल्याने ५-४ असा गुणफलक करण्याची संधी होती. मात्र तिथे सलग पाच गुण गमावत रामकुमारने सामन्यावरील नियंत्रण पूर्णपणे घालवले होते.
शक्तिकांत दास यांनी SAARC देशांच्या केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांच्या 40 व्या बैठकीचे अध्यक्षपद भूषविले
4 नोव्हेंबर 2020 रोजी आयोजित करण्यात आलेल्या SAARC देशांच्या केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांची 40 वी बैठक भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या गटाला ‘सार्कफायनान्स गव्हर्नर्स ग्रुप’ म्हणून ओळखले जाते.
कार्यक्रमाच्या प्रसंगी दास यांनी ‘सार्कफायनान्स सिंक’ नामक क्लोज्ड यूजर ग्रुप आधारित सुरक्षित संप्रेषण नेटवर्कचे उद्घाटन केले. क्षेत्रातल्या सदस्य देशांच्या दरम्यान जाहीर केलेल्या बृहत्-आर्थिक धोरणांबाबतचे अनुभव सामायिक करण्यासाठी ‘सार्कफायनान्स सिंक’ नेटवर्कची स्थापना करण्यात आली.
अमेरिकन सैन्याला महाराष्ट्र पुरवणार दारुगोळा रसद
अमेरिकन सैन्याच्या रायफल्स, बंदुकांसारख्या छोट्या शस्त्रांमध्ये वापरण्यात येणारा दारूगोळा आता महाराष्ट्रातून पुरवला जाणार आहे.
राज्यातील वरणगाव फॅक्ट्री येथे निर्माण केला जाणारा “नाटो एम वन नाइन थ्री’ प्रकारातील दारुगोळा लवकरच अमेरिकेत निर्यात केला जाणार आहे.
चालू आर्थिक वर्षात हा निर्यात व्यवहार पूर्ण होईल, अशी माहिती आयुध निर्माणी कारखाना मंडळाने दिली आहे.
देशातील आयुध निर्माणी कारखान्यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी कारखाना मंडळाने निर्यातवाढीकडे भर दिला आहे.
याच अनुषंगाने विविध देशांना त्यांच्या मागणीनुसार देशातील विविध कारखान्यांकडून दारूगोळा पुरवठा केला जात आहे.
अमेरिकेसाठी निर्यात केला जाणारा 5.56-45मिमी नाटो एम वन नाइन थ्री बॉल ऍम्युनिशन हादेखील याच प्रयत्नांचा एक भाग असणार आहे.
मंडळाच्या वरणगाव येथील कारख्यान्यात या दारूगोळ्याची निर्मिती केली जाते. रायफल्स, बंदुका यासारख्या छोट्या शस्त्रांमध्ये या प्रकारचा दारूगोळा वापरला जातो.