Current Affairs : 11 January 2021
गगनयान मोहिमेतील दोन शल्यचिकित्सक प्रशिक्षणासाठी लवकरच रशियाला
भारताच्या गगनयान या मानवी अवकाश मोहिमेत दोन शल्यचिकित्सकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार असून ते लवकरच त्यासाठी रशियाला रवाना होणार आहेत.
भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने या मोहिमेची तयारी सुरू ठेवली असून दोन फ्लाइट सर्जन म्हणजे शल्यचिकित्सक डॉक्टर्स हे त्यात सहभागी होणार आहेत.
भारतीय हवाई दलातून या दोन डॉक्टरांची निवड करण्यात आली असून ते अवकाश वैद्यक शाखेतले जाणकार आहेत.
भारतीय हवाई दलातील चार वैमानिकांची निवड इस्रोने मानवी अवकाश मोहिमेसाठी केली असून त्यांचे प्रशिक्षण युरी गागारिन संशोधन व चाचणी अवकाशवीर प्रशिक्षण केंद्र या मॉस्कोतील ठिकाणी गेल्या वर्षीपासून सुरू आहे.
युरी गागारिन हे अवकाशाची सफर करणारे जगातले पहिले अवकाशवीर होते. मध्यंतरीच्या काळात करोनामुळे रशियात टाळेबंदी लागू केल्याने भारतीय अवकाशवीरांचे प्रशिक्षण रखडले होते.
भारताचे हवाई शल्यचिकित्सक हे फ्रान्सलाही प्रशिक्षणासाठी जाणार आहेत पण तेथील प्रशिक्षण सैद्धांतिक पातळीवरचे असेल.
फ्रान्स हा देश अवकाश वैद्यकात आघाडीवर असून मेडीस स्पेस क्लिनिक ही सीएनईएसची स्वतंत्र वैद्यक संस्था आहे. गगनयान ही भारताची मानवी अवकाश मोहीम २०२२ मध्ये तीन भारतीयांना अवकाशात घेऊन जाणार असून करोनामुळे ती रेंगाळली आहे.
श्रीनिवास पोकळेला “आनंदी बालकलाकार पुरस्कार’
बालकलाकार श्रीनिवास पोकळे याला पहिला “आनंदी बालकलाकार पुरस्कार-२०२१’ प्रदान करण्यात आला.
“नाळ’ या चित्रपटामध्ये “चैत्या’ची भूमिका करून ‘आई मले खेळाले जाऊ दे न व’ या गाण्याने मराठी प्रेक्षकांच्या हृदयामध्ये जिव्हाळ्याचे स्थान निर्माण केलेला बालकलाकार श्रीनिवास पोकळे याला “आनंदी गुरुकुल अॅक्टिंग अॅकॅडमी, अकोला’ या संस्थेच्या वतीने पहिला आनंदी बालकलाकार पुरस्कार-२०२१ प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा : रक्षना, पनवारला जेतेपद
तमिळनाडूची सी. कवी रक्षना आणि राजस्थानचा दिव्यांश सिंह पनवार यांनी राष्ट्रीय नेमबाजी सराव स्पर्धेतील अनुक्रमे महिला आणि पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकाराचे जेतेपद संपादन केले.
रक्षना हिने अंतिम फेरीत २५१.४ गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर नाव कोरले.
राजस्थानच्या निशा कनवार हिला २५०.७ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. गुजरातच्या एलाव्हेनिल हिने तिसरे स्थान प्राप्त केले.
पुरुषांमध्ये, पंजाबच्या अर्जुन बबुता याने पात्रता फेरीत ६३२.१ गुणांसह अग्रस्थान पटकावले होते. पण पनवारने अंतिम फेरीत वर्चस्व गाजवले. त्याने २५०.९ गुणांसह सुवर्णपदक प्राप्त केले. महाराष्ट्राच्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील याने २४९.७ गुणांसह रौप्यपदक मिळवले.
टी-२ स्किट प्रकारात हरयाणाची रैझा ढिल्लोन आणि पंजाबचा अमरिंदर सिंग यांनी अनुक्रमे महिला आणि पुरुष गटाचे जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत रैझाने ६० पैकी ५० वेळा अचूक वेध घेतला. पुरुषांमध्ये अमरिंदर आणि फतेहबिर सिंग शेरगिल यांनी ५४ वेळा वेध घेतला. पण अमरिंदरने शूट-ऑफमध्ये २-० अशी बाजी मारली.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तीन समित्यांचे अध्यक्षपद भारताला
भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तीन प्रमुख समित्यांचे अध्यक्षपद मिळाले आहे.
2022 साठीची दहशतवादविरोधी समिती, तालिबान निर्बंध समिती आणि लीबिया निर्बंध समितीचे अध्यक्षपद भारताला मिळाल्याचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतले भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी टी. एस. त्रिमूर्ती यांनी सांगितले.
दहशतवादविरोधी समितीचे अध्यक्षपद मिळणे भारतासाठी विशेष उल्लेखनीय असल्याचे त्रिमूर्ती यांनी नमूद केले.